मकरंद देशपांडे

लोकसत्ता लोकांकिकाच्या गेल्या वर्षीच्या कार्यक्रमात अभिनेता, दिग्दर्शक, लेखक मकरंद देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले होते. या मंचावर एक नाटय़ सादर करायची त्यांची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. आणि तेवढय़ावरच ते थांबले नाहीत. तर विचाराच्या पातळीवरचं हे नाटय़ त्यांनी प्रत्यक्षात आणलं. लोकांकिकाच्या चौथ्या पर्वाच्या महाअंतिम फेरी सोहळ्यात त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या स्पॉट ऑनया नाटकाची खास झलक सादर झाली. या नाटकामागची कथा, विचारप्रक्रिया मकरंद देशपांडे यांच्याच शब्दांत..

सध्याच्या घडीला आपण बऱ्याच देशांत दहशतवाद पाहतो. तो दहशतवाद धार्मिकही असू शकतो. त्या वेळी एक विचारवंत माणूस म्हणतो, ना मै मारना जानता हूं, ना मरना, कोणता धर्म बरोबर आहे आणि कोणता चुकीचा, याच्याशी मला देणंघेणंच नाही. आणि मला एक गोष्ट पटकन आठवते की, लहानपणी आपण साऱ्यांनीच एक चित्र काढलं होतं, काही डोंगर, त्यांच्यामधून डोकावणारा सूर्य, नदी, मग एक घर, त्यामधून एक पाऊलवाट निघायची ती थेट नदीत जायची, त्याचं कारण काही माहीत नव्हतं. आकाशात कोपऱ्याला काही पक्षी दिसायचे, ते कुठून आले किंवा कुठे जातात माहीत नाही. हळू हळू त्यांना नावं आली आणि मग तो प्रदेश माहिती होत गेला. तिथे घरात राहणारा माणूस समजला. मला वाटतं की तेव्हा तो प्रदेश किंवा माणूस विभागला गेला. मग मुद्दा असा आहे की, तिथे आपण पुन्हा लहानपणाकडे जायला हवं, नाही तर तो विनोद ठरेल. म्हणजे मोठं होणं हा विनोद आहे का? आपल्याकडे उत्सवाला घेऊन जी काही शक्तिप्रदर्शनं होतात, ती शक्तिप्रदर्शनं पाहून कोणता गणपती मोठा, कोणता पंडाल मोठा यावर चर्चा सुरू होते, अगदी माध्यमांमध्येही. मला असं वाटतं की दोन गणपती एकमेकांसमोर येऊन उभे राहिलेत की काय. मला गंमत वाटते. हे काय सुरू आहे? उत्सवांच्या वेळी सर्व कुटंब एकत्र यायचं, आता उत्सवांच्या वेळी मुंबईतली लोकं बाहेर पळतात, एकमेकांपासून दूर जातात. मग हा विनोद नाही का?, असा बराच विचार मी करत होतो. माझ्या नाटकांचा बाज हा नेहमी, मला पडलेले प्रश्न यांच्यावर आधारित असतो. या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. पण त्यांचा विचार करत असताना त्यामधून काही गोष्टी उलगडत जातात.

माझं लिखाण हे जनमानसातलं आहे. कारण मी घरी बसून लिहीत नाही. आजपर्यंत मी जवळपास ५० नाटकं लिहिली असलीत, तर त्यामधली अर्धी नाटकं पृथ्वी थिएटरच्या कॅफेमध्ये लिहिली आहेत. तिथे एखादा माणूस येऊन चहा पिऊन गेला, तर तो माझ्या नाटकातही आलेला आहे. एवढय़ा सहजपणे हे होतं. ‘स्पॉट ऑन’ हे नाटक लिहायचं कारण होतं ‘पॉवरगेम’. दोन विचारप्रवाह आहेत. ताकद वापरणारे आणि दुसरा प्रवाह त्या ताकदीपुढे शरणागती पत्करणारा. जेव्हा एखाद्या देशामध्ये अशी गोष्ट होते. एखादा व्यक्ती मी किती ताकदवान आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो, पण दुसऱ्या बाजूने त्याला भीतीही वाटत असते. तुम्ही त्या ताकदवान माणसांच्या विरोधात काही लिहिलं, तर समाजमाध्यमांवर किंवा मित्रांबरोबर असतानाही आपण बोललो तर लगेच तुमच्यावर स्पॉट ऑन होतो. त्यामुळे सातत्याने तुमच्यावर कुणी ना कुणी स्पॉट ठेवत असतो. एकीकडे लोकशाही असल्याचं आपण म्हणत असलो तरी दुसरीकडे तुमच्या विचारांना मोकळी वाट मिळत नाही. आधी मायनॉरिटीपासून भीती वाटायची, आता मेजॉरिटीपासून भीती वाटते. आता तर कळतच नाही की, मेजॉरिटी मायनॉरिटी आहे की मायनॉरिटी मेजॉरिटी आहे. आणि हे सांगायचं कुणाला. तुम्ही बोलत असताना कुणीतरी तुम्हाला न्याहाळत असतं, हा मराठी माणूस हिंदीत का बोलतोय? मला आठवतं की, जुहूसारख्या ठिकाणी, एक मुलगा गाडीत होता. मला म्हणाला, ‘मकरंद सर कैसे हो आप?’ मी म्हटलं, ‘आय एम फाइन’. मराठीत बोलायला काय होतं, असं तो माझ्यावर जवळपास डाफरलाच. पण हिंदीतून संवाद त्यानेच सुरू केला होता ना. हे सारं कुठून आलं, याचा विचार मी करतो.

शास्त्रज्ञ एक असा माणूस आहे, जो तुमच्या भविष्यासाठी काम करतो. त्याला जात-पात-धर्म काहीच नसतो. विज्ञान हे लोकज्ञान व्हावं, हा विचार माझ्या मनात होता, त्यासाठी शास्त्रज्ञ मी निवडला. तुम्ही जेव्हा पॉवर किंवा विकास म्हणता, त्यासाठी हा शास्त्रज्ञ झटत असतो.  त्यामुळे त्याचा विचार तुम्ही गंभीरपणे करणार आहात की नाही? विकास हा फक्त शब्द आहे की एखाद्या स्तरावर पोहोचण्याचं साधन. मला दहा वर्षे द्या, पंधरा वर्षे द्या, त्यांनी साठ वर्षे देशावर सत्ता चालवली, पण त्यांनी काय केलं. मला हेच कळत नाही की नेमका स्पॉट कुठे आहे? म्हणजे मी जर नागरिक आहे तर माझ्यावर सतत स्पॉट ठेवला आहे, पण या पॉवर असणाऱ्या व्यक्तीवर स्पॉटच नाही. असे बरेच प्रश्न मला पडायला लागले. सेन्सेशनल लिहीन, असा माझा बाज नाही राहिलेला. माझा स्वत:चा तो बाज नाही. माझ्यामते त्यापेक्षा वास्तव, अनुभूती (रिअलायझेशन) हे मोठं आहे आणि त्यावर भाष्य करेन. मी कोणावर बहिष्कार टाकणं किंवा माझा असाही स्वभाव नाही की, तुम्ही माझ्या थोबाडीत मारा, मी ती निमूटपणे खाऊन घेईन. मी त्यापेक्षा वास्तवाकडे जाईन. गौतम बुद्धांचं तत्त्वज्ञान मला आवडतं. अनुभव आणि वास्तव यांची सांगड महत्त्वाची, ही सांगड कुणाला कशी घालता येईल, हे ज्याचं त्याला माहीत. तुम्हाला या गोष्टी एका फॉर्ममध्ये मांडणं, यासाठी कलेची कास धरली जाते. त्यासाठी नाटकांमधला स्वगत हा फॉर्म मी निवडला, कारण स्वगत हे नेहमीच स्पॉटमध्ये म्हटलं जातं. नाटक हे मनातलं असतं, त्यामध्ये घटना घडतात. मनातलं बोलण्यासाठी स्वगत असतं. माझ्यासाठी हे नाटकच स्वगत आहे. त्यामुळे या नाटकातील पात्रं एकामागून एक येतात. सुरुवातीला मी (शास्त्रज्ञ) येतो. मी माझं मत व्यक्त केल्यावर मला गोळ्या मारल्या जातात. मग माझा मुलगा येतो. त्यामध्ये चार वर्षांचा कालावधी गेलेला असतो. चार वर्षांनंतर घराची काय परिस्थिती आहे, हे समजतं. त्यानंतर माझी मुलगी येते. आणि त्यानंतर बायको. त्यानंतर मी पुन्हा येतो. तेव्हा मला पॅरालिसिस झालेला आहे, असं दाखवलं गेलं आहे. या कुटुंबाला मीच लोकांसमोर पाठवलेलं असतं. माझ्या मुलाला क्रांती करायची असते, त्यासाठी मी त्याला ओरडतो. तुला क्रांती कुणासाठी करायची आहे. तू हे कुणाला सांगतोयस, हा सारा मूर्खपणा आहे असं म्हणतो आणि तेव्हा तो शास्त्रज्ञ स्पॉटला सांगतो की, मला माहिती नाही, तुमचा जीडीपी कमी झाला की जास्त झाला. पण माझा मुलगा आणि मुलगी असे दोन शास्त्रज्ञ तुम्ही गमावलेत. त्याची काही गणना तुम्ही करू शकाल तर करा. त्याचं काही गणित किंवा मूल्यमापन तुम्ही करू शकता का? तुम्ही म्हणता आम्ही चांगला काळ आणतो, पण चांगला काळ यापूर्वी होता. त्या वेळी पडलेली जी सूर्याची किरणं होती, ती गोळा करण्याचा माझा कयास आहे, त्या किरणांमध्ये असलेलं आयुष्य शोधण्याचा प्रयत्न करतोय. ते शक्य होईल की नाही, हे मला माहिती नाही. मला आत्ता पैसे नकोच आहेत, ती किरणं शोधायचा मी प्रयत्न करणार आहे. माझा मुलगा मला मदत करेलच. तेवढय़ा स्पॉट थांबतो. आणि म्हणतो, तुम्हाला काही अ‍ॅक्शन घ्यायची असेल तर आत्ताच एक फॅमिली फोटो काढून घ्या. स्पॉट एक फॅमिली फोटो देतो आणि त्यावर नाटक संपतं.

या साऱ्यावर स्पॉटचा मुद्दा हा आहे की, हल्ली तुरुंग (जेल) अंधारकोठडीचा नाही, तर हल्ली तुरुंग स्पॉटचा आहे. जेव्हा तुम्ही काही म्हणता, मांडता तेव्हा तुमच्यावर स्पॉट असतोच. तुम्ही काही म्हटलंत की, सोशल मीडियावर तुम्हाला ट्रोल करणार, कदाचित तुम्हाला गोळ्या घातल्या जातील. तुम्हाला एसएमएसने मारलं जाईल, लाइक्स-डिसलाइक्सने मारलं जाईल. तो स्पॉट ऑन होता माझ्यासाठी. तो स्पॉट ऑन मला फक्त वैयक्तिक करायचा होता, एका कुटुंबाचा करायचा होता. तो शास्त्रज्ञ कुणीच नाही. आईन्स्टाईनही नाही, कारण आईन्स्टाईनला शेवटी अमेरिकेत जावं लागलं. ज्याला त्यांची किंमत कळली, तिथे ते गेले. नाही तर कुणाला कुणाच्या गुणवत्तेशी काही घेणंदेणं आहे का? मी काही नकारात्मक नाही. माझं एक मत आहे, तुम्ही सुरुवातीला छोटं यश मिळवलं, त्यानंतर मोठं यशही, पण त्यानंतर तुम्हाला पुन्हा छोटं यश मिळवायचंय, हे नेमकं काय चाललंय, व्हॉट्स राँग विथ यू. सारंच अनाकलनीय. यामध्ये प्रोग्रेस (विकास) कुठे झाला? तुम्हाला विकास करायचाय की आपली पॉवर दाखवायची आहे. या पॉवरच्या जिवावर तुम्हाला काय मिळवायचंय? विचाराचं महत्त्व कुठे असणार इथे? आपली स्वप्नं आपण मारायची का शांतपणे बसून हे सारं पाहात बसायचं. हे सारं भीतीपोटी आहे. आपण म्हणतो वेळ चाललीए. हातावर घडय़ाळ असलं तरी नजरेत सारं मेलेलं आहे. मला वाटतं की, ते कुठेतरी थांबलेलं आहे. जेव्हा एखाद्याला वेडाचे झटके येतात तेव्हा तुमच्यावर शॉक ट्रीटमेंट केली जाते. किंवा माणसाचे हृदयाचे ठोके कमी पडतात तेव्हा. आम्ही वेडे आहोत की मरणासन्न, आम्हाला ही शॉक ट्रीटमेंट का देताय. त्यामुळेच मला वाटतं की, शांती तो बहोतही जादा दूर की बात हैें.

‘स्पॉट ऑन’मध्ये मला एक वेगळा फॉर्म मिळाला आणि मनातलं नाटक मी करू शकलो. एका परिस्थितीत निर्माण झालेलं. ही परिस्थिती सांगता सांगता प्रत्येक पात्राचं एक स्वतंत्र म्हणणं आहे. आम्ही या नाटकाचे दोन प्रयोग केले, एक मराठीत आणि एक हिंदीत. मुळात मुद्दा नाटक करायचं नाही तर नाटक खरं आहे, हे सांगायचं आहे. हे नाटक लिहिलं आणि केलं तेव्हा बरीचशी माझ्यामधली आंदोलनं समोर आल्यासारखी वाटली. आपण जिथे आहोत त्याला मी रिअ‍ॅक्ट करतो. मी गेल्या वर्षी ‘लोकसत्ता लोकांकिके ’च्या कार्यक्रमामध्ये सादरीकरण करायचं बोलून गेलो, त्यानंतर ‘लोकसत्ता’ वाचायला लागलो आणि डोक्यात चक्रं फिरायला लागली. ते विचार नाटकाच्या रूपात मी मांडले. मी ‘लोकसत्ता’ची आणि त्यांच्या वाचकांची माफी यासाठीच मागेन की मी काही कारणास्तव तुमच्यापुढे सादरीकरणात सहभागी होऊ शकलो नाही. पण यापुढे तुमच्यासाठी काही तरी करण्याचा नेहमीच माझा प्रयत्न असेल.