कंगना रणौतचा रिअलिटी शो ‘लॉकअप’ सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. काही कारणांनी हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यामुळे शो प्रसारित होण्याआधीच बंद होणार का अशी चर्चा होती. मात्र प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आणि शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. करणवीर बोहरा, पायल रोहतगी, मुनव्वर फारूख, बबिता फोगट यांसारखे सेलिब्रेटी या शोमध्ये सहभागी झाले आहेत. शोच्या सुरुवातीलाच कंगनानं करणवीरला लूजर म्हणत त्याची ओळख करून दिली होती. त्यावरून आता करणवीरची पत्नी टीजे सिद्धूनं कंगना रणौतला चांगलंच सुनावलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लॉक अप’ शोचा प्रोमो प्रसारित झाल्यानंतर टीजे सिद्धूनं तिच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत कंगनाच्या आरोपांवर नाराजी व्यक्त केली आहे. तिने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘जर एखादा यशस्वी टीव्ही अभिनेता कोणताही टीव्ही रिअलिटी शो जिंकू शकला नाही तर त्याला लूजर म्हणणं योग्य आहे का? आणि जर असं असेल तर ज्या रिअलिटी शो विजेत्यांबद्दल तुम्ही काय म्हणाल जे एक यशस्वी अभिनेता होऊ शकलेले नाहीत. ते देखील लूजर आहेत का?’

कंगना रणौतनं या शोमध्ये करणवीर बोहरा ओळख करून देताना त्याला म्हटलं होतं, ‘करणवीर तुझ्यावर जनतेनं हा आरोप लावला आहे की तू एक अनुभवी रिअलिटी शो लूजर आहेस?’ कंगनाच्या या वाक्यावर उत्तर देताना करणवीर म्हणाला, ‘तुम्ही एखाद्या व्यक्तीला अशाप्रकारे प्रेरित करता का? जर तुम्ही एखादा शो जिंकला नाही तर तुम्हीही लूजर आहात. मला माफ करा.’

दरम्यान कंगनाचा हा शो टीव्हीवरील इतर रिअलिटी शोपेक्षा खूप वेगळा आहे असं मेकर्स सातत्यानं सांगत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या शोमध्ये सदस्यांना कोणत्याही प्रकारची लग्झरी सेवा मिळणार नाही. सदस्यांसाठी जेलमध्ये भारतीय स्टाइलचे टॉयलेट्स आहेत. तसेच त्यांना जमिनीवर खाली बसून भांडी घासावी लागणार आहेत. याशिवाय त्यांना झोपण्यासाठी कोणत्याही प्रकारचे बेड मिळणार नाहीत तर साध्या गाद्या आणि उशा देण्यात आल्या. ज्या एखादी चूक झाल्यावर कंगना त्यांच्याकडून काढूनही घेऊ शकते. हे सर्व पाहिल्यानंतर एकंदर या शोमध्ये टिकून राहणं सदस्यांसाठी खूपच आव्हानात्मक असणार आहे असं दिसतंय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lock upp karanvir bohra wife teejay siddhu angry reaction on kangaa ranaut call him looser mrj