गुणवत्तेमुळे भाकीत कठीण बनलेल्या यंदाच्या ऑस्कर पुरस्काराची मोठी विभागणी रविवारी झालेल्या ८६व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सिनेश्रद्धाळूंना पाहायला मिळाली. तांत्रिक आणि दिग्दर्शक गटातील एकूण सात पारितोषिकांवर नाव कोरून ग्रॅव्हिटीने पुरस्कारांमध्ये आघाडी घेतली तरी स्टीव्ह मॅकक्वीन यांच्या गुलामगिरी नाटय़ावरील आधारित ‘ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह’ या चित्रपटाने सवरेत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला. पटकथेचा पुरस्कार ‘हर’ चित्रपटाला, तर अभिनेत्यांचे दोन्ही पुरस्कार डलास बायर्स क्लब या चित्रपटाला मिळाले. ‘ट्वेल्व्ह इयर अ स्लेव्ह’ चित्रपटातील लुपिटा न्याँग यांनी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला असून जॉन रिडले यांनी उत्कृष्ट रूपांतरित कथानाटय़ाचा पुरस्कार पटकावला. कृष्णवर्णीय दिग्दर्शकाच्या चित्रपटास ऑस्कर पुरस्कार मिळण्याची यंदाची पहिलीच वेळ आहे.
वर्षभरात सहा हजार ऑस्कर मतदारांनी वेगवेगळ्या चित्रपटांना पसंती दिली. ‘ग्रॅव्हिटी’ चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे सात ऑस्कर मिळाले असून त्यात तांत्रिक आविष्कार हे सर्वात मोठे कारण होते. सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाच्या अल्फान्सो क्वारोन यांच्या पुरस्कारासह ग्रॅव्हिटीने ध्वनी-संपादन, ध्वनिमिश्रण, दृश्य परिणाम, छायालेखन (सिनेमॅटोग्राफी) हे ऑस्कर पुरस्कारही पटकावले आहेत. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार केट ब्लँचेट हिला वुडी अॅलेन यांच्या ‘ब्लू जस्मिन’ चित्रपटातील लब्धप्रतिष्ठित स्त्रीच्या भूमिकेसाठी मिळाला.
अमेरिकी एफडीआयशी लढा देणाऱ्या एड्स कार्यकर्ता रॉन व्रुडफ यांच्या वास्तव जीवनावर आधारलेले कथानक असणाऱ्या ‘डलास बायर्स क्लब’ या चित्रपटासाठी मॅथ्यू मॅकनॉई आणि जॅराड लेटो अनुक्रमे सवरेत्कृष्ट अभिनेता आणि सहायक अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले. मॅथ्यू मॅकॉनई यांना त्यांच्या कारकिर्दीत प्रथमच उत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
स्पाइक जोन्ज यांना त्यांच्या ‘हर’ चित्रपटासाठी मूळ कथानकासाठी ऑस्कर मिळाले. एक पुरुष व संगणक संचालन प्रणाली यातील ती एक प्रेमकहाणी आहे. ऑस्कर कार्यक्रमात गाण्यांचीही बरसात होती. एलेन डीजेनेरेस यांनी सर्वाना हसवत सूत्रसंचालन केले. परभाषिक चित्रपट गटात इटलीच्या ‘द ग्रेट ब्युटी’ चित्रपटाला ऑस्कर मिळाले. पावलो सोरेंटिनो त्याचे दिग्दर्शक आहेत. डिस्नेचा त्रिमिती चित्रपट ‘फ्रोझन’ला ‘लेट इट गो’ या मूळ गाण्यासाठी व उत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपटासाठी असे दोन ऑस्कर मिळाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा