रवींद्र पाथरे

मागची दोनएक र्वष करोनाने बरबाद केल्याने माणसाचं जगणंच जिथे पणाला लागलं होतं तिथे कला, संस्कृतीकडे दुर्लक्ष झालं असेल तर आश्चर्य नाही. मात्र, गेल्या काही काळात हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागल्यावर माणसं आपल्या पूर्वीच्या दिनक्रमाकडे परतली आहेत. नाटक-सिनेमा-कलांकडे वळू लागली आहेत. ‘लोकसत्ता’चा ‘लोकांकिका’ हा लोकप्रिय उपक्रमही मधल्या विश्रांतीनंतर यंदा पुनश्च रुजू झाला. तरीही करोनाची काहीशी पडछाया त्यावर होतीच.. उमेदीची वाया गेलेल्या दोन शैक्षणिक वर्षांमुळे विद्यार्थ्यांचं प्राधान्य अभ्यास, परीक्षा यांना असणं स्वाभाविक होतं. तरीही या स्पर्धेला उत्साही प्रतिसाद लाभला. तरुणाईतला हुन्नर, त्यांचं व्यक्त होणं आणि त्यांनी कोणत्याही बाह्य दडपणांविना आपली सर्जनशीलता बिनधास्तपणे एकांकिकांतून मांडणं हे ‘लोकांकिका’ उपक्रमाचं मुख्य वैशिष्टय़. याचा प्रत्यय यंदाच्या महाअंतिम फेरीतील एकांकिकांमधूनही आला. मात्र, त्यात नेहमीची अदम्य इर्षां नव्हती. मधल्या काळात आलेलं सर्वस्पर्शी शैथिल्य बहुधा यास कारण असावं. असो.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी आणि कोल्हापूर या आठ केंद्रांवरून विजेत्या ठरलेल्या लोकांकिका महाअंतिम फेरीत सादर झाल्या. विषयांचं विलक्षण वैविध्य हा त्यांच्यातला समान धागा. पैकी समकालीन विषयांवरच्या ‘डोक्यात गेलंय’, ‘टॉक’, ‘मध्यांतर’ यांसारख्या एकांकिकांबरोबरच चाळ संस्कृतीतली शाश्वत मानवी मूल्यं, विद्यमान न्यायप्रक्रियेची शल्यचिकित्सा, अपत्यहीनतेवरील अंगाशी आलेला उपाय (नियोग), विचित्र बालकाचं समाजातील भवितव्य, कमालीच्या गरिबीतून नाइलाजाने घडणारे अपराध यांसारख्या सार्वकालिक विषयांवरील एकांकिकाही यात पाहावयास मिळाल्या. एकुणात तरुणाईला कुठलेही विषय वज्र्य नाही याचा प्रत्यय त्यांतून येत होता. प्रश्न होता तो सादरीकरणातील नावीन्य, विषयाचा कमी-अधिक सखोलतेनं घेतलेला वेध यांचा! अर्थात नवख्या, होतकरू विद्यार्थ्यांच्या विषय हाताळणीत थोडंसं उन्नीस-बीस असणारच.

‘लोकांकिका’ महाअंतिम फेरीत निर्विवाद विजेती ठरली ती मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयाची ‘उकळी’ ही एकांकिका! चाळसंस्कृतीतील आंबट-गोड, चिवट-जिवट अनुभवांचा अर्कचित्र असलेली ही एकांकिका. संतोष जाधव या चाळकरी गृहस्थाने उद्योगपती अंबानी घराण्यातील कुलदीपकाचा रस्त्यावरील अपघातात माणुसकीच्या नात्याने जीव वाचवल्याने त्याच्यावर अकस्मात लक्ष्मी प्रसन्न होते. त्या एका घटनेनं या कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातच नव्हे, तर संपूर्ण चाळीत चैतन्य येतं. या हॅपिनगचा शुद्ध अर्कचित्रात्मक आलेख ‘उकळी’मध्ये चितारला आहे. उपहासात्मक विनोद, दिग्दर्शनातील बांधीव गणितं, लहान-मोठय़ा सर्वच कलाकारांचा तगडा परफॉर्मन्स आणि मानवी मूल्यांचं हृद्य दर्शन घडविणारी ही एकांकिका महाविजेती न ठरती तरच नवल.
ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयाची ‘डोक्यात गेलंय!’ ही एकांकिका सोशल मीडियाच्या नको तितक्या आहारी गेलेल्या आजच्या पिढीचं विदारक चित्र रेखाटणारी होती. लाइक्स, कमेन्ट्सशिवाय आपलं अस्तित्व आणि जगणंच व्यर्थ आहे असा समज करून घेतलेल्या, आभासी जगालाच खरं जग मानणाऱ्या तरुणाईला लख्ख आरसा दाखवणारी ही एकांकिका. लेखन, दिग्दर्शन, सादरीकरण अशा सर्वच आघाडय़ांवर लक्षवेधी कामगिरी केलेली.. द्वितीय विजेतीचा बहुमान पटकवणारी!

कोल्हापूरच्या शिवाजी विद्याापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीची ‘विषाद’ ही एकांकिका अपत्यहीन आदिवासी जोडप्यानं नियोग पद्धतीनं मूल होण्यासाठी केलेला खटाटोप, त्यातून सर्वसंबंधितांमध्ये झालेली भावनिक, मानसिक गुंतागुंत आणि या सगळय़ाच्या भीषण परिणतीचं गडद-गहिरं प्रक्षोभनाटय़ सादर करणारी होती. कलाकारांचा मनस्वी अभिनय आणि तितकीच बोल्ड प्रस्तुती या एकांकिकेला तृतीय पुरस्काराची मानकरी ठरवून गेली.

महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या अन्य एकांकिकांतील विषयांचं वैविध्यही वैशिष्टय़पूर्ण होतं. पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाची ‘मध्यांतर’ ही एकांकिका कलेप्रति आधीची पिढी आणि आजची तरुण पिढी यांचा सर्वस्वी भिन्न दृष्टिकोन चितारणारी होती. नागपूरच्या विठ्ठलराव खोब्रागडे महाविद्यालयाची ‘न्यायालयात जाणारा प्राणी’ ही एकांकिका न्यायालयीन प्रक्रियेतील दफ्तरदिरंगाई, वेळीच न्याय मिळण्यातल्या असंख्य अडचणी, त्यातून सर्वसामान्यांची होणारी परवड हा विषय मांडणारी होती. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. त्याचा रोकडा अनुभव देणारी ही एकांकिका. नाशिकच्या स्मिताताई हिरे महाविद्यालयाची ‘हर्लेक्विन’ ही एकांकिका मारुतीचे परमभक्त असलेल्या गावातील एका जोडप्याला झालेल्या विचित्र बाळाची गोष्ट सांगणारी होती. विज्ञाननिष्ठ समाजासमोर प्रश्न उपस्थित करणारी ही एकांकिका. रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची ‘कुपान’ ही गरीब कुटुंबातील परिस्थितीनं गांजलेल्या दोन भावांतील शत्रुत्वाची कथा.. परिस्थिती माणसाला कशी गोत्यात आणते, हे दर्शवणारी. तर औरंगाबादच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजची ‘टॉक’ ही एकांकिका आजच्या परस्परसंवाद हरवलेल्या समाजाचं चित्रण करणारी. तरल, हळुवार धाटणीची. माणूस संवादाशिवाय जगू शकत नाही. परंतु आज हा संवादच हरपलाय. त्यातून त्याचं तुटलेपण वाढत चाललंय. माहिती विस्फोटाच्या या जगात एकीकडे तंत्रज्ञानामुळे माणसं जवळ आल्यासारखी वाटत असली तरी प्रत्यक्षात ती एकाकी बेटासारखी शतखंडित झालेली आहेत. त्यांचं मन:स्वास्थ्य हरवलंय. सगळी सुखं हात जोडून समोर उभी असतानाही समाधानी जगणं माणसाला सोडून गेलंय. हे चित्र ‘टॉक’ या वरकरणी उत्फुल्ल वाटणाऱ्या एकांकिकेतून उभं राहतं.

लोकांकिकांच्या निमित्ताने आजची महाराष्ट्रातील तरुण पिढी नेमका काय विचार करतेय आणि समकालाला कशी रिअॅक्ट होतेय याचं एक कोलाज अनुभवायला मिळतं. आणि तेच तर या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे.

प्रायोजक
‘लोकसत्ता’ आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा सहप्रायोजक ‘झी युवा’ आणि ‘टुगेदिरग’च्या सहकार्याने पार पडली. ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘केसरी टूर्स’ आणि ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’तर्फे होती. साहाय्य ‘अस्तित्व’चे होते. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट, मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर होते.