रवींद्र पाथरे

मिर्झा असदुल्ला खान गालिब.. मुघल सत्तेच्या मावळत्या काळातला एक अवलिया, प्रतिभासंपन्न शायर. आयुष्यभर आपल्याच मस्तीत जगलेला. त्याच्या उभ्या हयातीत कधीच त्याला सुखानं जगता आलं नाही. कर्जबाजारीपण, मद्याचं व्यसन, व्यक्तिगत आयुष्यातली दु:खं यांनी सतत पिचूनही त्याची प्रतिभा नेहमीच नवनवोन्मेषशाली राहिली. आपल्या प्रतिभेवर त्याला ‘नाज’ होता. आपल्या पश्चातही आपलं नाव सर्वदूर पोहोचेल याची त्याला शंभर टक्के खात्री होती. उर्दू-फारसी शायरीतल्या अग्रगण्य शायरांत त्याचं नाव अग्रकमी राहिलेलं आहे. त्याच्यावर त्याच्या पश्चात अनेक पुस्तकं लिहिली गेली. आजही गालिबचा करिश्मा बरकरार आहे. गुलजारांसारख्या त्यांच्या चाहत्यानं त्यांच्यावर कादंबरी लिहिली, सीरियल केली. अशा गालिबवर एक मराठी नाटक येतंय म्हटल्यावर उत्सुकता ताणली गेली नसेल तरच आश्चर्य. परंतु चिन्मय मांडलेकर लिखित-दिग्दर्शित ‘गालिब’ हे नाटक त्याच्या जीवनावर आधारित नाहीए, तर गालिबवर कादंबरी लिहिणाऱ्या लेखकासंबंधीचं हे नाटक आहे. त्या अनुषंगानं जो काही ‘गालिब’ नाटकात येतो, तितपतच तो या नाटकात आहे.

PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Loksatta chaturang padsad loksatta readers response letter
पडसाद : स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर…
Yuvraj Singh expresses his feelings on India defeat against New Zealand sports news
न्यूझीलंडविरुद्धचा पराभव सर्वात निराशाजनक; माजी अष्टपैलू युवराज सिंगची भावना
Rashid Khan 11 Wickets career best helps Afghanistan register series win vs Zimbabwe Ramat Shah Century
AFG vs ZIM: रशीद खानची कारकिर्दीतील सर्वाेत्कृष्ट गोलंदाजी, ११ विकेट्स घेत अफगाणिस्तानला असा मिळवून दिला मालिका विजय
Gautam Gambhir Statement on Rohit sharma Virat Kohli Test Future Said Its up to Them IND vs AUS
IND vs AUS: “रोहित-विराटवर आहे काय निर्णय घ्यायचा पण…”, गौतम गंभीरचं कसोटी भविष्याबाबत मोठं वक्तव्य, मालिकेनंतर काय म्हणाला?
Gautam Gambhir wanted Cheteshwar Pujara in the team for the Border Gavaskar Trophy but the selectors refused
Border Gavaskar Trophy : गौतम गंभीरला संघात हवा होता ‘हा’ खेळाडू; कुणी दिला नकार?

मानव किलरेस्कर हे एक प्रथितयश लेखक. ते गालिबवर कादंबरी लिहिणार आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं असतं. पण ती कादंबरी लिहायच्या आधीच त्यांना वेड लागतं आणि ते आयुष्याच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात फेकले जातात. दरम्यान दहाएक वर्षांचा काळ लोटतो. मधे एकदा ते त्या वेडातून थोडेसे बरेही झालेले असतात. पण पुनश्च ते त्या काळोखाच्या गर्तेत फेकले जातात. त्यांची धाकटी मुलगी इला त्यांचा या काळात निगुतीनं सांभाळ करते. त्यासाठी ती आपलं शिक्षणही सोडते. वडलांच्या सेवेत ती स्वत:ला झोकून देते. तिची मोठी बहीण रेवा मुंबईत नोकरी करत असते आणि घराला आर्थिक हातभारही लावत असते.

हेही वाचा >>>खळखळाट फार..

मानव किलरेस्कर यांचं निधन होतं आणि इला एकटी पडते. तिला सतत वडलांचेच भास होत राहतात. ते अजूनही या वास्तूत आहेत असं तिला वाटत राहतं. तिचं आयुष्य गेली दहा वर्षे त्यांच्याभोवतीच तर फिरत असतं. त्यामुळे ते साहजिकही असतं. मानव यांना मानणारा, त्यांचा स्वत:ला वारसदार म्हणवणारा तरुण, यशस्वी लेखक अंगद याला त्यांच्या निधनाची वार्ता कळल्यावर तो त्यांच्या घरी येतो. त्यांच्या डायऱ्या बघण्याची इच्छा व्यक्त करतो. त्यांची ‘गालिब’ ही अप्रकाशित कादंबरी त्यांनी या काळात लिहिलीय का, हे त्याला बघायचं असतं. इला आधी त्याच्या या प्रस्तावाला विरोध करते. आणि मग त्याच्या औत्सुक्याबद्दल खात्री पटल्यावर त्याला त्यासाठी संमतीही देते. तो त्यांच्या अभ्यासिकेत त्यांच्या डायऱ्या चाळत राहतो. पण संदर्भहीन वाक्यांशिवाय त्याला त्यांत काहीच सापडत नाही. आणि एके दिवशी इला त्याला वडलांच्या टेबलच्या सर्वात खालच्या ड्रॉवरची किल्ली देते आणि त्यात बघायला सांगते. त्यात त्याला ‘गालिब’वरच्या त्यांच्या कादंबरीचं हस्तलिखित सापडतं. तो इलाला आपण ते धूमधडाक्यात प्रसिद्ध करूया म्हणून सांगतो. पण इला त्याला ‘ती कादंबरी आपणच लिहिली’ असल्याचं सांगून जबर धक्का देते. त्याचा त्यावर विश्वासच बसत नाही. वडलांचं श्रेय ती लाटायचा प्रयत्न करतेय असं त्याला वाटतं. त्यातून त्यांची झकाझकी होते. इलाची बहीण रेवाही यात अंगदचीच बाजू घेते. इला गालिबवर कादंबरी लिहू शकेल हे तिलाही शक्य वाटत नाही. वडलांच्या जाण्याचा इलाच्या मनावर परिणाम झालाय आणि त्यातूनच ती असं म्हणतेय असं तिला वाटतं. ती हे घर विकून इलाला आपल्याबरोबर मुंबईला येण्यास सांगते. पण इला तिला ठाम विरोध करते.

हेही वाचा >>>‘चांगल्या कामाच्या बळावरच चित्रपटसृष्टीत टिकू शकता’

आपणच ती कादंबरी लिहिल्याचं त्यांना ती परोपरीनं सांगू बघते. पण त्यांचा त्यावर विश्वास बसत नाही. तेव्हा नाइलाजानं चिडून इला अंगदला ‘ती कादंबरी नेऊन तूच ती प्रसिद्ध कर.. वडलांच्या नावावर, किंवा अगदी स्वत:च्याही नावावरही..’ असं त्याला सांगते..

ती कादंबरी नक्की कुणी लिहिलीय, हे अर्थातच यथावकाश उघड होतं.

लेखक-दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी मानव किलरेस्कर या लेखकाचं मनोरुग्णाईत होणं आणि त्यांच्या सान्निध्याचा त्यांच्या मुलीवर होणारा परिणाम हा या नाटकाचा गाभ्याचा विषय केला आहे. त्यानिमित्तानं अशा माणसाच्या आजूबाजूच्यांचं होणारं अप्रत्यक्ष शोषण, त्यातून घडणारं त्यांचं वर्तन, त्यातले तिढे त्यांनी नाटकात तपशिलांत मांडले आहेत. एक लेखक या नाटकाच्या केंद्रस्थानी असल्यानं ‘अभिजात’ लेखन आणि ‘यशस्वी’ लेखन यावरही त्यांनी यात सविस्तर चर्चा केली आहे. मनोरुग्णाईताचं भयगंडावस्थेतलं जगणं आणि त्याच्या भोवतालच्या माणसांवर होणारे त्याचे परिणाम त्यांनी बारकाईनं नाटकात चित्रित केले आहेत. त्यातही मानव किलरेस्करांसारख्या प्रथितयश लेखकाचं मनोरुग्ण होणं, ही तर खासच बाब. यातली सगळी पात्रं त्यांनी त्यांच्या स्व-भावविभावांसह प्रत्ययकारी रेखाटली आहेत. त्यांच्यातले संबंध, त्यांच्या वर्तणुकीतले पेच आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुंतीची परिस्थिती त्यांनी समजून उमजून मांडली आहे. सगळी माणसं आपापल्या जागी योग्यच असतात, पण समज-गैरसमजानं त्यांच्या वृत्तीत फरक पडतो. तो काय, हे दर्शवणारं हे नाटक आहे. इलाच्या अठराव्या वाढदिवसाचा प्रसंग नाटकात एकदा संवादातून येतो, तर एकदा तो प्रत्यक्ष दाखवलेला आहे. ही पुनरुक्ती टाळता आली असती. संहितेतून प्रयोग कोरून काढताना चिन्मय मांडलेकर यांनी प्रत्येक पात्राचं वागणं-बोलणं, त्यातले आरोह-अवरोह, पेच यांवर भर दिला आहे. इला या पात्राभोवती अधिककरून नाटक फिरत असल्यानं तिचं नाटकभरचं अस्तित्व ठाशीवपणे मांडलं गेलं आहे. अंगदचा वापर विषयाची खोली आणि रहस्यमयता वाढवण्यासाठी केला गेला आहे. मानव किलरेस्करांचं त्या घरातलं अस्तित्व इलाला होणाऱ्या भासांसाठी महत्त्वाचं आहेच.. ज्यातून नाटक आकारास येतं. मांडलेकरांनी एक वेगळाच विषय यानिमित्तानं मराठी रंगभूमीवर आणला आहे. सगळी पात्रं, त्यांच्यातले परस्परसंबंध आणि त्यांतून घडणारं नाटय़ त्यांनी आखीवरेखीवपणे प्रयोगात रेखाटलं आहे.

प्रदीप मुळ्ये यांनी नेपथ्य आणि प्रकाशयोजनेतून यातील नाटय़ चांगल्या प्रकारे खुलवलं आहे. मानव किलरेस्करांचं बंगलावजा घर वास्तवदर्शी, तर त्याच्या मधल्या चौकातलं चालू-बंद होणारं कारंजं हे प्रतीकात्मक आहे. त्यांनी प्रकाशयोजनेतून यामधील नाटय़ात्म क्षण जिवंत केले आहेत. राहुल रानडे यांचं संगीत आणि राजेश परब यांची रंगभूषा, मंगल केंकरे यांची वेशभूषा नाटकाची मागणी पुरवणारी आहे.

गौतमी देशपांडे यांनी इलाचं विक्षिप्ततेकडे झुकणारं, पण आतून सच्चं असणारं पात्र अक्षरश: जिवंत केलं आहे. त्यांचं वागणं, वावरणं, बिनधास्तपणाकडे झुकलेली भाषा, मधेच भावनिक होणं, वडलांच्या अस्तित्वाचे त्यांना होणारे भास, त्यातून आलेलं गोंधळलेपण हे सारं त्यांनी उत्कटतेनं साकारलं आहे. आपल्यातल्या समर्थ लेखिकेचा साक्षात्कार झाल्यानंतरचा त्यांचा कमालीचा आत्मविश्वासही तेवढाच महत्त्वाचा. विराजस कुलकर्णी यांनी अंगदचा एक ‘यशस्वी’ लेखक आणि ‘अभिजात’तेचा त्याचा ध्यास यांच्यातला संघर्ष छान दाखवला आहे. ‘गालिब’च्या लेखकाचा शोध घेत असताना त्यांची झालेली द्विधावस्था त्यांनी नेमकेपणानं हेरलीय. गुरुराज अवधानी यांनी मानव किलरेस्कर या मनोरुग्णाईत लेखकाची संभ्रमावस्था, त्यांचं मधूनच वास्तवात येणं, त्यांचा घरातला आभासी वावर या गोष्टी यथातथ्य दाखवल्या आहेत. त्यांच्या मूळच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाचाही त्यांना इथे लाभ झालाय. अश्विनी जोशी यांची रेवा वास्तववादी.

एकुणात, एक वेगळ्या पठडीचं नाटक पाहिल्याचं समाधान ‘गालिब’ देतं.

Story img Loader