सुट्टीच्या दिवशी टीव्हीवर रोजच्याच सासू-सुनांच्या गोष्टी, गुन्हेवृत्त, चित्रपटांचा भडिमार, बातम्यांचा रतीब, चर्चा, रिअॅलिटी शोज या सगळ्यांना फाटा देऊन अख्खं कुटुंब त्या छोटय़ा पडद्यावर आपल्या लहानग्याबरोबर कोणत्यातरी ढोलकपूरच्या ‘छोटा भीम’चे पराक्रम पहात बसलेलं असतं, असं चित्र हल्ली घराघरातून सर्रास पहायला मिळतं. जरा आजूबाजूचा कानोसा घेतलात तर छोटा भीम, डोरेमॉन, बेन १०, कुंभ करन ही नावं फक्त मुलांनाच नाही तर त्यांच्या आईवडिलांनाही पाठ झालेली आहेत. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजेच या लहानग्या मुलांसाठी सुरू झालेल्या या कार्टुन वाहिन्यांनी आपलं चांगलंच बस्तान बसवलेलं आहे.
‘जीईसी’ (जनरल एंटरटेन्मेट चॅनेल्स)म्हणजे सर्वसाधारण कौटुंबिक मनोरंजन करणाऱ्या वाहिन्यांनंतर सगळ्यात जास्त प्रेक्षकसंख्या ही या लहान मुलांसाठीच्या वाहिन्यांची आहे. १९९५ साली ‘टर्नर इंटरनॅशनल’ कंपनीने भारतात ‘कार्टुन नेटवर्क’ ची सुरूवात केली. त्यानंतर चार वर्षांंनी १९९९ मध्ये ‘निक’ वाहिनी सुरू झाली. तरी मुलांची मदार ही ‘शक्तिमान’ आणि कधीतरी ‘टॉम अॅंड जेरी’, ‘चार्ली चॅप्लिन’ इथपुरतीच मर्यादित होती. गेल्या चार ते पाच वर्षांत हे चित्र पूर्णपणे बदललं असून आताच्या घडीला लहान मुलांसाठीच्या तब्बल ११ वाहिन्यांची भाऊगर्दी टीव्हीच्या छोटय़ा पडद्यावर झाली आहे आणि या प्रत्येक वाहिनीची प्रेक्षकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. २००६ साली या वाहिन्यांची प्रेक्षकसंख्या ही जीईसी वाहिन्यांच्या प्रमाणात १७.७ टक्के इतकी होती. आता हेच प्रमाण २१.२५ टक्के एवढे वाढले आहे. किंबहुना वेगाने वाढत चाललेल्या या प्रेक्षकसंख्येमुळे येत्या काही दिवसांत आणखीही नव्या वाहिन्यांची भर यात पडणार आहे. छोटय़ांची ही दुनिया एवढय़ा वेगाने का विस्तारतेय..
आपल्या देशात लहान मुलांची लोकसंख्या ही ३६४ दशलक्ष एवढी आहे. एकूण लोकसंख्येच्या ३५ टक्के संख्या ही ० ते १४ वर्ष   
वयोगटातील मुलांची आहे. आणि हा आकडा दरवर्षी ८ दशलक्ष इतक्या वेगाने वाढतो आहे. बदलत्या काळानुसार प्रत्येकाला शिक्षणाच्या बाबतीत असेल, आवडीनिवडीच्या बाबतीत असेल नाहीतर मनोरंजनाच्या बाबतीत असेल निवडीचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे घराघरातून पसरलेल्या या छोटय़ांच्या विश्वाला आपल्याशी बांधून ठेवण्यासाठी त्यांना विविध पर्याय द्यावे लागतील, हे या वाहिन्यांच्या लक्षात आले आहे. आणि म्हणूनच डिस्नेसारख्या कंपनीने एकाचवेळी चार वाहिन्या लहान मुलांसाठी सुरू केल्या आहेत. सर्वसाधारणपणे प्रेक्षकसंख्या मोजताना ४ ते ९ वर्षांचा वयोगट आणि १० ते १४ वर्षांचा वयोगट अशी ढोबळमानाने विभागणी केली जाते. पण, आज बाजारात तान्ह्या बाळापासून प्रत्येकासाठी काही ना काही तरी ‘प्रॉडक्ट’ तयार आहे. मग या ब्रॅंडना वाहिन्यांकडे वळवायचे असेल तर छोटे छोटे विभाग करायला हवेत, हे लक्षात घेऊन वाहिन्यांनी २ ते ६, ७ ते ९ आणि मग दहा वर्षांवरील मुले आणि प्रौढांना एकत्र आणू शकेल अशारितीने वाहिन्यांची विभागणी केली आहे. सध्या टीव्हीवर ‘प्री स्कूल’ म्हणजे नर्सरीत जाणाऱ्या मुलांसाठीही ‘डिस्ने ज्युनिअर’ आणि ‘निक ज्युनिअर’ अशा दोन वाहिन्या सुरू आहेत. अजूनही वाहिन्यांना जाहिरातीतून मिळणारी रक्कम ही कमी असली तरी लहान मुलांसाठी असलेल्या जास्तीत जास्त उत्पादनांना वाहिन्यांपर्यंत आणण्यासाठी त्यांचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच फक्त मुले नाही तर त्यांचे आईवडिलही प्रेक्षक म्हणून सहभागी असावेत यासाठी १० ते १४ वयोगटातील मुलांसाठीच्या वाहिन्यांनी आपल्या कार्यक्रमांच्या स्वरूपात मुलभूत बदल केले आहेत.
मुलांसाठीच्या वाहिन्या लोकप्रिय होण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे ‘अॅनिमेशन’ असल्याचे या वाहिन्यांच्या तज्ञांचे म्हणणे आहे. मुलांवर असणारा अभ्यासाचा आणि विविध क लागुण विकसित करण्याचा ताण यातून त्यांना खरोखरच मोकळं होण्यासाठी अॅनिमेटेड कार्यक्रम हे मोठे वरदान ठरले आहे. अॅनिमेशन मालिकांमुळे एक अख्खी काल्पनिक दुनिया त्यांच्यासमोर उभी राहते. मग यात इथला ‘छोटा भीम’ असतो, परदेशातला ‘बेन १०’ असतो आणि ‘डोरेमॉन’ही असतो. त्यामुळे हे अॅनिमेटेड कार्यक्रम पुन्हा पुन्हा पाहिले तरी मुलांना कंटाळा येत नाही. थेट चित्रण असलेल्या मालिकांपेक्षा अॅनिमेटेड कार्यक्रमांना जास्त मागणी असल्याचे ‘डिस्ने’च्या कार्यक्रम संचालिका देविका प्रभु सांगतात. पण, त्यातही या अॅनिमेटेड मालिकांची भाषा, त्यातल्या व्यक्तिरेखा फार महत्वाच्या असतात. म्हणून सध्या स्थानिक व्यक्तिरेखांना जास्त महत्व दिले जाते. आपल्यातीलच एक वाटतील असे कॅरेक्टर्स, आपल्याला रोजचे असणारे संदर्भ मग त्यांची शाळा, बाजार, घरे यामुळे मुलं या कार्यक्रमांमध्ये जास्त ओढली गेली, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे एकीकडे डिस्ने वाहिनीवर ‘बेस्ट ऑफ लक निक्की’ आणि त्याचवेळी ‘डिस्ने एक्सडी’ वाहिनीवर ‘वीर : द रोबोट’ या दोन्ही मालिकांना चांगला प्रतिसाद मिळाला, असे त्यांनी सांगितले. गेल्यावर्षी ‘छोटा भीम’मुळे वर्चस्व गाजवणाऱ्या ‘पोगो’ वाहिनीनेही ‘कुंभ करन’. ‘छोटा चिंटू बडा फेकू’ सारख्या वेगवेगळ्या देशी व्यक्तिरेखा अॅनिमेशन मालिका आणि छोटय़ा छोटय़ा चित्रपटरूपातून आणल्या. मात्र, आता देशी व्यक्तिरेखांचाही ट्रेंड बदलत चालला असल्याचे देविका प्रभु यांचे म्हणणे आहे. त्यामुळे डिस्नेवर ‘मिकी माऊस’च्या लघुकथा, ‘जेक अॅंड नेव्हरलॅंड पायरेट्स’ सारख्या कार्यक्रमांनाही चांगली प्रेक्षकसंख्या असल्याचे प्रभु यांनी सांगितले. त्यामुळे डिस्ने एक्सडीवरच्या ‘निंजा वॉरिअर’सारख्या ‘माव्र्हल’ कॉमिक बुकवर आधारित लोकप्रिय व्यक्तिरेखांच्या मालिका तशाच पुढेही सुरू राहतील, असे त्यांनी सांगितले. ‘टर्नर वाहिनी’चे नेटवर्क प्रमुख कृष्णा देसाई यांनीही सध्या देशी आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तिरेखांना एकच प्रतिसाद मुलांक डून मिळत असल्याचे सांगितले. म्हणून ‘पोगो’ वर ‘छोटा भीम’ जोरात असला तरी ‘कार्टुन नेटवर्क’वर ‘बेन १०’ इतकी वर्ष आपले स्थान टिकवून आहे. शिवाय, ‘पोगो’वर ‘ओबोचामा कुन’ ही नवी मालिका सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. जाहिराती, आशय यांच्या जोडीला आता लोकप्रिय कार्टुन व्यक्तिरेखांना प्रत्यक्ष मुलांबरोबर उतरवत त्यांच्या जवळ आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत म्हणून ‘टर्नर’ने भीम, चुटकी, बेन १० यांना मुलांबरोबर ‘रॅम्प वॉक’ करायला लावले. तर डिस्नेनेही वेगवेगळे कार्यक्रम आखले आहेत. आत्तापर्यंत ‘मर्केडायझिंग’पर्यंत मर्यादित असणारी बाजारपेठ आणखी कशी विस्तारता येईल, यावर खल सुरू आहे. त्यामुळे उद्या जर कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाईट्स’च्या सेटवर शाहरूख, सलमानसारख्या मोठमोठय़ा कलाकारांच्या जोडीने छोटा भीम, बार्बीही आपापल्या मालिकांचे किंवा चित्रपटांचे प्रमोशन करताना दिसले तर त्यात आश्चर्य वाटायला नको!

Story img Loader