एखाद्या सामाजिक धोरणातील होऊ घातलेला बदल आणि त्याच विषयावर भाष्य करणारा चित्रपट दोन्ही हातात हात घालून एकत्र पुढे येताना पाहणं हा दुर्मीळ योगायोग आहे. हंसल मेहता दिग्दर्शित ‘अलिगढ’ या चित्रपटाने तो योगायोग साधला आहे. समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवणारे कायद्यातील ३७७ कलम, हे कलम रद्द व्हावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेले प्रयत्न यापलीकडे जात मुळात हे संबंध समाजाने स्वीकारायला हवेत. ते का स्वीकारायला हवेत, हा मुद्दा अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. कायद्याच्या कलमांपलीकडे जात सामान्य माणूस म्हणून समलिंगी संबंधांकडे पाहण्याची नवी दृष्टी हा चित्रपट देतो.

अलिगढ विद्यापीठात मराठी शिकवणारे प्राध्यापक श्रीनिवास सिरास यांच्या वास्तव आयुष्यावर हा चित्रपट बेतला आहे. त्यामुळे सिरास यांच्या आयुष्याचा प्रामाणिकपणे वेध घेतानाच समलिंगी संबंध म्हणजे नेमके काय? त्याची गरज का भासते? याही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केला आहे. श्रीनिवास सिरास यांच्यावर स्टिंग ऑपरेशन करून त्यांचे समलैंगिक संबंध जगासमोर आणले गेले. समलिंगी संबंध हे कायद्याने गुन्हा असल्याने सिरास यांना कामावरून काढून टाकण्यात आले. त्याविरुद्ध सिरास यांनी न्यायालयाकडे दाद मागितली आणि त्यातूनच समलिंगी संबंधांना कायद्याने मान्यता मिळावी, याचा झगडा सुरू झाला. चित्रपटात अभिनेता मनोज वाजपेयीच्या माध्यमातून सिरास यांची व्यक्तिरेखा आपल्यासमोर उलगडत जाते. नागपूरहून आलेला एक तरुण उभी कारकीर्द अलिगढसारख्या नामांकित विद्यापीठात एकमेव मराठी शिकवणारा प्राध्यापक म्हणून लौकिकाने जगतो. आणि प्राध्यापक म्हणून सेवेतून मुक्त होण्याआधीच त्यांच्या आयुष्यातील अत्यंत खासगी बाब असलेली गोष्ट जगासमोर आणली जाते. त्यांच्यावर समाज बहिष्कार टाकतो, विद्यापीठातीलच त्यांचे सहकारी त्यांना कशा पद्धतीने अडचणीत आणून मर्दुमकीच्या टिमक्या वाजवत बसतात या सगळ्या घटना चित्रपटात कथेच्या ओघाने आल्या आहेत. मात्र सिरास समलिंगी होते का? हे पत्रकार दिपू सॅबेस्टियनने (राजकुमार राव) त्यांना विचारलेल्या प्रश्नांमधून शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

दिपू आणि सिरास यांच्यात घट्ट होत गेलेले बंध हाही या कथेचा माणूस म्हणून एकमेकांना समजून घेण्याचा, एकमेकांच्या गरजा समजून घेण्याच्या प्रवासातील महत्त्वाचा धागा आहे. एका ६४ वर्षीय प्राध्यापकाची एकटय़ाने जगताना होणारी घुसमट, त्याच्या शारीरिक गरजा, मानसिक पातळीवर प्रत्येक गोष्टीला तर्कसुसंगत उत्तर मिळेलच असे नाही. मात्र तरीही आपली गरज ओळखून त्यापद्धतीने वागणारा आणि वेळ पडली तर आपल्या लैंगिक हक्कांविरुद्ध लढणारा प्राध्यापक सिरास अभिनेता मनोज वाजपेयी यांनी त्याच्या प्रत्येक छटेसह रंगवला आहे. सिरास हे मराठीचे प्राध्यापक होते, त्यामुळे चित्रपटात त्यांनी गप्पांच्या मैफिलीत रंगवलेले ‘मी मज हरपून बसले रे’ हे गाणेही मनोजच्या आवाजात ऐकायला मिळते. आपल्या मराठी उच्चारांवरही त्याने खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळे कित्येक र्वष उत्तर प्रदेशात स्थायिक झालेल्या या मराठी प्राध्यापकाची भूमिका आपल्या मनावर ठसते. राजकुमार राव याने पत्रकाराची भूमिका यात केली आहे. मात्र ‘स्टोरी’ करत असताना त्यातला माणूस हरवणार नाही, याची काळजी घेणारा हळवा तरुण त्याने उत्तमरीत्या साकारला आहे. चित्रपटाची मांडणी ही संथ आहे. त्यात वेगवान घटना नाहीत. तरीही सिरास यांच्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांना समलिंगी संबंधांबाबतीत नव्याने विचार करायला लावण्याचे कसब दिग्दर्शक म्हणून हंसल मेहतांनी साधले आहे. अत्यंत साध्या पद्धतीने कायद्याच्या चौकटीतून बाहेर पडून मुळात माणूस म्हणून आपण त्यांना स्कीकारतो आहोत का? हा प्रश्न या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकाने उभा केला आहे.

अलिगढ

दिग्दर्शन – हंसल मेहता

कथा – इशानी बॅनर्जी

पटकथा – अपूर्व असरानी

कलाकार – मनोज वाजपेयी, राजकुमार राव, आशीष विद्यार्थी

Story img Loader