माझ्या कुटुंबात, माझ्या मित्रपरिवारामध्ये, मी ज्या शहरात-गावात-परिसरात राहतो त्या ठिकाणी माझी ओळख काय? माझं अस्तित्व काय? कोहम् या प्रश्नांचं उत्तर जाणीव-नेणिवेच्या पातळीवर प्रत्येकजण शोधत असतो. मी ज्या भवतालाचा भाग आहे तिथे सगळेच माझ्यासारखे नसतीलही. माझी भाषा, माझ्या राहणीमानाच्या-खानपानाच्या सवयी त्यांच्यापेक्षा वेगळ्या असतील, पण तरीही त्या भवतालाने मला सामावून घेतलं आहे, मी त्यांचाच एक भाग आहे, या भावनेला जेव्हा हादरे बसायला लागतात तेव्हा माणसाने नेमकं काय करायचं? जिथे जन्मापासून आपल्या व्यक्तित्वाची रुजवात झाली तिथे अचानक आपल्यावर ‘अल्पसंख्याक’ असल्याचं लेबल लागतं. मग तू आमच्यातला नाहीस हे ठळकपणे दाखवणाऱ्या कारवाया अचानक अंगावर यायला लागतात तेव्हा मनात नेमकी काय खळबळ माजते, त्यातून उमटणाऱ्या प्रतिक्रिया आणि मग टराटरा फाटत जाणारं आपलंच जग… या सगळ्याचं प्रभावी चित्रण ‘फॉलोअर’ या चित्रपटात पाहायला मिळतं.
विषय असतो एका वेगळ्या घटनेशी संबंधित… पण त्या विषयाचे सर्वव्यापी आणि सार्वकालिक परिणाम कसे सारखेच असतात, हे जाणवून देणारा आणि आता अचूक वेळ साधत प्रेक्षकांसमोर आलेला चित्रपट म्हणून हर्षद नलावडे लिखित – दिग्दर्शित ‘फॉलोअर’ हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद आणि त्यात भरडून निघणारं बेळगाव हा गेली कैक वर्षं चिघळलेला विषय आहे. बेळगावात राहणाऱ्या मराठी माणसांना अन्याय्य वागणूक मिळते आहे हे सत्य नाकारण्यातही अर्थ नाही, मात्र गेली अनेक वर्षं मराठी आणि कानडी भाषिक बेळगावात एकत्र राहत आहेत. कित्येक मराठीजनांच्या पिढ्या सीमाप्रश्नी सुरू असलेल्या लढ्यात सहभागी झाल्या आहेत. आताही कित्येक तरुण नव्याने या लढ्यात सहभागी होत आहेत, पण या प्रश्नावर सामोपचाराने मार्ग काढण्याचा प्रयत्न केंद्रीय स्तरावरून होत नाही.
त्यामुळे स्थानिक पातळीवर एकीकडे मराठी भाषिक संघटना – कन्नड भाषिक संघटना एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभ्या आहेत. तर दुसरीकडे राजकारणी, सत्ताधारी सगळेच आपापल्या परीने या प्रश्नावर पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्यामध्ये तिथे जन्माला आलेल्या, एकत्र लहानाच्या मोठ्या झालेल्या युवा पिढीचं काय? भाषा, धर्म, जात हे सगळे भेदोभेद मान्य करूनही जिवलग म्हणून वाढलेल्या या निकोप मैत्रीला दोन्हीकडच्या भाषिक संघर्षामुळे कसं खिंडार पडत जातं? नेमकी काय भूमिका घ्यायची? योग्य – अयोग्य निर्णय, भूमिका कोणती हे ठरवणार कोण? आपापली समज, दृष्टिकोन आणि भवतालातून येणारे अनुभव या बळावर यातून बाहेर पडण्याचे किंवा मग लढण्याचे मार्ग निवडले जातात. चेहरा नसलेली समाजमाध्यमे ही अशा वादांमधला अंगार फुलवण्याचं सहजशस्त्र ठरत आहेत. जोपर्यंत विध्वंस होत नाही, तोवर आपण काय दुधारी शस्त्र घेऊन वावरतो आहोत याचं भान तरुण पिढीलाही येत नाही, या सगळ्याचं मार्मिक आणि प्रभावी चित्रण ‘फॉलोअर’ चित्रपटातील फक्त तीन मित्रांच्या गोष्टीतून पाहायला मिळतं. ‘फॉलोअर’ हा चित्रपट विषय म्हणूनही वेगळा आहे आणि मांडणीच्या दृष्टीनेही अत्यंत सहज, अकृत्रिम शैलीतील असल्याने भिन्न अनुभूती देणारा प्रयोग आहे. मोजून तीन मुख्य पात्रांभोवती चित्रपटाची कथा रचण्यात आली आहे. सचिन, रघु आणि परवीन या तिघांची ही गोष्ट आहे. परवीन नुकतीच दुबईतून नवऱ्यापासून तलाक घेऊन परतली आहे. सचिन आणि रघु तिचे बालपणापासूनचे मित्र.
रघु मराठी भाषिक कुटुंबातला आहे. त्याच्या वडिलांचं दुकान आहे. तो स्वत: शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी धडपडतो. अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेला रघु काही काळ महाविद्यालयात प्राध्यापकी करतो, पण तिथे त्याची आर्थिक वाढ होत नाही. तो मराठी असल्याने त्याला कधीच पगारवाढ किंवा बढती मिळणार नाही, हे त्याच्या वडिलांचं मत. सुरुवातीला ते फारसं मनावर न घेणाऱ्या रघुवर परिस्थितीवश वडिलांचं दुकान चालवण्याची वेळ येते. एकीकडे त्याला दुकानाच्या कन्नड भाषिक मालकाकडून येणारे अनुभव आहेत. त्याचा मित्र सचिन हा तसा सुखवस्तू कुटुंबातला. सचिनला पैशासाठी काही करायची गरज नाही, पण हळूहळू सामाजिक प्रश्नांवर व्हिडीओ बनवत ते लोकांपर्यंत पोहोचवणं या त्याच्या आवडीचं व्यवसायात रूपांतर होतं. तो इन्फ्लूएन्सर म्हणून काम करायला लागतो. तर परवीनला बाळ होतं आणि ती एकटीने बाळाला वाढवायचा निर्धार करते. या तिघांच्या आयुष्यात असं काहीतरी घडून जातं, विशेषत: रघु आणि सचिनच्या नात्यात… ज्याचे पडसाद त्यांच्या एकमेकांबरोबरच्या नात्यावर उमटतात. रघुच्या तर आयुष्याची पूर्ण उलथापालथ होते. ती नेमकी कशामुळे? याचा सीमावादाशी काय संबंध? आणि कोण कोणाला फॉलो करायला लागतं? स्वतंत्रपणे जगू पाहणारे तरुण कुठल्यातरी नेत्याचे, पंथाचे वा विशिष्ट विचारसरणीचे अनुयायी का होऊ पाहतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ‘फॉलोअर’ पाहताना मिळत जातात.
हर्षल नलावडे हा या चित्रपटाचा लेखक – दिग्दर्शक आणि चित्रपटात रघुची मुख्य भूमिका साकारणारा रघु बसरीमारद आणि अन्य कलाकार हे सगळे कर्नाटकातले आहेत. हर्षल स्वत: मराठी असला तरी त्याचं कुटुंब प्रामुख्याने कन्नड भाषेत बोलणारं आहे. त्यामुळे मुळात त्या प्रांतात राहणारे आणि स्वत: या जगण्याचा अनुभव घेतलेले कलाकार हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य. हर्षलने याआधी अनेक लघुपट दिग्दर्शित केले आहेत. त्याची या विषयाची समज आणि चित्रपट कुठेही कंटाळवाणा वाटणार नाही, अशा पद्धतीने केलेली नेमकी मांडणी यातली त्याची हातोटी खरंच वाखाणण्याजोगी आहे. कुठेही भडक नाट्य नसलेला, कानडी हेल असलेली मराठी – इंग्रजी-हिंदीमिश्रित संवाद हे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यामुळे विषय, मांडणी, भाषा आणि अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या कलाकारांचा नितांतसुंदर, सहज अभिनय सगळ्याच बाबतीतलं नावीन्य या चित्रपटात अनुभवायला मिळतं. आणि हा विषय फक्त बेळगाव प्रश्नापुरता नाही, सध्या देशभरात सुरू असलेला हिंसाचार, कुठल्यातरी अमुक विचारसरणीचं अंधानुकरण, समाजमाध्यमांचा गैरवापर या सगळ्याचं मूळ शोधण्याचा, मांडण्याचा प्रयत्न करणारा हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांकडून फॉलो व्हायला हवा.
फॉलोअर
दिग्दर्शक – हर्षल नलावडे
कलाकार – हर्षल नलावडे, रघु बसरीमारद, डोना मुन्शी.