– योगेश मेहेंदळे
सेक्रेड गेम्स या नेटफ्लिक्सवरील मालिकेच्या सबटायटल्समध्ये झालेली भाषांतराची अक्षम्य चूक लोकसत्ता डॉट कॉमच्या बातमीनंतर लागलीच सुधारण्यात आली आहे. जितेंद्र जोशीनं साकारलेल्या पोलिस हवालदाराच्या तोंडी मी मराठ्याची अवलाद आहे असा एक डायलॉग आहे. याचं इंग्रजी भाषांतर सबटायटलमध्ये “I’m a whore’s son” असं अत्यंत चुकीचं व आक्षेपार्ह करण्यात आलं होतं. मात्र, सदर वृत्त लोकसत्ता डॉट कॉमवर प्रसिद्ध झाल्यानंतर नेटफ्लिक्सनं त्याची तातडीनं दखल घेत आधीचं आक्षेपार्ह भाषांतर काढलं आहे व “I am Maharashtrian” अशी सुधारणा केली आहे.
या क्षेत्रातल्या जाणकारांच्या म्हणण्यानुसार ही वेबसीरिज हिंदी असली तरी अनेक मराठी पात्र असलेल्या सेक्रेड गेम्समध्ये अनेक संवाद मराठीमध्ये आहेत. परंतु मराठीचा गंधही नसलेल्यांनी हे भाषांतर केल्यामुळे ही चूक घडली असावी अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
या सीरिजमध्ये असलेल्या अत्यंत भडक संवादांवरून व उत्तान दृष्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. या सीरिजमध्ये दिलेल्या राजकीय व्यक्तींच्या संदर्भावरून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच, अशा सीरिजही भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या अधिपत्याखाली असाव्यात यासाठीही याचिका दाखल करण्यात आली होती.
त्यापाठोपाठ #MeToo च्या वादग्रस्त प्रकरणातही ही वेबसीरिज अडकली व तिच्या दुसऱ्या सीझनचं प्रक्षेपण रखडलं. फँटम फिल्मचे सहसंस्थापक व एक लेखक अशा दोघांविरोधात लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आणि ही सीरिज पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली. या पुढचा मार्ग कसा असेल याची आम्ही चाचपणी करत आहोत, असं स्टेटमेंट नेटफ्लिक्सनं त्यानंतर दिलं होतं. आता, मराठ्याची अवलाद किंवा मराठ्याचा मुलगा असं अभिमानानं सांगणाऱ्या काटेकरच्या संवादाचं भाषांतर मी वेश्येचा मुलगा असं झाल्यानं सेक्रेड गेम्सची वादाची परंपरा सुरूच राहिल्याचं दिसत होतं. मात्र, या चुकीची तातडीनं सुधारणा नेटफ्लिक्सनं केल्याचंही बघायला मिळत आहे.