लोकसत्ता प्रतिनिधी
‘बायकांना जग चालवायला दिले तर युद्ध होणार नाही, फक्त देश एकमेकांशी न बोलणारे असतील’, अशा अनेक टीका-टोमणे-टिप्पण्यांना सामोरी जाणारी स्त्रीशक्ती अलीकडे रुपेरी पडद्यावर धमाल करत आहे. त्याचाच पुन:प्रत्यय ‘नाच गं घुमा’च्या निमित्ताने रसिकांना नव्याने येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सुरुवात झाली असून चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच परेश मोकाशीसोबत अभिनेता स्वप्निल जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती करणार आहे. तर, मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत असणार आहेत.
हेही वाचा >>>“आपलं आरोग्य चांगलं नसेल तर…”, आजारपणानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आला श्रेयस तळपदे; म्हणाला, “मी भोगलंय…”
महिलांच्या अवतीभवती घडणाऱ्या आणि त्यांच्याशी संबंधित अनेक छोटय़ा-मोठय़ा गोष्टी यात गुंफल्या गेल्या आहेत. महिलांच्या संबंधातील गोष्टी साकारताना स्त्रीत्वाचा एक वेगळा पैलू अलगद समोर येतो आणि तिच्या बुद्धिमत्ता – भावनेच्या अचूक मिश्रणावर प्रकाश पडतो. बायकांच्या विविध स्वभाव वैशिष्टय़ांवर आणि त्यांवर आधारित गमती-जमतींवर चित्रपट बेतला आहे. चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळी सर्वच कलाकार एकत्र आले आणि एक झकास भट्टी जमून आल्याची पोचपावतीच प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. असे मत दिग्दर्शक आणि निर्माता स्वप्निल जोशीने व्यक्त केले.