महान तेलगू दिग्दर्शक कासिनाथनि विश्वनाथ अर्थात के. विश्वनाथ(वय-९२) यांचे काल (गुरुवार) रात्री उशीरा निधन झाले. वयोमानाशी संबंधित काही गंभीर आजारांमुळे अनेक दिवसांपासून ते त्रस्त होते आणि त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१७ मध्ये त्यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देऊन भारत सरकारने सन्मानित केलं होतं. त्यांना कला तपस्वी म्हणूनही ओळखलं जात होतं. ते तेलगू दिग्दर्शक असले, तरी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही तेवढीच मोठी भूमिका पार पाडली आहे.

अपंगत्व, अस्पृश्यता व हुंडा यांसारख्या सामाजिक प्रश्नांवरचे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. १९९२ मध्ये पद्मश्री किताब, तब्बल वीस वेळा आंध्र प्रदेश सरकारचा नंदी पुरस्कार,पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दहा फिल्मफेअर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.

कलातपस्वी विश्वनाथ यांनी रसिकांचे आत्मभान जागे करून त्यांना पुन्हा अभिजाततेकडे नेले. त्यांच्या चित्रपटातील नृत्य व संगीत यामुळे अनेकांनी मुलांना या वेगळ्या वाटेने जाण्यास प्रेरित केले.

के. विश्वनाथ यांचा चित्रपटसृष्टीमधील प्रवास –

आंध्रात पेडापुलीवारु येथे १९३० साली जन्मलेल्या विश्वनाथ यांचे वडील मद्रासच्या चित्रपट-स्टुडिओत तंत्रज्ञ. त्यांनी प्रशासन या विषयात पदवी घेतल्यानंतर विश्वनाथ यांनीही त्याच स्टुडिओत ध्वनिमुद्रकाची नोकरी धरली. तंत्रज्ञ म्हणून चित्रपट निर्माते अदुर्थी सुब्बाराव यांच्यासमवेत काम सुरू केले. चेन्नई स्टुडिओत त्यांनी ‘आत्मगौरवम्’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पहिल्यांदा केले. त्यानंतर त्यांनी ‘चेलेली कापुरम्’, ‘ओ सीता कथा’, ‘जीवन ज्योती’ व ‘सारदा’ यांसारखे चित्रपट केले. ‘स्वराभिषेकम्’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना त्यांनी त्यात भूमिकाही केली. ‘पांडुरंगाडु’, ‘नरसिंहा नायडू’, ‘लक्ष्मी नरसिंहा’, ‘सीमासिंहम्’, ‘कुरुथीपुनाल’, ‘काक्काई श्रीरंगीनिले’, ‘बागवथी’ यांसारख्या चित्रपटांत त्यांच्या भूमिका होत्या. त्यांचे चित्रपट हे अगदी ओघवत्या कथनशैलीचे आहेत, त्यात गुंतागुंत नाही, त्यामुळे थेट व आल्हाददायक असा अनुभव रसिकांना दिला.

‘शंकराभरणम्’ (१९७९) या त्यांच्या चित्रपटाने नायक व नायिका यांच्यात केवळ एकच नाते दाखवले.. संगीताचे नाते! नर्म विनोद, आशयघन कथा, निसर्गसौंदर्याची जोड, अविस्मरणीय संगीत, सशक्त पात्रे या वैशिष्टय़ांमुळे हा चित्रपट अजूनही सर्वाना आठवतो. त्यांनी हिंदीत ‘सरगम’, ‘कामचोर’, ‘शुभकामना’, ‘जाग उठा इन्सान’, ‘सूरसंगम’, ‘संजोग’, ‘ईश्वर’, ‘संगीत’, ‘धनवान’ हे चित्रपट दिग्दर्शित केले. लोकांना जे आवडते तेच द्यायचे, ही चाकोरी सोडूनही चांगले चित्रपट करता येतात व ते तिकीटबारीवर यशस्वी होऊ शकतात, हे विश्वनाथ यांनी त्यांच्या आशयघन चित्रपटांतून दाखवून दिले.