रवींद्र पाथरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांचे हे शतकोत्तर सुवर्णजयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने गांधीजींचं पुन:स्मरण सर्वत्र केलं जात आहे. ज्यांना गांधीजी कालबाह्य़ झालेले आहेत असं वाटतंय तेही त्यांचं स्मरण करताहेत, तर ज्यांना गांधी या जगात नकोसे होते आणि ज्यांनी त्यांची हत्या करण्यात भूमिका बजावली होती, तेही यानिमित्ताने गांधीजींची महानता जगाला सांगत त्यांच्या मार्गावरून चालण्याची निकड बोलून दाखवीत आहेत. अशा मंडळींच्या अश्लाघ्य ढोंगीपणाला काय म्हणावं, हा प्रश्न कुणाही संवेदनशील माणसाला पडल्याविना राहणार नाही. एकीकडे गांधींच्या मारेकऱ्याचा उदोउदो करायचा आणि दुसरीकडे गांधीविचारांच्या मौलिकतेबद्दल प्रवचनं झोडायची असा सारा दुटप्पी मामला सुरू आहे. सर्वसामान्यांच्या मनात गांधींबद्दल तिरस्कार पसरविण्याचे काम ज्या मंडळींनी आजवर केले, तीच आता नाइलाजाने त्यांचे गोडवे गात आहेत. गांधींना केवळ स्वच्छता अभियानापुरतं वापरून इतर बाबतींत त्यांना मोडीत काढण्याचे उद्योग जोमात सुरू आहेत. ज्या गांधीजींनी १९४७ च्या फाळणीच्या दिवसांत नौखालीच्या दंगलीमधील भीषण हिंसाचारात हिंदू-मुस्लिमांमध्ये धार्मिक सलोखा निर्माण व्हावा म्हणून पदयात्रा काढण्याचे असीम धैर्य दाखवले, त्यांच्यावर मुस्लीमधार्जिणेपणाचा शिक्का मारण्यात येत आहे. आज गांधी-नेहरूंना खलपुरुष ठरवून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा घाट घातला गेला आहे. परंतु अशाने गांधीजी आणि त्यांचे विचार व मूल्ये मरणार नाहीत. कारण आजवर गांधींवर लाखाहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. आजच्या काळातही दर तिसऱ्या दिवशी गांधींवर जगात कुठे ना कुठे नवे पुस्तक प्रसिद्ध होत असते. जगातील सहाशे विद्यापीठांतून गांधीविचारांचा अभ्यास केला जातो आहे. आणि एवढं होऊनही गांधी आपल्याला पूर्णपणे आकळलेत असा दावा कुणीच करू शकत नाही. सगळ्यांना पुरून गांधी दशांगुळे उरले आहेत. कुणी कितीही त्यांचे चारित्र्यहनन करो, त्यांना इतिहासाच्या पुस्तकातून पुसून टाकायचा प्रयत्न करोत, पण मानवतेचे प्रणेते गांधी जोवर लोकांच्या हृदयात विराजमान आहेत तोवर ते कधीच पुसले जाणार नाहीत. कुणी त्यांना पुसू शकणार नाही. याउलट, त्यांना संपवू पाहणारेच कालौघात नष्ट होतील. त्यांची नामोनिशाणीदेखील शिल्लक राहणार नाही. असो.

तर.. आज देशात धार्मिक तेढ आणि असहिष्णुतेचे काळे ढग आसमंतात दाटून आलेले असताना कधी नव्हे इतकी गांधीजींची आठवण तीव्रतेनं येणं स्वाभाविक होय. लोकशाही, उदारमतवाद, सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव, समानता, माणुसकी या मूल्यांची सार्वत्रिक गळचेपी होत असतानाच्या आजच्या काळात गांधीजी असते तर त्यांनी काय केलं असतं, हा विचार मनात आल्यावाचून राहत नाही. या पार्श्वभूमीवर ‘आविष्कार’ संस्थेने ‘उमगलेले गांधी’ या गांधीसाहित्यावरील अभिवाचनाच्या कार्यक्रमाद्वारे गांधीजी नव्याने लोकांसमोर आणण्याचे ठरविले आहे. निमित्त आहे : गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णजयंती वर्षांचं!

या कार्यक्रमातून गांधीविचारांची पुन:रुजवात तर अपेक्षित आहेच; त्याचबरोबर गोबेल्स तंत्राने गांधीजींची प्रतिमा मलिन करू इच्छिणाऱ्या शक्तींचा खोटारडेपणा सत्याग्रही मार्गाने उघड करणं, हेही उद्दिष्ट आहे. अर्थात या कार्यक्रमात गांधीजींची घडण, त्यांचे सत्याग्रह व अहिंसेचे प्रयोग, राजकीय-सामाजिक नेते म्हणून असलेलं त्यांचं योगदान, इतरांनी केलेलं त्यांचं मूल्यमापन, गांधींनी स्वत: केलेलं आत्मचिंतन व आत्मपरीक्षण, त्यांच्या विविध प्रयोगांचा वेळोवेळी लावला गेलेला अर्थ आणि त्याचं फलित, त्यामागचं त्यांचं तत्त्वज्ञान अशा अनेकानेक बिंदूंना ‘उमगलेले गांधी’ स्पर्श करतात. आजच्या गढुळलेल्या वातावरणात माणसांची मनं, विचार, कृती सारं सारं  प्रदूषित झालेलं असताना त्यांना वास्तव समजावून देणं आणि विचारप्रवृत्त करणं आत्यंतिक निकडीचं झालेलं आहे. ‘उमगलेले गांधी’ हा उपक्रम हा हेतू शंभर टक्के साध्य करतो. मुस्लिमांच्या वेगळ्या मतदारसंघांची मागणी खरी तर लोकमान्य टिळक व नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या काळातच मान्य केली गेली होती. त्याचा पुढे काटय़ाचा नायटा झाला. पण त्यांचं बिल मात्र फाडलं गेलं गांधीजींवर. प्रत्यक्षात गांधींनी कधीही या वेगळेपणाला मान्यता दिलेली नाही. उलट, त्यास विरोधच केलेला होता. देशाचे तुकडे पाडण्याला त्यांचा सख्त विरोध होता. परंतु हे काहीही लक्षात न घेता फाळणी आणि मुस्लीम समाजाच्या लांगुलचालनाचे अपश्रेय गांधीजींच्या खाती टाकलं जातं. हे सरासर अन्याय्य आहे. रा. स्व. संघाची कथनी आणि करणी कशी भिन्न आहे, हे गांधी जन्मशताब्दीनिमित्त प्रा. नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेल्या त्यांच्या ‘गोळवलकर गुरुजी आणि महात्मा गांधी’ या लेखात साधार दाखवून दिले आहे. पण लक्षात कोण घेतो?

गांधीजींच्या अहिंसेच्या प्रयोगाचीही अशीच थट्टा उडविली गेली. खरं तर त्यांना सबलांची अहिंसा अभिप्रेत होती. जी अखेपर्यंत आपल्याला साध्य झाली नाही, हे स्वत: गांधीजींनीच मान्य केलंय. जे काही र्अधमरुध यश त्यांना याबाबतीत मिळालं ते त्यांनी निमूटपणे स्वीकारलं. गांधीजींचे एक प्रमुख शिष्य विनोबा भावे यांनीच एका लेखात त्यांच्या या अहिंसेच्या प्रयोगाचं मूल्यमापन केलेलं आहे. दांडीयात्रेच्या वेळी मिठाच्या सत्याग्रहात मात्र त्यांच्या अहिंसेच्या प्रयोगाचं झळाळतं रूप पाहायला मिळालं. वि. स. वाळिंबे यांनी ‘मूठभर मीठ’ या लेखात त्याचं चित्रदर्शी वर्णन केलेलं आहे.

क्रिप्स वाटाघाटी फिस्कटल्यावर गांधीजी कमालीचे उद्विग्न झाले होते. भारतीय स्वातंत्र्याचं त्यांचं आणि अन्य नेत्यांचं स्वप्न धुळीला मिळालं होतं. वाढतं वय आणि दूर दूर जाणारं स्वातंत्र्याचं स्वप्न याचा गांधीजींच्या मनोवर खोल परिणाम झाला होता. आता असं काहीतरी करायला हवं होतं, की ज्याने सगळा देश पेटून उठेल आणि ब्रिटिशांना देश सोडून जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही असं गांधींच्या मनात येऊ लागलं. हळूहळू ‘छोडो भारत’ची संकल्पना त्यांच्या डोळ्यांसमोर आकारास येत गेली. परंतु या चळवळीला ‘छोडो भारत’ हे नाव मात्र एका पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीवरून त्यांना सुचली. ती गांधीजींची ‘हाक’ नव्हती. श्रीपाद केळकर यांनी त्यांच्या ‘छोडो भारत घोषणेचा जन्म’ या लेखात ही हकिकत कथन केली आहे.

गांधीजी स्वत:ही आपल्या उपक्रमांचं चिकित्सकपणे कठोर मूल्यांकन करीत असत. त्यातल्या यशापयशाचं, त्यामागच्या कारणमीमांसेचं तर्कशुद्ध विश्लेषण ते करीत. त्यांच्या ‘हरीजन’मधील लेखांमधून, ‘आत्मकथा’तून हे पारदर्शीत्वाने आढळून येतं. त्यांच्या निकटवर्तीयांनी तसेच त्यांच्या टीकाकारांनी लिहिलेल्या लेखांतून, गांधीजींच्या मुलाखतींतून गांधी समजून घेणं नक्कीच अवघड नाही. गांधीजींचं आभाळाएवढं व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांचं त्यांच्याहून संपूर्णपणे भिन्न व्यक्तिमत्त्व ‘गांधी आणि कस्तुरबा’ या लेखातून उलगडतं. प्रचंड बौद्धिक, भावनिक महदंतर असूनही त्यांचं सहजीवन यशस्वी झालं ते कस्तुरबांमुळेच. हे गांधीजीही मान्य करीत. पती, आपल्या मुलांचे वडील आणि देशाचे उत्तुंग नेते ही गांधींची रूपं बांनी जवळून पाहिली. अनुभवली. त्याबद्दलची त्यांची मतं त्या सडेतोडपणे व्यक्त करीत. याचं मनोज्ञ दर्शन या लेखात घडतं.

गांधीजी देशातील प्रत्येक समस्या स्वत: जातीने समजून घेत. त्यांनी काश्मीर प्रश्नही समजावून घेतला होता. त्यावर काय तोडगा असू शकतो याबद्दल चिंतन केलं होतं. परंतु पुढे काश्मीरसंबंधात जे निर्णय घेतले गेले त्यामुळे काश्मीर देशापासून अलग पडत गेला. आज त्याला मुख्य प्रवाहात आणण्याच्या नादात तिथले ३७० कलम रद्दबातल केले गेल्याने भविष्यात काय उलथापालथी होतील, हे कुणीच सांगू शकत नाही. आजच्या घडीला काश्मीरमधील लोक आपल्याच घरांत स्थानबद्ध  आहेत हे कटु वास्तव आहे. त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य काढून घेतलं गेलं आहे. गांधीजी असते तर ते या परिस्थितीवर कसे व्यक्त झाले असते, याबद्दल इतिहासाचे अभ्यासक रामचंद्र गुहा यांनी अलीकडेच लिहिलेल्या लेखात भाष्य केलं आहे.

अशा तऱ्हेनं गांधींना जाणून घेताना आपण गांधी नावाचा रंगीबेरंगी कॅलिडोस्कोप पाहतो आहोत असं वाटत राहतं. दीपक राजाध्यक्ष यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि उन्मेष अमृते यांनी संशोधित-संपादित केलेल्या ‘उमगलेले गांधी’ या अभिवाचनाच्या प्रयोगात गांधी नव्याने आपल्याला भेटतात. रोहिणी हट्टंगडी, चंद्रकांत कुलकर्णी, किशोर कदम, मंगेश भिडे आणि दीपक राजाध्यक्ष या कलावंत मंडळींनी गांधींचं हे कॅलिडोस्कोपिक दर्शन घडवलं आहे. येत्या वर्षभरात आणखीन वेगवेगळे गांधी दर प्रयोगानिशी उलगडत जातील. एका जनजागरणाचा हा अध्याय आहे. त्यास प्रतिसाद देणं- न देणं हे आपल्या संवेदनशीलतेवर अवलंबून आहे. प्रगल्भ भारतीय नागरिक या नात्याने आपण सगळे या जागरणात सहभागी व्हायलाच हवं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editor recommendations drama on mahatma gandhi abn
Show comments