Lata Mangeshkar Passes Away : भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कुटुंबियांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि लतादीदी या अनंतात विलीन झाल्या. लतादीदी यांना निरोप देण्यासाठी अलोट गर्दी शिवाजी पार्क परिसरात पाहायला मिळाली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मंगेशकर कुटुंबियांना धीर देत त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, सचिन तेंडुलकर, श्रद्धा कपूर, शाहरुख खान, आमिर खान या सिनेसृष्टीतील दिग्गजांसह, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Live Updates

Lata Mangeshkar Passes Away : लता मंगेशकर यांच्या जाण्याने कलाविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या आठवणी शेअर केल्या जात असून अंत्यदर्शनासाठी सर्वसामान्यांसोबतच राजकीय नेतेही पोहोचत आहेत. शिवाजी पार्कात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 

19:24 (IST) 6 Feb 2022
लतादीदी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

लतादीदी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार

त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी पाहायला मिळाली

18:56 (IST) 6 Feb 2022
लतादीदींच्या पार्थिवावरील भारताचा राष्ट्रीय ध्वज हा मंगेशकर कुटुंबियांकडे सुपूर्द

लतादीदींना तिन्ही दलांकडून मानवंदना, भारताचा राष्ट्रीय ध्वज हा मंगेशकर कुटुंबियांकडे सुपूर्द, अंत्यविधींना सुरुवात

18:47 (IST) 6 Feb 2022
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावरील अंत्यविधीला सुरुवात

लता मंगेशकर यांच्या पार्थिवावरील अंत्यविधीला सुरुवात, शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

18:39 (IST) 6 Feb 2022
सिनेसृष्टीसह, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना वाहिली श्रद्धांजली

सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, शंकर महादेवन यांनी पुष्पचक्र अर्पण करत वाहिली श्रद्धांजली, लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करताना सर्वच क्षेत्रातील मान्यवर भावूक

18:35 (IST) 6 Feb 2022
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून पुष्पहार अर्पण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून पुष्पहार अर्पण करत लतादीदींना वाहिली श्रद्धांजली, तर सुप्रिया सुळे, शरद पवार, अजित पवार यांसह अनेक राजकीय दिग्गजांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली

18:27 (IST) 6 Feb 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही वाहिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही वाहिली श्रद्धांजली, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करत वाहिली श्रद्धांजली

18:26 (IST) 6 Feb 2022
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वाहिली श्रद्धांजली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना वाहिली श्रद्धांजली

18:25 (IST) 6 Feb 2022
पंतप्रधान मोदींकडून मंगेशकर कुटुंबियांचे सांत्वन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करत वाहिली श्रद्धांजली, पंतप्रधान मोदींकडून मंगेशकर कुटुंबियांचे सांत्वन

18:24 (IST) 6 Feb 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्क मैदानावर दाखल, पुष्पचक्र अर्पण करत वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्क मैदानावर दाखल, लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत, पुष्पचक्र अर्पण करत वाहिली श्रद्धांजली

18:18 (IST) 6 Feb 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर दाखल, काही मिनिटात शिवाजी पार्कमध्ये पोहोचणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर दाखल, काही मिनिटात शिवाजी पार्कमध्ये पोहोचणार

17:55 (IST) 6 Feb 2022
सिनेसृष्टीसह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज शिवाजी पार्कवर दाखल

सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल

17:40 (IST) 6 Feb 2022
लतादीदी यांचे पार्थिव शिवाजी पार्कवर दाखल

लतादीदी यांचे पार्थिव शिवाजी पार्कवर दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा शिवाजी पार्क मैदानावर पोहोचला

सचिन तेंडुलकर शिवाजी पार्कवर दाखल

17:21 (IST) 6 Feb 2022
लतादीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार

लतादीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार

शिवाजी पार्कवर लतादीदींच्या पार्थिवाचे सर्वसामान्यांना दर्शन करता येणार

17:19 (IST) 6 Feb 2022
लतादीदींच्या अंत्ययात्रेला सुरुवात, संध्याकाळी ६.३० च्या सुमारास होणार अंत्यसंस्कार

लतादीदींच्या अंत्ययात्रेला सुरुवात

लतादीदींना निरोप देण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी

शिवाजी पार्कच्या मैदानावर होणार अंत्यसंस्कार

संध्याकाळी ६.३० च्या सुमारास होणार अंत्यसंस्कार

16:56 (IST) 6 Feb 2022
लतादीदींच्या अंत्ययात्रेला सुरुवात, अखेरचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी

लतादीदींच्या अंत्ययात्रेला सुरुवात, अखेरचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी

16:50 (IST) 6 Feb 2022
आरोग्य विज्ञान विद्यापीठ दीक्षांत समारंभ स्थगित

नाशिक विद्यापीठाचा 07 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित एकविसावा दीक्षान्त समारंभ स्थगित करण्यात आला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहिर करण्यात आला आहे यामुळे सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 07 फेब्रुवारी 2022 रोजी ऑनलाईन पध्दतीने संपन्न होणार होणार होता. राष्ट्रीय दुखवटयामुळे दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाची पुढील तारीख कळविण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

16:47 (IST) 6 Feb 2022
काळजाला भिडून जाणारा त्यांचा स्वर होता, प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांची प्रतिक्रिया

लतादीदींनी जो अनुभव दिलाय तेव्हा त्यांचा तेजस्वी सूर, श्वास आणित्यांचा संगीतमय पाॅज आठवतो. त्या पाॅजही सुंदर घ्यायच्या. प्रत्येक ओळीतून पोहोचणारा भावही महत्त्वाचा असायचा. माझे जीवन त्यांनी समृद्ध केले. काळजाला भिडून जाणारा त्यांचा स्वर होता. - प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर,

16:35 (IST) 6 Feb 2022
हा सूर सर्वसामान्यांच्या जगण्यातला सांस्कृतिक विसावा - ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर

स्वतंत्र भारतात जन्मलेल्या प्रत्येकाचे पोषण दोन कारणांनी होत होतं. मातेचे दूध आणि लतादीदींचा सूर. भारतीयांच्या जीवनातला एकही क्षण असा नाही की श्वासांबरोबर सोबतीला लताचा आश्वासक सूर नाही. हा सूर सर्वसामान्यांच्या जगण्यातला सांस्कृतिक विसावा होता. तो तसाच अविनाशी राहील. आकाशगंगेत आता अढळ ध्रुव ताऱ्यांच्या तितकाच अढळ सारथीदार आता विराजमान झाला आहे - ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर

16:34 (IST) 6 Feb 2022
लताजींचं गाणं हे खऱ्या अर्थाने भारताचं रत्न आहे - ज्येष्ठ गायिका डाॅ. प्रभा अत्रे

लताजींचा आणि माझा प्रत्यक्ष असा फारसा संबंध आला नाही. पण, त्यांच्या आवाजामुळे त्या सतत माझ्याबरोबर आहेत. संगीताच्या क्षेत्रात न कळत माझं पाऊल पडलं होतं त्या काळात ज्या कलाकारांचे माझ्यावर संस्कार झाले त्यात बडे गुलाम अली खाँ, सिनेअभिनेत्री नूरजहाँ तशाच लताजीही होत्या. संगीत प्रस्तुतीमध्ये आवाजाचं माध्यम कसं असायला हवं, याची जाणीव या कलाकारांच्या स्वरांनी मला करून दिली. आवाजाची फेक, शब्दांचे उच्चार, भावनिर्मिती अशा किती तरी गोष्टींचा त्यामुळे मी विचार करायला लागले. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगीत ही मुळात एक कला आहे. ते केवळ शास्त्र नाही, हे ध्यानात घ्यायला हवं. शास्त्रीय संगीत हे शास्त्र दाखविण्यासाठी नसतं. तिथे राग सौंदर्याचं दर्शन होणं अपेक्षित असतं. लताजींचा आवाज, सादरीकरण यामुळे शास्त्रीय संगीताचा पोत, लालित्य, भाव अशा गोष्टींकडे कलाकार अधिक लक्ष देऊ लागले आहेत. लताजींचं गाणं हे खऱ्या अर्थाने भारताचं रत्न आहे. - ज्येष्ठ गायिका डाॅ. प्रभा अत्रे

16:32 (IST) 6 Feb 2022
लतादीदींकडून मी बरेच काही शिकले - पाश्वर्गायिका कविता कृष्णमूर्ती

भारतरत्न, गानसम्राज्ञी आणि माझ्या गुरु लता मंगशेकर यांच्या निधनाची माहिती समजताच मी बऱ्याच वेळापासून उदास होते. कुणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. लतादीदींकडून बरेच काही शिकले. मला त्यांच्याकडून खूप प्रेम मिळाले. एकही दिवस असा गेला नाही की मी त्यांचा आवाज ऐकला नाही. त्या माझ्या आयुष्याचा एक हिस्सा होत्या. वयाच्या पंधराव्या वर्षी मला त्यांच्यासोबत बंगाली गाणे गाण्याची संधी मिळाली. त्यांची आठवण म्हणजे मी त्यांच्यासाठी खूप गाणी डब केली. चित्रिकरणासाठी मी गात होते, त्याची कॅसेट लता मंगेशकर यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या आवाजात अंतिम गाणे रेकाॅड होत होते. त्यांच्यासाठी मी खूप गाणी गायली असून माझ्यासाठी गाणे शिकवणारा अनुभव होता. या प्रक्रियेतून मी खूप काही शिकले. दर चित्रपटात मी लताजींबरोबर गाणे गायले. त्यांची सर्वच गाणी आवडती आहेत. त्यात देशभक्तीचे ऐ मेरे वतन के लिऐ बरोबरच अल्लाह तेरो नाम, इश्वर तेरो नाम हे सर्वधर्मसमभावाचे महत्व विषद करणारे त्यांनी गायलेले गाणेही फारच सुंदर आहे. अशा माझ्या आवडत्या व्यक्तीच्या जाण्याने मला खूप दुख झाले आहे. - पाश्वर्गायिका कविता कृष्णमूर्ती

16:31 (IST) 6 Feb 2022
लतादीदींचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल

लतादीदींचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून मुंबईत दाखल, थोड्याच वेळात शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचणार, संध्याकाळी ५.१५ ते ६ वाजता पंतप्रधान शिवाजी पार्क येथे दाखल होणार

 

16:28 (IST) 6 Feb 2022
लतादीदी अमर रहे, लतादीदींना अखरेचा निरोप देण्यासाठी चाहत्यांची रस्त्याच्या दुर्तफा गर्दी

लतादीदी अमर रहे, लतादीदींना अखरेचा निरोप देण्यासाठी चाहत्यांची रस्त्याच्या दुर्तफा गर्दी

16:03 (IST) 6 Feb 2022
लता मंगेशकर यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी रवाना

लता मंगेशकर यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी रवाना, प्रभूकुंज ते शिवाजी पार्क असा लतादीदींच्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात, संध्याकाळी ६.३० वाजता होणार अंत्यसंस्कार

15:58 (IST) 6 Feb 2022
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा ; राज्यात सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर

भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, “आज (रविवार, ६ फेब्रुवारी) भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.”

15:51 (IST) 6 Feb 2022
लता मंगेशकर यांचे पार्थिव लष्कराच्या सजवलेल्या गाडीतून शिवाजी पार्क येथे नेण्यात येणार

लतादीदी यांचे पार्थिव थोड्याच वेळात लष्कराच्या सजवलेल्या गाडीतून शिवाजी पार्क येथे घेऊन जाण्यात येणार

15:39 (IST) 6 Feb 2022
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

15:33 (IST) 6 Feb 2022
पोलिसांच्या बँडपथकाकडून सलामी दिली जाणार

लतादीदी यांच्या पार्थिवावर प्रभूकुंज निवासस्थानाबाहेर पोलिसांचे बँडपथक सलामी देण्यात येणार आहे.

15:27 (IST) 6 Feb 2022
पार्थिव थोड्याच वेळात अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्कात नेले जाणार

लता मंगेशकर यांचे पार्थिव थोड्याच वेळात अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्कात नेले जाणार, संध्याकाळी ६ नंतर अंत्यसंस्कार होणार,

पोलीस पथकाकडून मानवंदना देण्यात येणार,

विशेष बँडपथक प्रभूकुंज निवासस्थानी दाखल

15:09 (IST) 6 Feb 2022
पंतप्रधान मोदी काही वेळात मुंबईसाठी रवाना होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळात मुंबईसाठी रवाना होणार, शिवाजी पार्कवर जाऊन अंत्यदर्शन घेणार

14:46 (IST) 6 Feb 2022
संगीत क्षेत्रातील माऊली गेली : गायक राहुल देशपांडे

लतादिदींच्या जाण्याने आयुष्य खर्या अर्थाने पोरकं झालं आहे. मायेची उब हरवल्याची जाणीव आज होते आहे. गेले काही दिवस त्या आजारी होत्या आणि त्यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा ते सत्य स्वीकारणं कठीण होतं. परंतु, काही गोष्टी अटळ असतात आणि त्या स्वीकाराव्या लागतात. तसंच लतादिदींचं जाणं आता मनाला स्वीकारावं लागतंय.

आपल्या घरात लहानपणापासून वडिलधार्यांचा सहवास जसा महत्त्वपूर्ण असतो. संगीतक्षेत्रात तेच अमूल्य महत्त्व लतादिदींचे होते. संगीतक्षेत्रातील माऊली सगळ्यांना पोरकं करून गेली. त्यांचं स्थान, योगदान, त्यांची गाणी कायम स्मरणात राहतील. त्या देहरुपातून गेल्या आहेत मात्र, आठवणी आणि गाण्यांमधून त्या सदैव आपल्यात राहतील. त्यांचे स्वर कायम सोबत राहतील, अशा शब्दात गायक आणि संगीतकार राहुल देशपांडे यांनी श्रद्धांजली वाहिली.

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते.

Story img Loader