पडद्यावर कुशलतेने नाचणाऱ्या बॉलिवूडच्या तारेतारकांना पाहिल्यावर आपल्यालाही त्यांच्यासारखं नाचता आलं पाहिजे अशी सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात जागी होते. पण, तुम्ही नृत्यामध्ये कुशल आहात की नाहीत याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही मनापासून नृत्य केले तर तुम्हीही उत्तम नर्तक होऊ शकता,’ असं दस्तरखुद्द शाहरुख खान याने आपल्या नृत्यानुभवावरून सांगितलं आहे.
टीव्हीवर किंवा चित्रपटामध्ये कोरिओग्राफरच्या मदतीने तंत्रशुद्ध नृत्य करणाऱ्या कलाकारांना पाहून आपल्याला कधी असं छान नाचता येईल?, हा प्रश्न कित्येकांना पडतो आणि त्यामुळे ते कुठेही नाचायला कचरतात. तर दुसऱ्या बाजूला अशीही माणसं असतात, जी गाण्याची धून कानावर पडली की, सगळं विसरून नाचू लागतात. मग त्यांचं नृत्य चुकतं आहे का? ताल बरोबर पडतो आहे की नाही या कोणत्याच गोष्टीचं भान त्यांना राहत नाही. देशभरातील अशाच काही भान हरपून नाचणाऱ्या कलाकारांचा शोध ‘झी टीव्ही’च्या ‘दिल से नाचेंगे इंडियावाले’ या नवीन शो मधून घेण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे या शोची निर्मिती शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज एन्टरटेंमेंट’ने केली असून परीक्षकांच्या भूमिकेत शाहरुख खान, दीपिका पदुकोन, फराह खान, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, सोनू सूद आणि विवान शाह यांना पाचारण क रण्यात आले आहे. यावेळी बोलताना शाहरुख खानने आपल्या चाहत्यांना ‘तुम्हाला तंत्रशुध्द नाचता नाही आलं तरी चालेल पण, तुम्ही मनापासून नाचलं पाहिजे’, असं जाहीरपणे सांगितलं.
या शोच्या संकल्पनेबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये ज्या स्पर्धकांची निवड होत नाही, असे स्पर्धकच मला सुरवातीपासून आवडत असत. एकदा सहज बोलत असताना ‘झील’चे व्यवस्थापकीय संचालक पुनित गोएंका यांना विचारलं की या स्पर्धकांना घेऊन आपण काही करू शकतो का? आणि त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चेतूनच या शोची निर्मिती झाली’. यावेळी बोलताना शाहरुखने त्याच्या नृत्यासंबंधित अनेक आठवणींना उजाळा दिला.
‘मी कधीच उत्तम नर्तक नव्हतो. पण, योगायोग हा की मला माझा नाटकातली पहिली भूमिका मिळाली तीच मुळी नर्तकाची. त्यानंतर पहिल्याच चित्रपटामध्ये मला एका गाण्यावर नाचायचे होते. पण, आतापर्यंत माझ्या नाचावर फरहा खानसारख्या कोरिओग्राफर्सनी इतकी मेहनत घेतली आहे की त्यांच्यामुळे आज मी नृत्य करू शकतो. एक किस्सा सांगायचा झाला तर एका गाण्यासाठी मला ‘डीिपग’ करायचे होते. काही केल्या मला ती स्टेप जमत नव्हती. खूप सरावानंतर जेव्हा मला ती जमू लागली, तेव्हापासून आतापर्यंत मी माझ्या प्रत्येक गाण्यात डीिपग करतोय. मला माझी सहकलाकार अमृता सिंग हिने एकदा सांगितले होते की, हातापायाने नाचता आले नाही तरी चालेल पण, तुम्हाला मनापासून नाचता आले पाहिजे. आणि अजूनही मी तो मंत्र पाळतो आहे. जर नृत्याने तुम्हाला आनंद मिळत असेल तर इतर कोणतीही शक्ती तुम्हाला नृत्य करण्यापासून थांबवू शकत नाही, असा विश्वासही चाहत्यांना किंग खानने दिला आहे.

Story img Loader