जैमिनी प्रभुणे
बॉलीवूडच्या सुवर्णकाळातील संगीतकार ज्यांचे नाव आणि कर्तृत्व कुठेतरी इतिहासाच्या पानात हरवून गेलं आहे, त्यांना पुन्हा प्रकाशात आणणारं एक नाव म्हणजे ‘स्वर आलाप’चे दिनेश घाटे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिनेश घाटे यांचे अकस्मित निधन झाले. नोकरी सोडून संगीताच्या प्रेमापोटी या कार्यात झोकून देणाऱ्या आणि अनेक गुणवंत गायक, वादक, संगीतकार यांना प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या दिनेश घाटे यांच्या आठवणी जागवणारा हा लेख.

जानेवारी २००३ चा काळ… संगीतप्रेमींनी जुन्या बॉलीवूडच्या गाण्यांवर ताल धरला होता; एस.डी., आर.डी., एल.पी. यांनी संगीतबद्ध केलेली लोकप्रिय गाणी गायली जात होती आणि श्रोत्यांकडून पुन्हा पुन्हा ती गाणी ऐकवण्याची मागणी होत होती. त्याचवेळी बाजूला एका ठिकाणी एकत्र आलेला तरुणांचा काही गट या लोकप्रिय गाण्यांना आपल्या विविध वाद्यांच्या वादनातून स्वरसाज चढवणाऱ्या दिग्गज कलाकारांच्या सत्कारात गुंतला होता.

अशाच तऱ्हेच्या एका बहारदार कार्यक्रमात प्रेक्षकांची मिळणारी दाद अनुभवत पुन्हा रसिकांसमोर वादनात रमलेल्या संगीतकार आर. डी. बर्मन यांचे प्रमुख सॅक्सोफोन वादक आणि संगीत संयोजक मनोहारी सिंग यांचा कंठ दाटून आला होता. ‘तुम्ही संगीत क्षेत्रातील आमची दुसरी खेळी खेळण्याची संधी आम्हाला दिली आहे. संगीतवादनातील आमची यशस्वी कारकीर्द गाजवल्यानंतर आता आपण फक्त घरात बसून आठवणींमध्ये रमण्यापुरते उरलो आहोत असंच आम्हाला वाटत होतं’, अशा शब्दांत मनोहारी सिंग यांनी दिनेश घाटे नामक तरुणाचे आभार मानले होते. संगीताची आवड आणि या क्षेत्रात काही करण्याच्या ध्यासाने पछाडलेला हा २२ वर्षांचा तबला वादक. उत्पादन कंपनीतील मोठी नोकरी सोडून देऊन तो पूर्णपणे संगीत क्षेत्रात उतरला होता.

हेही वाचा >>>‘महाराज’ चित्रपटासाठी ४४ वर्षीय अभिनेत्याने घटवलं तब्बल २६ किलो वजन, Fat to Fit फोटो पाहून चाहते झाले चकित

दिनेशचे आभार मानणाऱ्यांच्या यादीत मनोहारी सिंग हे पहिलं नाव नव्हतं. १५ जानेवारी २००३ रोजी, या उत्साही तरुणाने माटुंग्यातील भाईदास हॉलमध्ये असाच एक अनोखा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये पहिल्यांदा तालवाद्यांची ओळख करून देणारे दिग्गज कावास लॉर्ड आणि ज्यांच्या बास गिटारशिवाय आर. डी. चे ‘मासूम’ चित्रपटातील अत्यंत गाजलेले ‘तुझसे नाराज नही’ हे गाणे अपूर्ण ठरले असते त्या बास वादक टोनी वाज यांचा सत्कार केला.

बॉलीवूडच्या दिग्गज मांदियाळीतील कोणीही विचार केला नसता असा विचार या तरुण संगीतवेड्याने प्रत्यक्ष कृतीत उतरवला. कधीच प्रकाशात न आलेल्या संगीतकारांना, वादकांना लोकांसमोर आणणं हेच त्याचं ध्येय होतं. चित्रपट संपल्यानंतर पडद्यावर पुढे पुढे सरकत जाणाऱ्या लांबलचक श्रेयनामावलीत प्रत्येकाचं नाव नमूद केलेलं असायचं, अगदी चित्रपटासाठी वेशभूषा बघणाऱ्याचे नावही यादीत असायचं. मात्र ज्यांच्या संगीताने, वाद्यांनी सजलेली गाणी रसिकांच्या मनात रुंजी घालतात त्यांचा उल्लेखही यात नसायचा हे पाहून त्याचं मन अस्वस्थ व्हायचं. आपल्याकडे कुठल्याही प्रकारे आर्थिक बळ नाही याची कल्पना असतानाही पडद्यामागे राहून रसिकांचं मन जिंकणाऱ्या या संगीतकारांना लोकांसमोर आणायचंच हा निर्धार त्याने केला. पैशाची पर्वा न करता झपाटून या संगीतकारांच्या सन्मानसोहळ्याच्या मागे लागलेल्या दिनेश यांनी स्वत:च त्यासाठी पदरमोड केली. ‘कधी बाईकवर, कधी लोकल ट्रेनमधून लटकत त्यांनी संगीत क्षेत्रातील एकेकाळी नामंवत ठरलेले मात्र आता ज्यांचा पत्ताही कोणाला माहिती नाही अशा लोकांना शोधून काढलं’, अशी आठवण दिनेशबरोबर नव्वदच्या दशकात ‘दस्तक’ नावाची संगीत संस्था सुरू करणाऱ्या प्रसिद्ध गायक संजय शाह यांनी सांगितली.

मदन मोहन यांच्यासाठी संगीत संयोजन करणारे, ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील सुमधुर गाण्यांमुळे घरोघरी लोकप्रिय झालेले संगीतकार उत्तम सिंग यांनीही विस्मृतीत गेलेल्या संगीतकारांना पुन्हा नावलौकिक मिळवून देण्यासाठी दिनेशने ज्या पद्धतीचे काम केलं त्याला तोड नाही, असं सांगत त्याच्या जाण्यानंतर पुन्हा अशा पद्धतीचे काम कोण करू शकेल माहिती नाही, अशी खंतही व्यक्त केली. अतुलनीय प्रतिभा असलेले संगीत संयोजक अॅन्थनी गोंसाल्विस, मँडोलिन वादक किशोर देसाई, सरोद वादक झरीन दारुवाला, तालवाद्या वादक रणजीत गजमेर आणि होमी मुल्ला, बँजो वादक रशीद खान, सॅक्सोफोन वादक श्यामराज, गिटार वादक आणि संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचे बंधू गोरख शर्मा, संगीत संयोजक इनॉक डॅनियल या संगीतक्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार दिनेश घाटे यांनी केला होता. ‘ज्यांची ओळखच कोणाला नाही, ज्यांचं संगीतक्षेत्रातील अलौकिक कार्य कोणालाच माहिती नाही अशा संगीतकारांचा सत्कार दिनेश घाटेंशिवाय अन्य कोणी केल्याचं आठवत नाही. या संगीत कलावंतांच्या गिटार, बँजो, अॅकार्डियन, रिदम आणि इतर वाद्यांच्या सुरावटींमुळेच दिग्गज संगीतकारांची गाणी सुपरहिट ठरली आहेत’, अशा शब्दांत विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांनी दिनेश यांच्या कार्याचं महत्त्व उलगडून सांगितलं.

हेही वाचा >>>“माझा जवळजवळ गर्भपात…”, मीरा राजपूतने सांगितला ‘तो’ वाईट प्रसंग; म्हणाली, “शाहिद माझ्या डॉक्टरांशी…”

दिनेशने संगीतक्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने मुंबईतील एका उत्पादन कंपनीतील नोकरी सोडली. आणि संजय शाह यांच्याबरोबर ‘दस्तक’ या नावाने संगीत कार्यक्रम करणाऱ्यांबरोबर तबला वादक म्हणून सुरुवात केली. ‘वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करत असताना प्रेक्षकांचं सगळं कौतुक भरभरून फक्त गायकाच्या वाट्याला येतं हे त्यांच्या लक्षात आलं. वादक कलाकारांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळवून द्यायचीच या निर्धाराने दिनेश यांनी असं काही कार्य उभारलं ज्याची कल्पनाही कोणी केली नव्हती’, अशी आठवण त्यांचे मित्र प्रतीक शाह यांनी सांगितली.

खरं तर, विस्मृतीत गेलेल्या संगीत कलावंतांचा शोध घेण्याचे दिनेश आणि त्यांच्या मित्राचे कार्य ‘म्युझिक मस्ती’ या खंडात्मक पुस्तक प्रकाशनापासून सुरू झाले होते. गूगलसारखे सर्च इंजिन वा अन्य कोणत्याही तंत्रज्ञानाचा आधार नसताना अथक परिश्रम आणि संशोधनातून त्यांनी पाच खंडांचे पुस्तक प्रकाशित केले, ज्यात २१०० गाणी, त्या गाण्यांच्या बोल आणि अन्य संदर्भांचा विभागवार उल्लेख केलेली माहिती याचा समावेश आहे. ‘हे पुस्तक विविध संगीत कार्यक्रम, सोहळे आयोजित करणाऱ्यांसाठी आणि संगीतक्षेत्रातील अनेकांसाठी जणू विश्वकोश ठरले होते. इतकेच नाही तर गाण्यांचे अनेक बहारदार किस्से ऐकवत दूरचित्रवाहिनीवर कार्यक्रम सादर करणाऱ्या अभिनेते-निवेदक यांच्यासाठीही या पुस्तकाने संदर्भग्रंथाचे काम केले होते’, अशी माहिती सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या संजय शाह यांनी दिली.

संगीतक्षेत्रात विलक्षण कार्य उभारलेल्या दिनेश घाटे यांचे २ जून रोजी वयाच्या ५५ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. ‘दिनेशचे निधन झाले आहे यावर विश्वासच बसत नव्हता, मी त्याच्या जवळच्यांना फोन करून याची खातरजमा करून घेतली. माझी संगीतक्षेत्रातील कारकीर्दच नव्हे तर सगळ्याच गोष्टी केवळ त्याच्यामुळे झाल्या होत्या’, अशी भावना संगीतकार प्यारेलाल आणि आनंदजी यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये नियमित वादन करणारे गिटार वादक आणि संगीत दिग्दर्शक रवींद्र खरात यांनी व्यक्त केली. दिनेश यांचे चिरंजीव नीरव यांनाही मित्रासम असलेल्या वडिलांच्या जाण्याने मोठा धक्का बसला होता. त्यातून स्वत:ला सावरत यापुढेही वडिलांनी उभारलेले कार्य सुरूच राहिले पाहिजे आणि ते पुढे नेण्यासाठी मी सर्व काही करेन, असा विश्वास नीरव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.

‘दिनेशच्या जाण्याने संगीतकारांचे मोठे नुकसान झाले आहे. स्टेजच्या मागे काम करणाऱ्या संगीतकारांसाठी काहीतरी ठोस करायला हवे असा विचार कोणीही केला नव्हता. त्याने कलावंतांसाठी मुंबईत उभारलेले काम हे एकमेवाद्वितीय आहे. मला आठवतं की अनेकदा संगीतकारांच्या कठीण काळात त्यांच्या घरी जाऊन पैशांची मदत त्याने केली आहे. आता असं काम कोण करेल मला माहिती नाही.’- उत्तम सिंग, संगीत दिग्दर्शक.

‘दिनेश भाईंचे सर्जनशील योगदान असामान्य होते आणि त्यांचे कार्यक्रम वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित असायचे. उत्तम कार्यक्रमासाठी काय आवश्यक आहे हे त्यांना ज्ञात होते, त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केल्यानंतर खऱ्या अर्थाने समाधान वाटायचे. त्यांच्यासारखा संगीतक्षेत्राचा अभ्यासक आणि तितकाच दर्दी कलावंत आता आपल्यात नाही, या भावनेने संगीतक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.’- जावेद अली, गायक.