प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त दुबईत ‘आशा @90’ या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ब्रॉडवे म्युझिकल’च्या धर्तीवर या शोचे आयोजन करण्यात आले असून तीन तास आशाताई आपल्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
दुबईतील कोका कोला अरेना येथे ८ सप्टेंबर २०२३ रोजी आशा भोसले यांच्या नव्वदाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘आशा @90’ लाइव्ह कॉन्सर्ट या खास सांगीतिक सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदी चित्रपसृष्टीतील तब्बल आठ दशकांतील आशाताईंच्या सुरेल कारकीर्दीला मानवंदना देण्याचा हा अनोखा प्रयत्न असल्याची माहिती या कॉन्सर्टचे आयोजक ‘पीएमई एन्टरटेन्मेंट’चे सलमान अहमद यांनी दिली. या संगीत सोहळय़ाच्या दिग्दर्शनाची धुरा खुद्द आशाताईंचे चिरंजीव आनंद भोसले यांनी घेतली असून संगीत संयोजन नितीन शंकर यांचे असणार आहे. आशा भोसले यांची गाजलेली सदाबहार गाणी, गझल आदी गाणी सादर होणार आहेत. आशा भोसले यांची नात जनाई भोसले आणि प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले त्यांना साथ करणार असून ब्रॉडवेच्या धर्तीवर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी परेश शिरोडकर नृत्य दिग्दर्शन करणार आहेत. हा शो भारतात आणि जगभरात ठिकठिकाणी वर्षभर होणार असून आशाताईंची नव्वदी अशा वेगळय़ा पद्धतीने साजरी करण्यात येणार असल्याचे आनंद भोसले यांनी सांगितले.
या इंडस्ट्रीतील मी शेवटची मोगल..
वयाच्या दहाव्या वर्षांपासून मी गाणी गायला सुरुवात केली. मी या क्षेत्रात कार्यरत असताना आता चित्रपट संगीत क्षेत्रात असलेले अनेकजण अगदी लहान होते. दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार, गायक – गायिका – कलाकार या प्रत्येकाच्या आयुष्यातील गोष्टी मला माहीत आहेत. चित्रपटसृष्टीचा सगळा इतिहास मला ज्ञात आहे. त्या अर्थाने मी चित्रपटसृष्टीतील अखेरची मोगल आहे, असे आशाताई म्हणाल्या. कधी शांतपणे बसते तेव्हा प्रत्येक गाणे, चित्रपट, त्यामागच्या आठवणी, माणसे असा सगळा पट सतत डोळय़ासमोर तरळत राहतो. मी नव्वद वर्षांची झाले असे तुम्हाला वाटत आहे, मला मात्र सगळय़ा गोष्टी अगदी काल, परवा घडल्यासारख्या वाटतात. या इंडस्ट्रीतील पिढय़ा न् पिढय़ा अनुभवणारी, एका मोठय़ा काळाची मी एकमेव साक्षीदार आहे, असे सांगत आशाताईंनी आजही त्याच उत्साहाने रसिकांसमोर गाणी गाण्याचा आनंद वाटतो असे सांगितले. आशाताईं वडिलांच्या म्हणजे दीनानाथ मंगेशकर यांच्या गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत. माझ्या वडिलांची आठवण सांगून आणि त्यांचे ‘झाले युवती मना’ हे गाणे गाऊन मी या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. लता दीदींचेही गाणे या कार्यक्रमात असेल, असे आशाताईंनी सांगितले.