चित्रपटात दरोडा दाखवायची पद्धत हॉलीवूडने पल्प फिक्शनमधून उचलली. त्यामध्ये जर नायक बँकेत दरोडा घालणारा असेल तर त्याच्याभोवतीच्या वाईट आर्थिक परिस्थितीवरचा तोडगा म्हणून त्याच्याकडून हे कृत्य घडविले जाई. नैतिकदृष्टय़ा दरोडा वाईट असल्याने चोरलेल्या आयत्या पैशांची विल्हेवाट सामाजिक कामांसाठी करणारा रॉबिनहूडी हिरो दाखवून प्रेक्षकाला त्याबाबत सहानुभूती दाखविली जाई. आता नायक जर पोलीस असेल तर त्याच्याकडून खलनायकांच्या अतिकुशल दरोडय़ाचे सारेच मनसुबे नायकाच्या चलाख मेंदूद्वारे बिघडविले जात. मग अमेरिकेत १९६०च्या दशकापासून इतके बँकदरोडे पडले की त्यातील चलाख दरोडय़ांवर सिनेमाच निघत राहिले. नव्वदीच्या दशकामध्ये दरोडा चित्रपटांची जमात क्वेन्टीन टेरेन्टीनो याने अंतर्बाह्य़ बदलून टाकली. मग दरोडय़ाभोवती गुंफलेल्या माणसांद्वारे मनोरंजनाची आतषबाजी करणारे कलात्मक सिनेमे यायला लागले. आंधळ्यांपासून थेरडय़ांनी बँक लुटण्याच्या चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखांची उभारणी, अत्यंत बावळट किंवा अत्यंत हुशार व्यक्तींच एकत्रीकरण, आर्थिक किंवा सामाजिक विपन्नावस्था अनुभवणाऱ्या प्रमुख व्यक्तिरेखा आणि अचूक योगायोगांवर घडत किंवा बिघडत जाणारा कथापट यांनी सिनेमा येत राहिले. टेरेन्टीनोच्या सिनेमातील दरोडे बिघडतात. ब्रिटिश दिग्दर्शक गाय रिचीच्या चित्रपटांत दरोडेखोर तिरकस विनोद निर्माण करतात. जेसन स्टेथम अभिनित चित्रपटांत हाणामारीच्या असंख्य शक्यता तयारच असतात. या सगळ्यांपेक्षा वेगळे दरोडेपट स्टीव्हन सोडरबर्ग याच्या चित्रपटांत असतात. ओशन इलेव्हन या जुन्या चित्रपटाचा रिमेक करून वर त्याचे सिक्वेल काढणाऱ्या सोडरबर्गच्या चित्रपटांत योगायोगांसोबत चलाख आणि अतिडोकेबाज व्यक्तिरेखा खच्चून भरलेल्या असतात. अवघड प्रमेय उकलणाऱ्या गणितज्ज्ञाच्या थाटात ते दरोडय़ाचा कार्यक्रम आखतात आणि त्यानुरूप मार्गाला लागतात. काही वर्षांपूर्वी सिनेमा दिग्दर्शनातून निवृत्ती घेणाऱ्या या चित्रकर्त्यांने मध्यंतरी टीव्हीसाठी काम करून मोठय़ा पडद्यावर पुनरागमन करीत ‘लोगन लकी’सारखा देखणा दरोडेपट तयार केला आहे. हॉलीवूडच्या स्टुडिओ यंत्रणेला झुगारून स्वतंत्र वितरण व्यवस्था उभारत सोडरबर्गने हा चित्रपट जगभर पोहोचविण्याचा प्रयत्न केला. भारतात तो आला तेव्हा त्याच्यासोबत लागलेल्या मोठय़ा हॉलीवूड चित्रपटांच्या गर्दीत तो प्रसिद्धीत कमी पडला. काही दिवसांपूर्वी टाइम साप्ताहिकाने तयार केलेल्या अलीकडच्या सवरेत्कृष्ट दरोडेपटांच्या यादीत या चित्रपटाला प्रथम क्रमांक देऊन त्याची कल्ट हीट बनण्याची पूर्ण तयारी करून दिली आहे.
रंजक दरोडाउद्योग!
नव्वदीच्या दशकामध्ये दरोडा चित्रपटांची जमात क्वेन्टीन टेरेन्टीनो याने अंतर्बाह्य़ बदलून टाकली.
Written by पंकज भोसले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-11-2017 at 01:54 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Logan lucky hollywood movie on bank robbery