भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री जोहरा सेहगल या २७ एप्रिलला १०२ वर्षांच्या झाल्या. नृत्यांगणा, कवी आणि अभिनेत्री अशा बहुगुणी जोहरा यांचा जन्म साहरनपूर येथे २७ एप्रिल १९१२साली झाला. आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत जोहरा सेहगल यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. जोहरा या अनेक चित्रपट, टीव्ही मालिका तसेच इंग्रजी भाषिक चित्रपटांमध्ये झळकल्या.
जोहरा सेहगल या लहानपणापासूनच खटय़ाळ होत्या. पारंपरिक आणि सधन मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या जोहरा यांचे बालपण त्यावेळच्या पडदा पद्धतीत गेले. पण त्यांना परदेशात जाण्याची संधी मिळाली आणि सारे पारडे बदलले. ते एका अर्थी चांगलेच झाले कारण त्यामुळे भारतीय रंगभूमीला आणि चित्रपटसृष्टीला एका कसदार नृत्यांगणा आणि अभिनेत्री लाभली. सिनेसृष्टी गाजवणार्या जोहरा सेहगल या मूळच्या नृत्यांगणा होत्या. त्या युरोपमध्ये असतानाच त्यांना उदय शंकर यांचे शिव-पार्वती हे नृत्यनाटय़ पाहायला मिळाले व ते या शैलीकडे ओढले गेले. उदय शंकर ट्रूपमधील त्या आघाडीच्या नृत्यांगणा होत्या. या ट्रूपबरोबर त्यांनी जगाचा दौरा केला. हिंदी चित्रपटसृष्टीची आजी म्हणून त्यांची ओळख आहे. नृत्यांगणा म्हणून १९३५ मध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. गुरुदत्त यांच्या “बाझी’ तसेच राज कपूर यांच्या “आवारा’ चित्रपटात त्यांनी नृत्य दिग्दर्शकेची भूमिका बजावली. पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरमध्ये त्यांनी तब्बल १४ वर्षे वेगवेगळ्या भूमिका केल्या. विशेष म्हणजे त्यांनी कपूर घराण्याच्या चारही पिढ्यांबरोबर काम केले आहे. १९४२ मध्ये त्यांची ओळख कामेश्वर सेहगल यांच्याशी झाली आणि त्यांनी त्यांच्याशी विवाह केला. जोहरा यांना किरण आणि पवन अशी मुले आहेत. आंतरराष्ट्रीय मंचावर परफॉर्म करणा-या जोहरा या पहिल्या भारतीय अभिनेत्री आहेत. त्यानी १९६०च्या दशकात रुडयार्ड किपलिंगच्या ‘द रेस्कयू ऑफ प्लूफ्लेस’मध्ये अभिनय केला आहे. १९६२ मध्ये लंडनची त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली. १९९०च्या दशकात लंडनहून भारतात परतण्यापूर्वी जोरहा यांनी द ज्वेल इन द क्राऊन, माय ब्युटीफुल लाउंडेरेट, तंदुरी नाईट्स आणि नेवर से डाय या टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्येही काम केले आहे. “हम दिल दे चुके सनम’, “वीर-झारा’, “चिनी कम’ या चित्रपटातील सेहगल यांच्या भूमिका उल्लेखनीय आहेत. २००७साली त्यांनी “सावरिया” या चित्रपटात शेवटची भूमिका केली. पुरस्कारांमध्येही जोहरा इतर अभिनेत्रींपेक्षा मागे नाही. त्यांना १९९८ मध्ये पद्मश्री, २००१मध्ये कालीदास सन्मान, २००४मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि २०१० मध्ये त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
(छाया सौजन्यः फेसबुक)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा