करोना कालावधीपासून ते अगदी आजपर्यंत महाराष्ट्रातील जनतेला खळखळून हसवणारा शो म्हणजे सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. समीर चौगुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर यासारखे जुने कलाकार असो किंवा दत्तू मोरे, शिवाली परब, ओंकार भोजने असो या साऱ्या कलाकारांनी साकारलेली पात्र आणि सादर केलेले स्किट्स हे महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोहचली आहेत. विशेष म्हणजे हा कार्यक्रम केवळ सर्वसामान्यच नाही तर बॉलिवूडचे बीग बी म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चनही बघतात. केवळ हा कार्यक्रम ते बघत नाही तर तो त्यांच्या मुलगा अभिषेक यानेही पहावा असा त्यांचा आग्रह असतो. यासंदर्भातील माहिती याच कार्यक्रमामध्ये हास्यवीर म्हणून सहभागी झालेला अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने लोकसत्ताच्या ‘डिजीटल अड्डा’वरील विशेष मुलाखतीमध्ये सांगितलीय.
अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असणारा ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ जून रोजी प्रदर्शित होत आहे. याच निमित्ताने तो लोकसत्ताच्या ‘डिजीटल अड्डा’च्या कट्ट्यावर चित्रपटाबद्दल गप्पा मारण्यासाठी आला होता. चित्रपटाबद्दल बोलतानाच हास्यजत्रेचा विषय निघाला आणि कार्यक्रमात सतत हसतो त्याप्रमाणे अगदी मनमोकळेपणे या कार्यक्रमातील किस्से सांगू लागला. यावेळी त्याला हास्यजत्रेच्यानिमित्ताने अमिताभ बच्चन यांची भेट घेण्याची संधी मिळालेली त्याचसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर बोलताना प्रसादने अमिताभ हे आपले सर्वात आवडते अभिनेते आहेत. त्यांना भेटणं ही माझ्यासाठी फॅन मोमेंट होती असं मान्य केलं.
अमिताभ बच्चन यांच्यासोबचा फॅन मोमेंट कशी होती, असा प्रश्न प्रसादला विचारण्यात आला असता त्याने, “अरे काय प्रश्न आहे,” असं आनंदात म्हटलं. पुढे बोलताना, “मला आजपर्यंत हे कोणीच नाही विचारलं आजपर्यंत अन् मला कधी हे सांगता येईल असं झालं होतं. मला बच्चन साहेब असं म्हणाले की मी अभिषेकला रोज सांगतो की, पूर्ण कार्यक्रम नको बघू हवं तर एक स्किट रोज पाहिलं पाहिजे. बरंच काही शिकायला मिळेल,” अशी प्रतिक्रिया प्रसादने दिली.
तसेच पुढे बोलताना प्रसादने, आम्ही कलाकार तिथे पोहचण्याआधी अमिताभ बच्चन हे कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन मोटे, आणि सचिन गोस्वामी यांच्याशी बोलताना हे समोर बसतात त्यांना (प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर) तुम्ही रिअॅक्शन लिहून देता ना?, तर त्यांनी नाही, नाही. ते त्यांच्या एक्सटेम्पो रिअॅक्शन असतात. काहीही लिहून दिलेलं नसतं असं सांगितलं. “ते ऐकून अमिताभ बच्चन मला असं म्हणाले की, हे तुम्ही कसं बोलता. दर वेळेस नवी प्रतिक्रिया, त्यात पुन्हा पुन्हा तीच प्रतिक्रिया नाही बरं त्यावरही त्या मजेशीर असतात. बोलताना सर्वांचा मान राखला जातो. मी तुमच्या जागी असतो तर मला बोलता आलं नसतं. ही माझ्यासाठी फार मोठी कॉम्पिलमेंट होती,” असं प्रसाद म्हणाला.
“माझ्यासाठी बच्चनसाहेब देव आहेत. त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया मिळणं म्हणजे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं,” असंही प्रसादने पुढे बोलताना सांगितलं.