आपल्या रोजच्या जगण्याशी, समाजाशी संबंधित असे खूप महत्त्वपूर्ण विषय आपल्या आजूबाजूला आहेत. हे विषय प्रत्येकवेळी कलात्मक माध्यमातून मांडणी करणं शक्य होतंच असं नाही. मात्र खरोखरच चित्रपट माध्यमातून लोकांसमोर यायलाच हवा असा विषय लेखक – दिग्दर्शकाला सापडतो तेव्हा पडद्यावर आणताना त्यात कलात्मक मूल्यं असायला हवीत याचं भान ठेवावं लागतं. अन्यथा अनेकदा विषय खोल असला तरी चित्रपटासारख्या दृश्य माध्यमाची ताकद लक्षात घेऊन त्याची मांडणी झाली नाही तर त्याचा हवा तितका प्रभाव चित्रपटात जाणवत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहिल शिरवईकर लिखित-दिग्दर्शित ‘लाईफलाईन’ चित्रपट पाहताना हे तीव्रतेने जाणवतं. ‘लाईफलाईन’ या चित्रपटाचा विषय त्याच्या प्रोमोमधून चटकन जाणवत नाही. त्यात दाखवल्याप्रमाणे विज्ञानवादी भूमिका असलेला डॉक्टर आणि धार्मिक रूढी-परंपरांना कवटाळून बसलेला किरवंत यांच्यातील संघर्ष कथेच्या केंद्रस्थानी आहे, मात्र ती मुख्य कथा नाही. किरवंत म्हणून सतत समाजाकडून, आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांकडून हिणवलं गेल्याने त्यांच्यावर राग धरून असणाऱ्या, त्यांना खिजवत राहणाऱ्या केदारनाथ अग्निहोत्री यांची गोष्ट चित्रपटात आहे. भगवंतानंतर किरवंत म्हणत अहंभावनेने वावरणाऱ्या केदारनाथ यांच्या हेकेखोर, कटकट्या स्वभावामुळे आजूबाजूचे लोक त्यांच्याशी बोलत नाहीत. लहानपणी लोकांनी हिणवल्याचं शल्य त्यांच्या मनात इतकं घर करून बसलं आहे की काळ बदलला आहे, लोकही बदलले आहेत, आपण राग धरून बसलो आहोत त्यामुळे सगळेच वाईट असल्याचं आपल्याला भासतं आहे हे त्यांच्या ध्यानीही येत नाही. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांची पत्नीही एकटी पडली आहे.

किरवंत म्हणजे श्रेष्ठ. माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे अंत्यविधी योग्य रितीने पार पडलेच पाहिजेत. त्यात कुणीही अडसर आणता कामा नये, अगदी कावळ्यासाठी ठेवलेला पिंडाचा नैवेद्या रस्त्याच्या कडेल्या बसलेल्या भूकेकंगाल मुलांनी खाल्ला तरी त्यांना त्यांचा राग येतो. त्यांच्या याच रुढीवादी धारणेतून समाजोपयोगी कार्य करून पाहणाऱ्या डॉक्टरला ते कडाडून विरोध करतात. त्याचे वैज्ञानिक विचार म्हणजे थोतांड असल्याचे सांगत त्याच्यावर वैयक्तिक चिखलफेक करतात. अखेर आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी याच डॉक्टरचे पाय धरण्याची वेळ केदारनाथ यांच्यावर येते, असं काहीसं कथानक या चित्रपटात आहे.

हेही वाचा >>>छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचं ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकात पुनरागमन! खुनाचा कट उलगडण्यासाठी खाकी वर्दीत

अर्थात, वर उल्लेख केल्याप्रमाणे डॉक्टर आणि किरवंत यांच्यातील संघर्ष म्हणजे चित्रपटाची मुख्य कथा नाही. या चित्रपटातून अवयवदानासारख्या एका महत्त्वाच्या विषयाला लेखक – दिग्दर्शक साहिल शिरवईकर यांनी हात घातला आहे. हा चित्रपट त्यांना वैयक्तिक आयुष्यात आलेल्या एका अनुभवावरून प्रेरित आहे. त्यामुळे एकीकडे माहितीपटाप्रमाणे त्याची रटाळ मांडणी होऊ नये यासाठी किरवंत आणि डॉक्टर यांच्यातील वैचारिक संघर्षनाट्याचा उपयोग लेखक – दिग्दर्शकाने कथा खुलवण्यासाठी केला आहे. पण हे नाट्य सोडलं तरी एकूणच पटकथेची बांधणी आणि दिग्दर्शकीय मांडणी ही सरधोपट पद्धतीने केली असल्याने त्यातलं नाट्य महत्त्वाचं असलं तरी ते प्रभावीपणे मनाला भिडत नाही. हा विषय रंगवताना एकीकडे जो विषय खऱ्या अर्थाने मांडायचा आहे तो आणि त्यासाठी वापरलेलं संघर्षनाट्य या दोन्ही गोष्टी आपापल्या परीने तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे नेमका भर कुठे द्यायचा हे माहिती असूनही प्रत्यक्षात दुसऱ्याच गोष्टीवर विशेषत: केदारनाथ यांच्या व्यक्तिरेखेवर दिलेला अधिक भर यामुळे चित्रपटाचा तोल ढासळला आहे. त्यामुळे विज्ञानवाद की अंधश्रद्धा यातील द्वंद्व रंगवतानाही ते बव्हंशी अवयवदान या विषयापुरतंच मर्यादित आहे.

मुळात केदारनाथ कट्टर धार्मिक असले, तरी ग्रह-ज्योतिष याबद्दल बोलताना त्यात फारसं तथ्य नसतं हे त्यांनाही अनुभवातून मान्य असल्याचं काही प्रसंगातून दिग्दर्शकाने दाखवून दिलं आहे. त्यामुळे केवळ केदारनाथ यांचा हेकेखोरपणा आणि सोयीने धार्मिक मत-मतांतरांची केलेली मांडणी शेवटी त्यांच्या अधिक अंगलट येते हे ठळकपणे जाणवतं. केदारनाथांच्या भूमिकेत माधव अभ्यंकर आणि डॉक्टर विक्रम देसाई यांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची निवड करत अर्ध्याहून अधिक लढाई दिग्दर्शकाने जिंकली आहे. या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवण्याची संधी निश्चितच हा चित्रपट देतो. किंबहुना, त्यांच्या अभिनयाने चित्रपट तोलून धरला आहे हे म्हणणं सयुक्तिक ठरेल. चित्रपटाच्या मूळ विषयाची जाणीवही दिग्दर्शकाने त्याच्या कथेच्या माध्यमातून करून दिली आहे. मात्र त्यापलीकडे जात आपल्या आयुष्यात नेमकी कोणती भूमिका (लाईन) घ्यायला हवी हे सांगण्याचा प्रयत्न तोकडा पडला आहे. त्यामुळे एका परिचित वळणाने जाणारा, साचेबद्ध मांडणी असलेला चित्रपट एवढाच मर्यादित अनुभव चित्रपट देतो.

लाईफलाईन

दिग्दर्शक – साहिल शिरवईकर

कलाकार – अशोक सराफ, माधव अभ्यंकर, भरत दाभोळकर, हेमांगी कवी, जयवंत वाडकर सुश्रुत मंकणी, संध्या कुटे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lifeline movie directed sahil shirwaikar ashok saraf amy