भक्ती परब

हिंदी, मराठी वाहिन्यांवर सध्या १० पौराणिक मालिका सुरू ; प्रेक्षकांचीही अधिक पसंती

सासू-सुनेच्या मालिकांपेक्षा पौराणिक कथा टीआरपीच्या स्पर्धेत टिकत असल्याने अधिकाधिक पौराणिक कथांवर मालिक सुरू करण्याकडे निर्मात्यांचा कल आहे. हिंदी आणि मराठी वाहिन्यांवर सध्या १० पौराणिक मालिका सुरू आहेत. तसेच आणखी काही पौराणिक मालिका एक-दोन महिन्यांत छोटय़ा पडद्यावर दाखल होणार आहेत.

छोटय़ा पडद्यावरील पौराणिक मालिका टीआरपीच्या आकडेवारीनुसार पहिल्या दहा कार्यक्रमांमध्ये आपली जागा कायम ठेवून आहेत. अशा मालिकांना हमखास मिळणारी प्रेक्षकसंख्या लक्षात घेऊन प्रत्येक वाहिनी आपल्या कार्यक्रमांच्या यादीत एकतरी पौराणिक मालिका असावी, असा प्रयत्न करताना दिसते आहे. रामायण, महाभारत, श्रीकृष्णाचे चरित्र, विष्णुपुराण, लक्ष्मीपुराण, श्रीमद्भागवत या पौराणिक चरित्रवाङ्मयावर विविध निर्मितीसंस्थांनी मालिका केल्या.   गेल्या ४-५ वर्षांत हिंदीमध्ये स्वस्तिक प्रॉडक्शन, ट्रँगल फिल्म कंपनी यांनी हिंदीमध्ये पौराणिक मालिकांचे विश्व पुन्हा एकदा आणले तर मराठीमध्ये कोठारे व्हिजन्स आणि साजरी क्रिएटिव्हज या निर्मितीसंस्थांनी पौराणिक मालिका लोकप्रिय केल्या.

श्री गुरुदेव दत्त ही मालिका लवकरच दाखल होत आहे, याविषयी स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, दत्तगुरूंच्या अवताराची जन्मापासूनची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे. दत्तगुरूंच्या महात्म्याची वेळोवेळी प्रचीती देणारी अद्भुत कथा सादर करण्याचा वाहिनीचा प्रयत्न असेल. अध्यात्म, सत्य आणि अप्रतिम व्हिज्युअल इफेक्ट्स याची उत्तम सांगड या मालिकेत दिसेल.

सध्या सोनी टीव्ही, कलर्स हिंदी, सब टीव्ही, स्टार प्रवाह, कलर्स मराठी या वाहिन्यांवरील पौराणिक मालिकांनी एक वेगळा प्रेक्षकवर्ग मिळवला आहे. गेल्या काही वर्षांतील पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

मराठीमध्ये पौराणिक मालिका करताना त्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद अजूनही त्या प्रमाणात मिळणे शक्य होत नाही, तसेच त्यावर खर्च व वेळही अधिक लागतो.पौराणिक मालिकांचा निर्मितीखर्च इतर मालिकांपेक्षा जास्त असतो.

– संतोष आयाचित, साजरी क्रिएटिव्हचे प्रमुख

बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे श्री लक्ष्मीनारायण यांची एक अलौकिक कथा पहिल्यांदाच दूरचित्रवाणीवर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेत्रदीपक असे सेट, नावीन्यपूर्ण आणि आकर्षक वेशभूषा, अत्यंत उच्च दर्जाचे व्हीएफएक्स प्रेक्षकांना अभूतपूर्व अनुभव देतील.

– निखिल साने, कलर्स मराठीचे व्यवसाय प्रमुख

Story img Loader