रोल..कॅमेरा..अ‍ॅक्शन.. त्यांच्या या तीन शब्दांच्या हुकमावरून सेटवरची सर्व सूत्रे हलण्यास सुरुवात होते. एखाद्या जहाजाची दिशा त्याचा कप्तान ठरवितो, त्याप्रमाणे दिग्दर्शक हा मालिका तसेच चित्रपटाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलत असतो. अनुराग कश्यप, करण जोहर, इम्तियाज अली यांसारख्या दिग्दर्शकांचे चित्रपट त्यांच्या नावाने ओळखले जातात, मालिकांच्या दिग्दर्शकांचे नाव मात्र कायम अंधारात राहते. आज एखादी मालिका किमान एक ते दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते. तिच्या यशाचे सर्व श्रेय मालिकेचे कलाकार आणि निर्माते घेऊन जातात. गेल्या काही वर्षांमध्ये मालिकांचे क्षेत्र झपाटय़ाने वाढत गेले आहे. दर दिवसागणिक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वाहिन्यांमधील स्पर्धेनेही जोर धरला आहे. मध्यंतरी मालिकांच्या सेटवर अचानकपणे दिग्दर्शक बदलला गेल्याच्या घटना माध्यमांमध्ये पसरू लागल्या. त्यात दिग्दर्शकांवरील कामाच्या ताणामुळे त्यांचे आजारी पडणे नित्याचे होऊ लागले. या पाश्र्वभूमीवर मालिकांच्या दिग्दर्शकांची भूमिका आज काय आहे, याचा घेतलेला हा मागोवा.   

कामाच्या ताणामुळे प्रसिद्धीवलयापासून दूर
दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून मालिका आकार घेत असते. गेल्या काही वर्षांमध्ये मालिकांचे क्षेत्र झपाटय़ाने वाढत गेले. नव्या मालिका, नवे विषय, नवी मांडणी यांमुळे टीव्ही चित्रपटांपेक्षा वरचढ होत आहे. मालिकांमध्ये नवे प्रयोगही होऊ लागले. पण या सर्व प्रयोगांबाबतची निर्माते आणि वाहिन्यांची संकल्पना कलाकारांच्या माध्यमातून छोटय़ा पडद्यावर लोकांपर्यंत पोहोचविण्यामध्ये मुख्य भूमिका साकारणारे मालिकांच्या दिग्दर्शकांचे नाव अंधारात राहिले. ‘दिवसाचे १२ तास चित्रीकरण, त्यामध्ये लेखकाशी पटकथेवर चर्चा, वाहिनीच्या मागण्या, कलाकारांच्या वेळा हे सर्व सांभाळत दिवसाला २० ते २५ मिनिटांचा भाग तयार करून देण्याची शर्यत दिग्दर्शकाच्या नशिबी रोजचीच असते. पण त्याही पलीकडे टीआरपीच्या चढत्या-उतरत्या आलेखावरून त्यांचे भवितव्य ठरत असते. त्यामुळे ही सर्व गणिते सांभाळताना दिग्दर्शकाचे नाव अंधारात जाणे क्रमप्राप्तच असते,’ असे दिग्दर्शक केदार साळवी सांगतात. कित्येक मालिकांसाठी एकाऐवजी शिफ्टनुसार दोन किंवा तीन दिग्दर्शक असतात. दिग्दर्शकांच्या संख्येवरून मालिकेच्या दर्जामध्ये फरक पडत नसल्याचा समज निर्मात्यांमध्ये असल्याने त्यांच्यासाठी ही क्षुल्लक बाब असते, असे दिग्दर्शक सांगतात. त्यामुळे स्वत:चे काम प्रमाणिकपणे करणे, हेच दिग्दर्शकाच्या हाती असते. काही मोजके बडे दिग्दर्शक सोडता, मालिकांमधील दिग्दर्शकांची नावे अज्ञातवासातच आहेत.

विनोदी मालिकांची परिस्थिती काहीशी उत्तम
दैनंदिन मालिकांच्या तुलनेत विनोदी मालिकांच्या बाबतीत दिग्दर्शकांची परिस्थिती काहीशी उत्तम असल्याचे वाघमारे सांगतात. विनोदी मालिकांमध्ये केवळ कलाकारांकडून संवाद वदवून घेण्यासोबत हावभावातून विनोदाची निर्मिती करायची असते. त्यामुळे कित्येक दिग्दर्शक विनोदी मालिका स्वीकारायला घाबरतात. म्हणून स्पर्धेचे स्वरूप कमी आहे.

‘पर डे’चा झगडा
मालिकेतील इतर तंत्रज्ञांप्रमाणे दिग्दर्शकालाही प्रतिदिवसाप्रमाणे मानधन मिळते. त्यांना कामाचे पैसे नव्वद दिवसांनंतर मिळतात. या प्रतिदिवसाच्या मानधनासाठी दिग्दर्शकाची धडपड असतेच. दैनंदिन मालिकांच्या दिग्दर्शकांची संख्या मोठी आहे. मराठीमध्ये साधारणपणे दिग्दर्शकाला जास्तीत जास्त दिवसाचे सात हजार रुपये मिळतात. नवखे दिग्दर्शक दोन हजार मानधनामध्ये काम करायला तयार होतात. हिंदीमध्ये मानधन वीस ते पंचवीस हजारांच्या घरात जाते. त्यामुळे सध्या दिग्दर्शकांना हिंदीचे आकर्षण जास्त आहे. पण काम कमी आणि दिग्दर्शक जास्त अशी परिस्थिती असल्याने एकाने ब्र काढायचा प्रयत्न केला की, त्याच्या जागी दुसऱ्याला आणले जाते. त्यामुळे हातातील कामं टिकवून ठेवण्यासाठी सर्वचजण गपगुमान काम करत असल्याचे, देशपांडे सांगतात. निर्मातेसुद्धा कमी मानधन घेणाऱ्या नव्या दिग्दर्शकांना पसंती देतात. मालिकेचा टीआरपी डगमगला तरच अनुभवी दिग्दर्शकाला काही दिवसांसाठी पाचारण केले जाते.
‘जहाजाचा कप्तान’ ही संकल्पनाच कालबा
यंत्रवत मालिका तयार करण्याच्या कारखान्यामध्ये दिग्दर्शक ‘जहाजाचा कप्तान’ असतो, ही संकल्पनाच कालबाह्य होऊ लागली असल्याचे दिग्दर्शक रवींद्र गौतम सांगतात. दिग्दर्शकाच्या हातातील अधिकार काढलेले आहेत. वाहिनीने मान्य केलेली पटकथा दिग्दर्शकाच्या हातात सोपवली जाते, त्यावरून त्यांना त्या दिवसाचा भाग चित्रित करायचा असतो. त्यामुळे मालिकांमधून वाहिनीशी किंवा निर्मात्यांशी पटले नाही, तर अचानकपणे दिग्दर्शक बदलण्याचे प्रकार सर्रास ऐकायला मिळतात. नुकताच अशाच वादामुळे ‘जय मल्हार’ मालिकेचा दिग्दर्शक बदलण्यात आला. तर ‘प्रीती परी तुजवरी’ मालिकेतही अरिंजय सरोदेंच्या निधनानंतर चार दिग्दर्शक बदलण्यात आले. ‘तू मेरा हिरो’ या मालिकेच्या सुरुवातीच्याच काही भागांमध्ये दहा दिग्दर्शक बदलण्यात आले. तर ‘दिया और बाती हम’च्या दिग्दर्शकाने मालिकेतील तोचतोचपणाला कंटाळून स्वत:हून मालिका सोडली. महिनाभराच्या कालावधीमध्ये दिग्दर्शकांना पंचवीस ते तीस दिवसांचे चित्रीकरण तयार करायचे असते. त्यामुळे लेखक, वाहिनीच्या अधिकाऱ्यांसोबत बसून मालिकेच्या कथानकाविषयी चर्चा करण्याची संधी त्यांना मिळतच नाही. कोणताही ठोस विचार न करता चित्रित केलेल्या या मालिकांच्या दर्जामध्ये यामुळे नक्कीच फरक पडतो, असे दिग्दर्शक विवेक देशपांडे सांगतात.

व्यसनाधीनता येथेही आहेच
 असुरक्षितता या क्षेत्राची सर्वात कमकुवत बाजू आहे. त्यामुळे दुसऱ्या दिग्दर्शकाच्या पुढे पळण्याच्या शर्यतीत अनेकजण व्यसनाधीनतेचे शिकार होतात. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम उरकण्यासाठी कित्येक एनर्जी ड्रिंक्सने झोप, सुस्ती मारली जाते. काम संपल्यावरही विश्रांती घेण्याऐवजी ‘श्रम परिहारा’साठी दारू, सिगारेटची मदत घेतली जाते. या सर्वाचा परिणाम म्हणून व्यसनाधीनता दिग्दर्शकांच्या आयुष्याचा एक भाग बनत चालल्याचे देशपांडे सांगतात. त्यातून अनेक आजारांना आमंत्रण दिले जाते.

वाहिनीचे अवास्तव नियंत्रण
रवींद्रच्या सांगण्यानुसार एका मालिकेच्या पहिल्या भागाच्या चित्रीकरणाच्या वेळेस चित्रीकरणानंतर संकलनामध्ये त्याला समाविष्टच करून घेण्यात आले नाही. मालिका छोटय़ा पडद्यावर कशी सादर होईल हे दिग्दर्शकाला ठाऊकच नसते. ही परिस्थिती जवळपास सर्वच मालिकांच्या सेटवर असते. कित्येकदा दिग्दर्शकांना अंतिम भाग बघण्यात स्वारस्यही नसते. कॅमेरा कसा असावा, कोणाचा चेहरा किती क्लोजअपमध्ये हवा याबद्दल वाहिनीच्या अवास्तव हस्तक्षेपामुळे दिग्दर्शकाला आपले काम योग्यरितीने करण्याची संधीच मिळत नाही. ‘क्रिएटिव्ह डायरेक्टर’ नामक वाहिनीतील व्यक्ती सध्या दिग्दर्शकाच्या मुळावर बसली आहे. सेटवर दिग्दर्शकांपेक्षा यांच्या बोलण्याला जास्त महत्त्व दिले जाते, कारण हे वाहिनीचे प्रतिनिधी असतात, असे दिग्दर्शक राजन वाघमारे सांगतात.

संघटना आहे, पण नावापुरती  
इतर सर्व तंत्रज्ञांप्रमाणे दिग्दर्शकांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या संघटनाही आहेतच. पण त्या सर्वाना पैसे मिळविण्यासाठी समोरच्याला दमदाटी करणे, हेच कार्य करतात. आताही सेटवर नजर टाकल्यास तंत्रज्ञ अस्वच्छ वातावरणामध्ये काम करत असल्याचे स्पष्ट दिसते. खाण्यापिण्याची योग्य सोय नसते. पण त्याकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष करून केवळ पगारात वाढ करण्याची मागणी करण्यास संघटनांनी महत्त्व दिल्याचे देशपांडे सांगतात. दिग्दर्शकांच्या मूलभूत हक्कांसाठी भांडण्यासाठी संघटनांचे कार्य फार कमी  प्रमाणात दिसतं. संघटनांचे वर्चस्व योग्य ठिकाणी दाखविण्याची गरज दिग्दर्शक बोलून दाखवितात.

दिग्दर्शकांनीच मर्यादा आखायला हव्या
काम, पैसे मिळविण्याची धडपड असो, किंवा निर्माते, वाहिनीचे लाडके बनण्यासाठी आणलेला आव या सर्व कारणांमुळे मालिकेतील दिग्दर्शकांचे स्थान अशाश्वत झाले आहे. पण याला दिग्दर्शकच जबबादार असल्याचे वाघमारे सांगतात. कामाच्या वेळा, मानधन याबद्दल एकमेकांशी भांडण्यापेक्षा दिग्दर्शकांनी वाहिन्यांना शिस्त लावून देण्याची गरज आहे. त्याखेरीज त्यांच्या जीवनशैलीत बदल येणार नाही. पण नव्या येणाऱ्या दिग्दर्शकांना मिळणारी प्रसिद्धी, पैसा यापुढे हे लक्षात घेत जात नसल्याचे देशपांडे सांगतात.

Story img Loader