पंकज भोसले

आधुनिक समाजातील व्यंग आणि विरोधाभासी जगण्याचा आरसा दाखविण्यासाठी झॉम्बी या अंत्यत मठ्ठ भुतावळींचा वापर ‘शॉन ऑफ द डेड’ नामक ब्रिटिश चित्रपटातून  यशस्वीपणे झाला. त्यानंतर या चित्रप्रकाराला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळणारी चित्रकर्त्यांची पिढीच गेल्या दीड दशकामध्ये देशोदेशी झॉम्बी सिनेमा गाजवत आहेत. गंमत म्हणजे घासून-गुळगुळीत केल्यानंतरही या चित्रप्रकारामध्ये नवनवीन कल्पनांचा ओघ थांबलेला नाही. नॉर्वेमधील दिग्दर्शक टोनी विर्कोला याने ‘डेड स्नो’ चित्रपटातून बर्फात गोठलेली नाझीझॉम्बीची भुतावळ जागी करून एकाच वेळी विनोद आणि थराराची झोंबी लावून दिली. दक्षिण कोरियाई दिग्दर्शक योन सांग हो याच्या ‘ट्रेन टू बुसान’ चित्रपटात बुलेट ट्रेनमध्ये चालणाऱ्या भुतांच्या वेगवान कारवाया दाखविल्या. तर कलात्मकतेचा अतिसोस असलेल्या जिम जुरमाश या दिग्दर्शकाने याच वर्षांत ‘द डेड डोण्ट डाय’ या चित्रपटाद्वारे जग अंताची भलतीच बखर झॉम्बींना घेऊन मांडली.

Mike Tyson, YouTube Influencer, Netflix, Mike Tyson news, Mike Tyson latest news,
विश्लेषण : माजी जगज्जेता माइक टायसन यू-ट्यूब इन्फ्लुएन्सरकरडून पराभूत! लढत खरी होती की लुटुपुटूची? फायदा नेटफ्लिक्सचाच?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Amitabh Bachchan shouted at R Balki
दिग्दर्शकाच्या करिअरच्या पहिल्याच सिनेमाचा पहिलाच सीन; चिडलेले अमिताभ बच्चन त्याच्यावर सर्वांसमोर ओरडलेले अन्…
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
Maheep Kapoor gatecrashed Sanjay Kapoor party
‘वन नाईट स्टँड’साठी मद्यधुंद अवस्थेत पार्टीत शिरली, नशेतच त्याच्या कुटुंबाला…; कपूर कुटुंबाच्या सूनेने सांगितली लव्ह स्टोरी
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
stand up comedy in india
मनोरंजनाची तरुण परिभाषा

व्यक्तिरेखांची झॉम्बींपासून बचावासाठी धडपड आणि जीव वाचवण्याच्या शेवटच्या टप्प्यात आपण वाया घालविलेल्या आयुष्याची उपरती होण्याचा प्रकार या चित्रपटांमधील ओळखीचा कारभार. ‘शॉन ऑफ द डेड’मधील आळसभरल्या आणि ओंगळवाण्या जीवनशैलीचा अंगीकार करणाऱ्या मुख्य व्यक्तिरेखेसारखे कोणत्या ना कोणत्या व्यसनांत गुंतलेले, विकृत, समाजाने नाकारलेले, एकलकोंडे, विक्षिप्त-कुजके, पैशांच्या अफरा-तफरीत अडकलेले, स्त्री-लंपट असे अ-सामान्य या झॉम्बी सिनेमांमध्ये हटकून सापडतात. दरवर्षी डझनांवर झॉम्बी चित्रपट येतात पण त्यात या सर्व घटकांचे कडबोळे उत्तमरीत्या करणारे मोजके लक्ष वेधून घेतात. ऑस्ट्रेलिया-ब्रिटन-अमेरिका अशी संयुक्तिक निर्मिती असलेल्या आणि एब फोर्सायथ या दिग्दर्शकाचा ताजा चित्रपट ‘लिटिल मॉन्स्टर्स’ अनेकार्थाने लक्षवेधी आहे. ‘शॉन ऑफ द डेड’मधील मुख्य व्यक्तिरेखेतील अनेक अवगुणांमध्ये तंतोतंत साम्य असलेल्या यातील नायकाचा आणि चित्रपटातील कथानकाचा प्रवास फार वेगळा आहे. यामध्ये चिमुकल्या मुलांच्या सहलीमध्ये झॉम्बींचा वावर हा एका घाबरविणाऱ्या खेळाचा भाग असल्याचे मुलांना पटवून देत बचावलढाईची कल्पकता कौतुकास्पद आहे.

चित्रपटाची गोष्ट होते सर्वच बाबतीत अपयशी असलेल्या डेव्ह (अलेक्झांडर इंग्लंड) या कफल्लक संगीतकारापासून. भांडकुदळ प्रेयसीशी काडीमोड घेतल्यानंतर त्याची रवानगी बहिणीच्या घरामध्ये होते. शिवराळ भाषा आणि असभ्य वर्तनांमध्ये पटाईत असलेल्या डेव्हमुळे त्याच्या पाचवर्षीय भाच्यावर कुसंस्कार होऊ नयेत याची काळजी डेव्हची बहीण घेत असते. तरीही वाक्यागणीक आपल्या फ-आरंभिक शब्दांसह नवनव्या शिव्यांचे आणि प्रौढांच्या काम-व्यवहारांचे  सहज शिक्षण डेव्ह आपल्या भाच्याला करून देत असतो. त्यात रिकामटेकडेपणा मुबलक असल्याने भाच्याला शाळेत पोहोचविण्याची जबाबदारी आल्यानंतर तो मिस कॅरोलिन (लुपिटा न्याँगो) या बालवाडी शिक्षिकेच्या प्रेमात पडतो. आपल्यातील सर्व लंपटता एकवटत डेव्ह तिच्याशी अधिकाधिक ओळख करून घेण्यास आरंभ करतो. लवकरच त्याला मुलांच्या सहलीमध्ये मिस कॅरोलिनचा मदतनीस बनण्याची संधी मिळते आणि तिला गटवण्यासाठी थापांची प्रचंड मोठी पोतडी घेऊन डेव्ह सज्ज होतो. प्राणिसंग्रहालयामध्ये सहल घेऊन जाणाऱ्या बसमध्ये मिस कॅरोलिनच काय, तर इतर कोणत्याही लहान मुलाला डेव्ह आपल्या खोटय़ा कलाबाज्यांमध्ये रंगवू शकत नाही. सहलीच्या नियोजित स्थळी साऱ्या लहान मुलांना आवडणारी टीव्ही सेलिब्रेटी येणार असल्याने सारी पोरे आपल्या आवडीच्या कलाकाराला भेटण्यासाठी उत्सुक असतात. सहल प्राणिसंग्रहालयात पोहोचते. मिस कॅरोलिनच्या देखरेखीखाली सारी पोरे साखळी करून शिस्तीत आपल्या प्राणी कुतूहलाचे शमन करतात. बटाटा भाजी-श्रीखंड-पुरीसदृश आहार घेतात. कविता-गाणी आणि कलाप्रदर्शनाचा तासही छानपैकी उलटतो. त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांना उद्यानाची रपेट करून देणाऱ्या गाडीला अडथळा येतो. शेजारी असलेल्या प्रयोगशाळेतून उठलेल्या झॉम्बींच्या भुतावळींनी उद्यानभर रक्त उच्छाद मांडलेला असल्याचे डेव्ह आणि मिस कॅरोलिनच्या लक्षात येते. आपल्यावर जबाबदारी असलेल्या मुलांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी ते आटापिटा करतात. उद्यानातील काचेच्या भेटवस्तू केंद्रामध्ये मुलांना हलविण्यात येते. तिकडे मुलांमध्ये ‘हा उद्यानातील एका खेळाचा प्रकार असून झॉम्बी अस्तित्वातच नसतात’ हे बिंबविण्यात कॅरोलिन यशस्वी होते. मात्र काचेच्या दारांभोवती मरण घेऊन उभी ठाकलेली ओंगळवाणी भुते आत प्रवेश करेस्तोवर किती काळ मुलांना भीतीपासून दूर ठेवता येईल, याबाबत ती साशंक असते.

मुलांमध्ये लाडका असलेला सेलिब्रेटीदेखील या भेटवस्तू केंद्रामध्ये लपलेला असतो. झॉम्बींच्या रूपाने मरण दिसत असल्यामुळे त्याचे अत्यंत ओंगळवाणे स्वरूप या कठीण प्रसंगात समोर यायला लागते. तर याउलट डेव्ह हा कमालीचा समंजसपणा दाखवत वेगवेगळ्या बचावाच्या मार्गाना अवलंबायला लागतो. या दरम्यान डेव्हच्या भाच्याला त्याच्या बॅगेत असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या औषधाची गरज भासते. तेव्हा मिस कॅरोलिन हिरकणीच्या वरताण अवतार घेत झॉम्बींना थोपवून ते मिळविते. उद्यानातील झॉम्बीप्लेग संपविण्यासाठी लष्कर तेथे बॉम्बस्फोट घडविण्याची योजना आखते. तेव्हा झॉम्बी आणि लष्कर अशा दुकात्रीत सापडलेल्या सहलीच्या चमूला उद्यानातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी नवा मार्ग शोधणे भाग पडते. वाल्याचा वाल्मिकी होण्याची प्रक्रिया लिटिल मॉन्स्टर्समध्ये डेव्हच्या रूपाने उलगडते. तर मिस कॅरोलिन आणि डेव्ह या दोघांकडून आपल्या आयुष्यातील काळ्या बाजूंची खरीखुरी माहिती मांडून ओळख वाढविली जाते. व्हिडीओ गेमपासून ते व्यसनांच्या अनेक संदर्भाची इथे कथानकात छान पेरणी केली आहे. चित्रपटाचे मध्यवर्ती कथानक डेव्ह याचे असले, तरी मिस कॅरोलिन वठवणाऱ्या लुपिटा न्याँगो हिने चित्रपट ताब्यात घेतला आहे. सध्या झॉम्बी सिनेमा ढिगाने येत असले तरी अजिबात कंटाळा येणार नाही, इतका इथल्या भुताळी सहलीत विनोद आणि गमतीचा ऐवज आहे.