बॉलीवूडपट प्रेमकथांकडून भाऊ-बहीण, आईवडील आणि मुलांच्या नातेसंबंधांकडे वळले आहेत. कधीकाळी बडजात्यांच्या चित्रपटात दिसणाऱ्या मोठय़ा आणि गोड-गोड वागणाऱ्या कुटुंबांचे खोटे चित्र नव्हे. आजच्या काळात एकत्र असूनही मनाने एकमेकांपासून कोसो दूर असलेल्यांचीच संख्या जास्त आहे. शकुन बात्रा दिग्दíशत ‘कपूर अँड सन्स’ हा धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेला चित्रपट आहे हे कळल्यावर अशाच कुठल्या तरी चकाचक कपूर खानदानाची गोष्ट डोळ्यासमोर येईल, हा आपला अंदाज काही क्षणांत गळून पडतो. कौटुंबिक निरगाठींची अत्यंत सुंदर फ्रेम आपल्याला हलवून सोडते.
झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात एकमेकांना वरवर सांभाळणाऱ्या छोटेखानी कुटुंबाची कथा दाखवण्यात आली होती. ‘कपूर अँड सन्स’मध्ये ती खरोखरच कपूर कुटुंबाची, त्यांच्यातील नातेसंबंधांची वास्तव कहाणी पाहायला मिळते. चित्रपटाची सुरुवातच मुळी लंडन आणि न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या राहुल (फवाद खान) आणि अर्जुन (सिद्धार्थ मल्होत्रा) या दोन भावांपासून होते. कुन्नूरमध्ये राहणाऱ्या आपले आईवडील (रजत कपूर आणि रत्ना पाठक शहा) आणि आजोबा (ऋषी कपूर) यांच्यापासून दूर परदेशात स्थिरावलेले हे दोन्ही भाऊ आजोबांना बरे नसल्याच्या निमित्ताने घरी एकत्र येतात. या दोन्ही भावांमधला विसंवाद काही मिनिटांतच आपल्याला जाणवतो. ते घरी परतल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांच्या नात्यातही सलणारी अशी एक गोष्ट आहे. आई आणि वडिलांच्या बिघडलेल्या नात्याला आपल्या परीने सावरण्याचा प्रयत्न मोठा मुलगा म्हणून राहुल करतो आहे. आपल्या घरातील विसंवादाची जाणीव असली तरी आपला भाऊ आíथकदृष्टय़ा स्थिरस्थावर असल्याने घरातले त्याचे कौतुक अर्जुनला घराच्या बाहेर जास्त ठेवते. स्वत:ला सिद्ध करण्याची त्याची लढाई या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवते. आपल्या घरातील या सगळ्यांना एकत्र आणण्याची इच्छा आणि प्रयत्न आजोबा करत असतात. त्यांच्या इच्छेसाठी ते सगळे एकत्र येतातही. मात्र, त्यांच्या मनात असलेल्या निरगाठी अधिकच गुंतत जातात. वेगाने घडणाऱ्या घटनांची एक मोठी लाट या निरगाठी सोडवते का? ‘कपूर अँड सन्स’ एकत्र होतात का?, ही गोष्ट खरंच पडद्यावर पाहण्यासारखी आहे.
प्रत्येक कुटुंबाचं दु:ख वेगळं, त्यांच्या समस्या वेगळ्या आणि ते सोडवण्याचीही प्रत्येकाची एक तऱ्हा असते. त्यामुळे एखाद्याची कथा ऐकताना आपल्याला काय त्यांचं? ते बघून घेतील त्यांच्या घरातले प्रश्न?, असे म्हणून आपण सरळ समोरच्याला झटकून टाकू शकतो. मात्र, ही संधी तुम्हाला दिग्दर्शक शकुन बात्राचे कपूर कुटुंबीय देत नाहीत. उलट, प्रत्येक स्तरावरचा अनुभव वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्यांच्याशी जोडून घेतो, हेच या चित्रपटाचे खरे यश आहे. एका मर्यादेपर्यंत पुढे काय घडणार, याची कल्पना आपल्याला येते तरीही दिग्दर्शक आपल्याला त्यांच्या भावनिक प्रवासात एकत्र जोडून ठेवतो.
रूढार्थाने या चित्रपटात सुंदर फ्रेम्स आहेत, खूप आऊटडोअर आहे, असेही नाही. त्यामुळे माणसांची ही कहाणी या चित्रपटातील कलाकारांनी कमालीच्या ताकदीने रंगवली आहे. रजत कपूर आणि रत्ना पाठक यांनी साकारलेले जोडपे आपल्याला अधिक खिळवून ठेवते. आजोबा म्हणून ऋषी कपूर यांच्या वाटय़ाला एकदम परफेक्ट भूमिका आली आहे. प्रॉस्थेटिक मेकअपच्या वापरामुळे ऋषी कपूर यांची खरी ओळख मिटायला थोडीबहुत मदत झाली असल्याने बाकी आजोबांचा मिश्कील, फटकळ, काहीसा रंगेल स्वभाव आणि आपल्या कुटुंबाला सतत जोडून ठेवण्याची त्यांची आस या सगळ्यात त्यांनी जीव ओतला आहे. फवाद खानचा हा दुसरा बॉलीवूडपट आहे. त्याने सहजतेने राहुलची भूमिका साकारली आहे. मात्र या चित्रपटात त्याच्यापेक्षा सिद्धार्थचा सहज अभिनय भाव खाऊन जातो. अलिया भट्टला चित्रपटात फारसे काम नाही मात्र तिने रंगवलेली तिया लक्षात राहते. चित्रपटाचे संगीत मात्र काही प्रमाणात निराशा करते. दोन पार्टी साँग्ज वगळता बाकीची गाणी फारशी लक्षात राहत नाहीत. आजच्या काळातील ताणलेल्या नात्यांचे वास्तव ‘कपूर अँड सन्स’च्या चश्म्यातून मांडणारी ही फ्रेम आपल्याला अस्वस्थ करते.
कपूर अँड सन्स
दिग्दर्शक – शकुन बात्रा
निर्माता – धर्मा प्रॉडक्शन
कलाकार – ऋषी कपूर, फवाद खान, सिद्धार्थ मल्होत्रा, अलिया भट्ट, रजत कपूर, रत्ना पाठक शहा.