रंगमंचाच्या परिघात वसणारं प्रत्येक नवं विश्व, अवघ्या दहा मिनिटांत उभं राहणारं नेपथ्य, क्षणाक्षणात बदलत चाललेला रंगमंच, त्या रंगमंचीय अवकाशात उभी राहिलेली पात्रं.. पहिलाच ब्लॅकआऊट आणि हळूहळू उजळत चाललेल्या प्रकाशाबरोबर उघडलेला पडदा..
‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत, ‘भारतीय आयुर्विमा महामंडळा’च्या सहकार्याने आयोजित ‘लोकसत्ता लोकांकिका’ महोत्सवाचे अंतिम नाटय़ शनिवारी रवींद्र नाटय़मंदिरच्या रंगमंचावर रंगायला सुरुवात झाली तेव्हा टाळ्यांनी सभागृह दणाणून गेले. आठ शहरांतील, आठ एकांकिका, आठ नवे विषय आणि नवीन असले तरी स्पर्धेसाठी सर्व ताकदीनिशी उतरलेले कलाकार अशा उत्साहात शनिवारी सकाळपासून ‘लोकसत्ता लोकांकिका’ महोत्सवाच्या अंतिम फेरीला सुरुवात झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकांकिको’ महोत्सवासाठी जमलेले मान्यवर रंगकर्मी, स्पर्धक यांच्या उपस्थितीने अवघे रवींद्र नाटय़मंदिर लोकांकिकामय झाले होते. रवींद्र नाटय़मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत एकामागोमाग एक उभे राहिलेले स्पर्धकांच्या सेट्सचे टेम्पो, मध्यवर्ती भागात एकांकिका पाहण्यासाठी उत्साहाने आलेले आणि रांगेने उभे असलेले मान्यवर आणि बाकी सगळीकडे मराठी नाटय़-चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक अशा नामी मंडळींच्या ऐकू येणाऱ्या गप्पा.. एखाद्या चित्रपट महोत्सावादरम्यान दिसणारे असे हे अनोखे आणि भारावून टाकणारे वातावरण ‘लोकांकिका’च्या निमित्ताने पाहायला मिळाले. ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्यासह महाअंतिम फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या दिग्दर्शक विजय केंकरे, नाटककार शफाअत खान, लेखिका-अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये ‘आयरिस प्रॉडक्शन’चे विद्याधर पाठारे, दिग्दर्शक परेश मोकाशी, अभिनेता अनिके त विश्वासराव, प्रथमेश परब अशी कलाकारांची मांदियाळीच ‘लोकांकिका’साठी आवर्जून उपस्थित झाली होती.
प्रभादेवीचा सिद्धिविनायक मंदिराचा परिसर म्हणजे नेहमीच गर्दीने गजबजलेला परिसर शनिवारी या भागात उसळलेल्या गर्दीचे एक वेगळे वैशिष्टय़ होते. या गर्दीमध्ये सर्वाधिक होते नाटय़रसिक, नाटय़प्रेमी, युवक, अभिनेते आणि कलाकार. लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम स्पर्धेसाठी रवींद्र नाटय़मंदिराकडे या रसिकांची मांदियाळी अवतरली होती.
थक्क करणारा जोरकसपणा.. तितकाच उत्साह.. आणि नावीन्याचा वेध घेणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची महाअंतिम फेरी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिराच्या प्रांगणात सुरू झाली. सकाळपासूनच रसिक आणि विविध महाविद्यालयाच्या युवकांचे जथेच्या जथे नाटय़मंदिराकडे येत होते. राज्यभरातील आठ केंद्रांमध्ये पार पडलेल्या एकांकिका समाजातील विविध विषयांचा वेध घेणाऱ्या ठरल्या होत्या. त्यामुळे नाटय़रसिकांनी सकाळपासूनच या स्पर्धेसाठी मोठी गर्दी केली होती. मुंबई आणि उपनगरांमधून दादर आणि तेथून रवींद्र नाटय़मंदिर गाठण्यासाठी प्रेक्षकांची रीघ लागली होती.

मुंबईच्या म. ल. डहाणूकर विद्यालयाच्या ‘बीइंग सेल्फिश’ या एकांकिकेने महाअंतिम फेरीची सुरुवात झाली. त्यापाठोपाठ नाशिकच्या के. के. परफॉर्मिग आर्ट्सची ‘हे राम’, अहमदनगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाची ‘कोंडवाडा’, औरंगाबादच्या डॉ. बामू युनिव्हर्सिटीची ‘मसणवटीतलं सोनं’,  रत्नागिरीच्या डी.बी.जे. महाविद्यालयाची ‘कुबूल है’, पुणे आय.एल.एस. कॉलेजची ‘चिठ्ठी’, नागपूर येथील एस.एल.ए.डी. कॉलेजची बोल मंटो आणि ठाण्यातील सीएचएम कॉलेजची ‘मड वॉक’ल एकांकिका सादर करण्यात आल्या.
आयरिस प्रॉडक्शन्स टॅलेंट सर्च पार्टनर आहेत. अस्तित्व कला मंचच्या सहकार्याने लोकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजकत्व ‘झी मराठी नक्षत्र’ यांचे असून झी मराठी वाहिनीवर लोकांकिका महोत्सवातील लोकांकिका दाखविण्यात येणार आहेत.

मुंबई केंद्रामध्ये विजयी ठरलेली ‘बीइंग सेल्फिश’ ही लोकांकिका पहिले सादर करण्यात आली.. लाइक, शेअर आणि कमेंट या सध्याच्या काळात परवलीचे मानल्या जाणाऱ्या शब्दांची उकल करण्याबरोबरच त्याच्यामागे जात त्याच्या व्यसनात गुरफटून आपले हात गमावणाऱ्या तरुणाची कथा उलगडण्याचा प्रयत्न या एकांकिकेतून झाला.

रामाचा वापर राजकारणासाठी करणे थांबवा असा संदेश देणाऱ्या ‘हे राम’ या एकांकिकेतून जातिव्यवस्था आणि अर्थिक विषमतेचा वेध घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

गरिबीमुळे वेश्या व्यवसायात अडकलेली एक सोळा वर्षांची मुलगी आणि हे वास्तव पचवूनही नकळतपणे आपण आपल्याच मुलीला या व्यवसायात ढकललं हे कळल्यावर स्वत:चा जीव देऊन मुलीला वाचवणारी आई ‘कोंडवाडा’ मध्ये दिसली. तर ‘मसणवटीतील सोनं’ या पूर्वी वाचलेल्या पारंपरिक कथेचा नाटय़ाविष्कार रसिकांना जगण्यासाठी होणारा संघर्ष दाखवून गेला.

उत्कृष्ट संहिता, तगडी तांत्रिक तयारी आणि तितक्याच ताकदीचा अभिनय ही लोकांकिका महोत्सवाची वैशिष्टय़े ठरली. महाविद्यालयातील नवोदित कलाकारांनी साकारलेल्या या लोकांकिका रसिकांना व्यावसायिक रंगभूमीसाठीही नवे विषय, नवे कलाकार, नवे लेखक देणारे ठरेल अशी आशा यानिमित्ताने उपस्थित मान्यवर आणि रसिक मांडत होते.
छाया: गणेश शिर्सेकर, दिलीप कागडा, प्रदीप कोचरेकर

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokankika