भारतीय रंगमंच कलाकार आणि चित्रपट अभिनेता आदिल हुसैन यांचे मानणे आहे की, आंग ली च्या ‘लाइफ ऑफ पाय’ या चित्रपटामधील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास मदत झाली आहे.
‘इश्किया’, ‘इंग्लिश विंग्लिश’ आणि ‘दी रिल्क्टंट फंडामेंटलिस्ट’ अशा चित्रपटांत प्रभावी भूमिका करणारे हुसैन यांनी ‘लाइफ ऑफ पाय’मध्ये प्रमुख भूमिका करत असलेला अभिनेता सूरज शर्मा याच्या वडिलांची भूमिका केली आहे. या चित्रपटाचा गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय प्रिमीयर झाला, तेव्हापासून या चित्रपटाबाबत चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत.
हुसैन म्हणाले, “करिअरबाबत मी जास्त विचार करत नाही. जर मी या बाबत विचार केला असता तर मी खूप आधिच मुंबईत आलो असतो.” ‘लाइफ ऑफ पाय’मुळे आपण अधिक चर्चेत येऊ आणि चांगल्या भूमिकांचे प्रस्ताव आपल्याकडे येतील, असा विश्वास हुसैन यांना वाटतो.
माझ्यासारख्या अनेक कलाकारांना लोक जास्त ओळखत नाहीत किंवा ते चर्चेचा विषय बनु शकत नाहीत, असंही ते म्हणाले.
कायम नाटकांत भूमिका करणा-या हुसैन यांना त्यांच्या मित्राद्वारे ‘लाइफ ऑफ पाय’मध्ये काम करण्याची संधी मिळाली.
त्यांनी  ‘लाइफ ऑफ पाय’मध्ये प्रमुख भुमिका करणा-या दिल्लीच्या सूरज शर्मा याच्या अभिनयाचे ही कौतुक केले. गोवा चित्रपट महोत्सवाचा समारोप मीरा नायर यांच्या ‘द रिल्क्टंट फंडामेंटलिस्ट’ या चित्रपटाद्वारे होणार आहे, यामध्ये हुसैन यांचीही भूमिका आहे.

Story img Loader