संगीतकार लेस्ली लुईस आणि पॉप संगीताचा संबंध तसा जुनाच. त्यांच्या परी हूँ मै, जानम समझा करो ही गाणी आजही परिचित आहेत. आता याच संगीताची मेजवानी आपल्याला ‘पोश्टर बॉइज’ या चित्रपटातून ऐकायला मिळणार आहे. श्रेयस तळपदेच्या या चित्रपटातून लेस्ली प्रथमच मराठीत संगीतकार म्हणून पदार्पण करणार आहेत. असे असले तरी मराठी ही लेस्ली यांच्यासाठी अनोळखी नाही.
मराठीशी असलेल्या परिचयाबद्दल बोलताना लेस्ली लुईस म्हणाले की, ‘माझी आई मराठी भाषक होती. तसेच आजीने सांगितलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी एकूनच मी मोठा झालो. त्यामूळे माझ्यावर मराठी संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे. माझे संगीत क्षेत्रामध्ये पदार्पण झाले ते मुंबईतल्या गणेशोत्सवात वाजणाऱ्या ऑकेस्ट्रामधूनच. जॅॅझ, पॉप संगीतात येण्याआधी मी मुंबईच्या माहीम, धारावी परिसरातील एका ऑकेस्ट्रामध्ये काम करत होतो. ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील का.’सारखी गाणी मी ऑकेस्ट्रामध्ये वाजवली आहेत. त्यामुळे एकूणच मराठी संगीत मला नवीन नाही. आपल्याकडील लेझीम, झांझ, तुणतुणे, ढोलकी या प्रकारांची मला बऱ्यापैकी माहीती आहे.’ पोश्टर बॉइज बद्दल बोलताना ते म्हणाले की, या चित्रपटाचे कथानक ग्रामीण असले तरी संगीत मात्र पाश्चात्य बाजाचे आहे. त्यात ग्लोबल टच आहे. स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या आवाजातील एका गाण्यासाठी आम्ही ब्राझीलचे संगीत आणि लावणी यांचा मिलाप केला असल्याचेही लेस्ली यांनी सांगितले. दुसरे गाणे शंकर महादेवन यांनी गायले असल्याचे ते म्हणाले.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lesley lois says having impact of marathi music on himself