भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित ‘लोकमान्य-एक युगपुरुष’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी राज्यभर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा दिग्दर्शक ओम राऊत यांनी रविवारी दादर येथे केली.
मंडालेच्या कारागृहातून लोकमान्य टिळक यांची सुटका झाल्याला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने आयोजित केलेल्या ‘लोकमान्य-आजच्या संदर्भात’या कार्यक्रमात राऊत बोलत होते. कार्यक्रमात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक विनय सहस्रबुद्धे, ‘लोकमान्य’ चित्रपटाचे रंगभूषाकार विक्रम गायकवाड, चित्रपटात ‘लोकमान्य टिळक’यांची भूमिका साकारणारे अभिनेते सुबोध भावे, लोकमान्य टिळक यांचे पणतू दीपक टिळक आदी सहभागी झाले होते. राजेश दामले यांनी या सगळ्यांशी संवाद साधला.
लोकमान्य टिळक यांच्या विचारांची आज देशाला गरज असून त्यांचे विचार आणि जीवन नव्या पिढीपुढे यावे, या उद्देशाने हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. लोकमान्यांच्या भूमिकेसाठी माझ्यासमोर फक्त सुबोध भावे याचेच नाव होते. तो या भूमिकेला न्याय देईल याची खात्री होती आणि म्हणूनच त्याची निवड केल्याचेही राऊत यांनी सांगितले.
‘लोकमान्यांची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी एक आव्हान होते. त्यांच्यावरील पुस्तके, त्यांनी लिहिलेले साहित्य वाचून मी टिळक समजून घेतले आणि ‘लोकमान्य टिळक’ साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला’, असे सुबोध भावे म्हणाला. रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी सुबोधला ‘लोकमान्य टिळक’ म्हणून कसे रूपांतरित केले ते सांगितले. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, सामूहिकता, संघटनशीलता आणि उपक्रमशीलता ही लोकमान्य टिळक यांच्या कार्यपद्धतीची खास वैशिष्टय़े होती. यातून त्यांनी संपूर्ण समाजाला संघटित केले. डॉ. दीपक टिळक, सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, चित्रपटाचे वेषभूषाकार महेश शेरला, कला दिग्दर्शक संतोष फुटाणे यांनीही मनोगत व्यक्त केले. सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानची काही दृश्येही दाखविण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा