‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पहिल्याच पर्वात अगदी नव्या नवलाईने एकांकिका करणाऱ्या गुणवान कलाकारांना मालिके मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्यासाठी आता पुढची चित्रपटांचीही वाट खुली होईल, याबद्दल कुठलीच शंका नाही. महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत सादर होणाऱ्या एकांकिकांच्या दृष्टीनेच नव्हे तर अत्यंत तडफेने, मेहनतीने या एकांकिका सादर करणाऱ्या कलावंतांना भविष्यात याचा कसा लाभ होईल, हा विचार ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या पहिल्याच पर्वात करण्यात आला होता. त्याचे परिणामस्वरूप म्हणजे केवळ मालिकाच नाही तर ‘लोकांकिका’च्या माध्यमातून थेट रुपेरी पडद्यावर काम करण्याची किमया पुण्यातील प्रतीक गंधेला साधली आहे. ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वासाठी कसून तयारीला लागलेल्या तरुणाईसाठी पहिल्या पर्वातील शिलेदारांचे हे अनुभव नक्कीच नवा उत्साह निर्माण करणारे ठरणार आहेत. येत्या २९ सप्टेंबरला ‘अस्तित्व’च्या सहकार्याने पुन्हा एकदा ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धाचे नवे पर्व सुरू होईल. कलावंतांना पारखणाऱ्या नजरा याही वेळी तरुण स्पर्धकांवर लक्ष ठेवून असतील. त्यामुळे तुमचा दमदार अभिनय परीक्षकांचं मन कसं जिंकून घेऊ शकतो, याचा अनुभव प्रतीक गंधेकडून समजून घेण्यासारखा आहे. पुणे विभागीय केंद्रावर ‘मोटिव्ह’ नावाची एकांकिका सादर झाली होती. यात प्रतीकने काम के ले होते. प्रतीकची एकांकिका अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकली नाही. मात्र, प्रतीकचा अभिनयाचा प्रवास लोकांकिकेकडून थेट सुजय डहाकेच्या आगामी ‘फुंतरू’ या सिनेमापर्यंत झाला आहे.
‘लोकांकिका’ आयुष्यातील टर्निग पॉइंट – प्रतीक गंधे
रोज पहाटे ३.३०-४ वाजता उठायचे. साडेचार वाजता पीएमटीमध्ये बसचा कंडक्टर म्हणून सेवा सुरू करायची. दीड वाजता घरी येऊन जेवण केल्यानंतर मग पुण्यात येऊन नाटकाच्या तालमीत रमून जायचं. रात्री पुन्हा घरी येऊन बरोब्बर साडेदहा वाजता ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका न चुकता पाहून मग झोपायचं हा माझा रोजचा शिरस्ता आहे.
घरात मी एकटाच कमावता असल्याने काम करून मग नाटकाचं वेड जोपासायचं हे आईने आधीच बजावून सांगितलं होतं. त्यात तिची काही चूक नाही. एकुलता एक आहे. मग नाटक , कधी चित्रपट विश्वात आलो की हे रोजचे काम विसरले जाते.
‘लोकांकिका’ हा माझ्या आयुष्यातला टर्निग पॉइंट होता. एका एकांकिकेमुळे लोकांसमोर येण्याची संधी मला मिळाली. लोक आज मला ओळखू लागले आहेत. आणि या एका लोकांकिकेने मला सुजय डहाकेंचा ‘फुंतरू’ हा सिनेमा मिळवून दिला आहे. खरोखरीच ‘लोकांकिका’ हे आमच्यासारख्या कलावंतांसाठी मोठी पर्वणी आहे.