पंकज भोसले
केसी अॅफ्लेकच्या ‘लाईट ऑफ माय लाइफ’च्या आरंभीचा तब्बल बारा मिनिटांचा भाग हा आज जगभरातील कुटुंबात अस्तंगत होत चाललेल्या दृश्याचा आहे. झोपण्यापूर्वी बापाकडून मुलीला मोठय़ा पल्ल्याची गोष्ट सांगण्याचा. चित्रपटात नाव नसलेला बाप (केसी अॅफ्लेक) आपल्या रॅग (अॅना प्निवोस्की) या दहा-अकरा वर्षीय मुलीला जगबुडीतून प्राणिमात्रांना वाचविल्या जाणाऱ्या प्रसिद्ध नोआच्या जहाजाची कथा पूर्णपणे बदलून सांगताना दिसतो. जहाजाच्या कथेमध्ये लबाड कोल्ह्य़ाला हुशार बनविण्याचे उपकथानकही येते. ऐकताना समरस झालेल्या रॅगला गोष्टीतील बदल रुचतो. पण सुरू होताना नायिकाप्रधान असलेली कथा नकळत नायकप्रधान झाल्याचे ती बापाला लक्षात आणून देते, तेव्हा नायिकाप्रधान कथानक फार किचकट बनले असल्याची हतबलता बापाकडून व्यक्त होते.
‘लाईट ऑफ माय लाइफ’च्या आरंभीच्या या लांबोडक्या दृश्यावरून चित्रपटाचा विषय उमजायला थोडा वेळ लागला, तरी त्याची तीव्रता लक्षात यायला मदत होते. बाप-लेकीचा हा चमू अत्यंत किर्र जंगलात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यात कसल्याशा दहशतीखाली वावरताना दिसतो. सतत कोणत्याही क्षणी उद्भवू शकणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी त्याची तयारी सुरू असते. विशेष म्हणजे त्याच्या लेकीला पेहराव आणि केशरचनेत फेरफार करून तंतोतंत मुलासारखे बनविलेले असते. अन् वाटेत कुणी सापडला तर त्याला आपला मुलगा म्हणून ओळख करून देत हा बाप शिताफीने आपली जागा बदलत असतो.
प्राणघातक रोगाने उद्ध्वस्त झालेल्या शहरांतून बचावासाठी जंगलात आसरा घेणाऱ्या मानवी कथांच्या विषयांवर कित्येक चित्रपट अलीकडच्या काळामध्ये आले आहेत. पर्यावरण ऱ्हास, मानवाकडून होणाऱ्या अनाठायी वृक्षतोडीमुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींतून बचावलेल्या व्यक्तींच्या जगण्याच्या लढाया सुटकापटांमध्ये समाविष्ट होतात. ‘लिव्ह नो ट्रेस’, ‘ए क्वाईट प्लेस’ यांसारख्या सिनेमांमध्ये प्रचंड हायव्होल्टेज तणाव निर्माण करून हा चित्रप्रकारच फार वेगळ्या प्रकारे हाताळण्यात आला आहे. ‘लिव्ह नो ट्रेस’मध्ये युद्धातून परतलेला बाप समाजातील तणाव आणि हिंसेच्या वातावरणाला कंटाळून आपल्या मुलीला वाढविण्याचे सुरक्षित स्थान म्हणून जंगलामध्ये राहण्याचे स्वीकारतो. तर ‘ए क्वाईट प्लेस’मध्ये अमानवी शक्ती मानवी संवादाचा माग काढत त्यांना सावज करीत असल्याने आख्खे कुटुंब जिवंत राहण्यासाठी जंगलाचा आधार घेताना दिसतात. ‘लाईट ऑफ माय लाइफ’मधला जंगलप्रवास या चित्रपटांसारखाच असला, तरी तो निव्वळ सुटकापट नाही. पर्यावरण संदेशाचा त्याचा इरादा नाही. ही बाप-लेकीची अभावुक तरी खिळवून ठेवणारी कहाणी आहे.
इथे मानवी शहरांमध्ये विचित्र आजाराने महिलांचा मृत्यू झाला असून पृथ्वीवरील लोकसंख्या त्यामुळे निम्म्यावर आलेली आहे. बाईविना साऱ्या बाप्यांनी उरलेल्या जगामध्ये रोगांपासून आश्चर्यकारकरीत्या बचावलेल्या आपल्या लहान मुलीला समाजापासून वाचवण्यासाठी जंगलांशिवाय कोणताही पर्याय इथल्या बापाकडे उरत नाही. तो तिला मुलासारखा पेहराव करून अनेक वर्षे जंगलांमध्ये तिचे पालनपोषण करतो. मात्र अकराव्या वर्षी आवाजापासून तिच्या शरीरामध्ये लवकरच होऊ घालणाऱ्या बदलाची जाणीव करून देणे त्याला महत्त्वाचे वाटत असते. चित्रपट रॅगच्या पौगंडावस्थेच्या सीमेवर असताना सुरू होतो.
लेक जवळ असलेली कादंबरी वाचून आपल्या बापाला त्यातल्या न समजणाऱ्या विषयांवर चर्चा करीत असते. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठीच बापाला सतत जंगलामध्ये जागा बदलण्याचा खटाटोप करावा लागत असल्याची बोच तिला वाटत असते. चित्रपटाला एकसलग कथा नाही. दोघांची संयत आणि संवादी भटकंती सुरू राहते. निर्जन गावांमध्ये, आजारांच्या फैलावामुळे टाकून दिलेल्या घरांमधून त्यांचा वावर सुरू राहतो. अतीव गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी एकदाच ते दोघे मानवी वसाहतींमध्ये जातात. तेथे रॅगकडे पाहिल्या जाणाऱ्या संशयी नजरांनी त्यांना लवकरच तिथून काढता पाय घ्यावा लागतो.
संपूर्ण चित्रपट हा रॅगचे लिंग इतरांना समजू न देण्यासाठी केला जाणारा प्रवास आहे. अन् त्याच वेळी बापाकडून भवतालातील मानवी क्रूरपणाची, निसर्गाच्या सहज घडणाऱ्या बाबींची आणि शरीरधर्माच्या घडय़ाळाची शिकवण लेकीला मिळण्याची प्रक्रिया उलगडण्यात आली आहे. स्त्री मासिकधर्म, स्त्री-पुरुष संबंधांतून मूल होण्याची घटना, या आईने मुलीला सांगण्याच्या गोष्टी बापाकडून सांगितल्या जातानाचा प्रसंग आत्यंतिक संवेदनापूर्ण रंगविण्यात आला आहे.
केसी अॅफ्लेक या अभिनेत्यावर काही वर्षांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला होता. त्या आरोपांनी तयार झालेल्या वादग्रस्ततेवर मात करीत ‘मॅन्चेस्टर बाय द सी’ या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कारही मिळविला होता. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही आघाडींवर केसी अॅफ्लेक असलेला ‘लाईट ऑफ माय लाइफ’ ऑस्करमध्ये गेला नाही, तरी वेगळेपणामुळे वर्षभर चर्चेत राहील यात शंका नाही.