६० आणि ७०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांची प्रकृती सुखरुप आहे. दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. मुमताज यांच्या निधनाची अफवा पसरली होती. तर खुद्द मुमताज यांनीसुद्धा एका वृत्तवाहिनीशी बातचित करुन आपण धडधाकट असल्याचं सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील एका रुग्णालयात मुमताज यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचं ट्विट पत्रकार आणि चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी केलं होतं. नंतर नाहटा यांनीही मुमताज यांच्या निधनाविषयी चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागितली आहे. मुमताज सध्या लंडनमध्ये असून त्यांची प्रकृतीही ठणठणीत आहे.

७१ वर्षीय मुमताज गेल्या काही वर्षांपासून लंडनमध्ये स्थायिक झाल्या आहेत. ‘अशा प्रकारच्या अफवा का पसरवल्या जात आहेत हेच समजत नाही. अशा अफवा पसरवून कोणाला काय आनंद मिळतो,’ अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुमताज यांच्या निधनाची अफवा दुसऱ्यांदा पसरली आहे. निधनाच्या अफवांवर मुमताज यांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. ‘मी सध्या लंडनमधल्या घरी असून इथे मी मजेत आहे. माझ्या निधनाच्या अफवांमुळे माझे चाहते निराश होत असतील. मलाही स्वत:विषयीच्या अशा चर्चा ऐकून वाईट वाटतं,’ असं त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legendary actress mumtaz is alive confirms director milap zaveri amid rumors