बॉलीवूडमधील सर्वात चर्चिला जाणारा ‘लाईफ ओफे स्क्रीन पुरस्कार २०१५’ आज (१४ जानेवारी) पार पडत आहे. शाहरूख खान, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गद मंडळी या सोहळ्याला उपस्थित आहेत.
मराठी चित्रपट विभागातील पुरस्कार नुकतेच जाहिर झाले असून यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट अभिनेत्याचा पुरस्कार यंदा दोन हरहुन्नरी अभिनेत्यांना प्रदान करण्यात आला. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना ‘विट्टी दांडू’ आणि अभिनेते नंदू माधव यांना ‘टपाल’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. तर, अभिनेत्री उषा नाईक (एक हजाराची नोट) सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट अभिनेत्रीचा पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. ‘विट्टी दांडू’मधील बालकलाकार निशांत भावसर याने सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार पटकावला आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना ‘टपाल’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट दिग्दर्शकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच यावर्षी पहिल्यांदाच देण्यात आलेला सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार शैलेश अवस्थी (विट्टी दांडू) यांना प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा सन्मान ‘विट्टी दांडू’ चित्रपटाला देण्यात आला.
लाइफ ओके स्क्रिन पुरस्काराचे मराठी चित्रपट विभागातील मानकरी-
* सर्वोत्कृष्ट अभिनेता- दिलीप प्रभावळकर (विट्टी दांडू), नंदू माधव (टपाल)
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- उषा नाईक (एक हजाराची नोट)
* सर्वोत्कृष्ट बालकलाकर- निशांत भावसर (विट्टी दांडू)
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- लक्ष्मण उतेकर (टपाल)
* सर्वोत्कृष्ट छायाचित्रण- शैलेश अवस्थी (विट्टी दांडू)
* सर्वोत्कृष्ट चित्रपट- विट्टी दांडू
फोटो गॅलरी बॅकस्टेज : २१ वा लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार २०१५
बॉलीवूड बादशाह शाहरुख खान २१व्या वार्षिक ‘लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार २०१५’ चे सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडत आहे. शाहरुखने २०१०, २०११ आणि २०१४ च्याही पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले होते. शाहरूखसोबत बॉलीवूडमधील नव्या दमाचा स्टार आणि ‘एक व्हिलन’ फेम सिध्दार्थ मल्होत्रा हादेखिल शाहरूखला सूत्रसंचालनात साथ देणार आहे. यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यात हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कलाकृतींचा आणि कलाकारांचा गौरव करण्यात येत आहे.