दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा त्याच्या ‘लाइगर’ चित्रपटामुळे सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे, ज्याची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. विजय देवरकोंडा मागच्या काही दिवसांपासून ‘लाइगर’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. चित्रपट प्रमोशनासाठी विजय ज्या ठिकाणी गेला त्या प्रत्येक ठिकाणी त्याने साधी चप्पल घातलेली दिसली, पण आता विजयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यावरू त्याला ट्रोल केलं जातंय आणि याचं कारण विजयने प्रमोशनच्या वेळी चप्पल वापरण्याशी संबंधीत आहे.
विजय देवरकोंडा नुकताच मुंबईमध्ये दिसला. यावेळी त्याने काळ्या रंगाचा प्रिंटेड शर्ट आणि निळी डेनिम पँट परिधान केली होती. पण सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते विजयच्या फूटवेअरने. आतापर्यंत विजय प्रत्येक प्रमोशन कार्यक्रमात साधी चप्पल घालून जाताना दिसला होता. त्याच्या या साधेपणाचं बरंच कौतुकही झालं. असं करण्यामागचं कारण विजयच्या स्टायलिस्टने सांगितलं होतं. “प्रमोशनसाठी आपला लूक चित्रपटातील पात्रासारखा असावा अशी विजयची इच्छा होती. त्यामुळे प्रत्येक प्रमोशनल इव्हेंटसाठी त्याचा असा लूक फायनल करण्यात आला होता.” असं त्याच्या स्टायलिस्टनं म्हटलं होतं.
आणखी वाचा- अन्नू कपूर यांना माहीत नाही कोण आहे आमिर खान? पाहा काय म्हणाले अभिनेता
आता विजय देवरकोंडाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विजयला चप्पल नाही तर शूजमध्ये पाहिल्यानंतर युजर्स वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलं, ‘अखेर विजयला शूजमध्ये पाहण्याची संधी मिळाली’, तर दुसऱ्याने लिहिले, ‘मग आता चप्पल नाही? चित्रपटाचे प्रमोशन संपलंय का?’ याशिवाय आणखी एक युजरनं आपल्या कमेंटमध्ये, ‘चप्पलची नाटकं संपली, तो पुन्हा शूज वापरताना दिसत आहे.’ असं म्हटलं आहे. तर काही चाहते मात्र विजयच्या या लूकचं कौतुक करत आहेत.
आणखी वाचा- Video : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा मराठी भाषेच्या प्रेमात, म्हणाला “नमस्कार मुंबई…”
पुरी जगन्नाथ दिग्दर्शित ‘लायगर’ चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजय एमएमए फायटरची भूमिका साकारत असून त्याच्यासोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात माईक टायसन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.