महाराष्ट्रभरातील तरुणाईच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा दोन वर्षांच्या खडतर करोना काळानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. कॉलेजमध्ये तालमीची लगबग तासन् तास सुरू आहे. विविध केंद्रांवर प्राथमिक फेरीला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय आणि आता दिवसेंदिवस चुरसही वाढत चालली आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांना मनोरंजनसृष्टीत विविध स्वरूपात काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांची एक विशेष ओळख निर्माण झाली. अशा तरुण कलावंतांचा ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचा प्रवास कसा होता, नेमकं यातून काय शिकता आलं, स्पर्धेदरम्यान घडलेले किस्से आणि काही आठवणी जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

‘सातत्य राखणे महत्त्वाचे’
२०१३-१४ साली मी नाशिकच्या के. के. वाघ कॉलेजमधून पहिल्यांदाच ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत भाग घेतला होता. आम्ही ‘हे राम’ ही एकांकिका सादर केली आणि मी त्यात गावकऱ्यांमधील एक गावकरी होतो. ‘आयरिस प्रॉडक्शन’ त्या वेळी टॅलेंट पार्टनर होते आणि सर्व एकांकिका पाहून त्यांनी मालिकेसाठी काही कलाकारांची निवड केली होती, त्यात मीसुद्धा होतो. ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेच्या माध्यमातून मला पहिल्यांदा छोटय़ा पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. ‘रविवार लोकसत्ता’च्या पहिल्याच पानावर ‘टेलिव्हिजनवर गेलेला नाशिकचा चेतन’ अशा आशयासह माझी बातमी फोटोसह आली होती. आता या गोष्टीला पाच-सहा वर्षे उलटली तरीसुद्धा आजही मला त्याचं महत्त्व कळतंय. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या माध्यमातून तरुणाईच्या कलागुणांना वाव मिळतो आहे आणि आजही त्यांना मनोरंजनसृष्टीत काम करण्याची संधी मिळते आहे. तुम्हाला आयुष्यात पहिली संधी देणारं व्यासपीठ खूप महत्त्वाचं असतं, त्याचप्रमाणे ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. मला आजतागायत कधीही एकांकिका स्पर्धेमध्ये वैयक्तिक पारितोषिक मिळालेलं नाही आहे, ज्या लोकांना एकांकिका स्पर्धेत बक्षीस मिळत नाही, त्यांचा दिवस खूप नकारात्मक विचारांनी जातो. पण निश्चितच ती स्पर्धा खूप काही शिकवून जाते. जर तुम्ही सातत्य राखलं तर ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला बक्षीस मिळालेलं नाही आहे, तिथे भविष्यात तुम्ही मान्यवर- परीक्षक म्हणून बक्षीस द्यायला जाऊ शकता. कोणत्याही स्पर्धेकडे आपण हरण्या-जिंकण्याच्या पलीकडे पाहिलं पाहिजे. – चेतन वडनेरे, अभिनेता

Aditi Tatkare OnLadki Bahin Yojana January Installment Date in Marathi
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
Jitendra Awhad gave friendly advice to Minister pratap sarnaik
जितेंद्र आव्हाड यांनी दिला मंत्री सरनाईकांना मित्रत्वाचा सल्ला
chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…
Chandrasekhar Bawankule , Chandrasekhar Bawankule bjp state president,
प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे तूर्तास कायम? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत संघटनात्मक घडी राखण्याचे प्रयत्न
some bad decisions happened on eknath shinde tenure as chief minister says forest minister ganesh naik
एकनाथ शिंदे यांच्या कालखंडात काही चुकीच्या गोष्टी घडल्या; वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान

‘वेळेचं नियोजन शिकलो’
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी त्या वेळी आयरिस प्रॉडक्शन टॅलेंट पार्टनर होतं आणि माझं काम पाहून त्यांनी ‘जागो मोहन प्यारे’ या मालिकेसाठी माझी निवड केली. या मालिकेत कलाकार म्हणून काम करत असताना, मी हळूहळू दिग्दर्शकांची टीम आणि मग प्रॉडक्शन टीमकडे वळलो. सध्या मी ‘अबोली’ मालिकेचा कार्यकारी निर्माता म्हणून काम करतो आहे. दरवर्षी माझं ज्ञानसाधना कॉलेज लोकांकिका स्पर्धेत सहभागी होतं आणि जिंकतं. ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा खूप महत्त्वाची असून या स्पर्धेचं जिल्ह्यानुसार व्यवस्थापन हे उत्तम असतं. या स्पर्धेत सर्व गोष्टी वेळेनुसार होत असल्यामुळे एखादी गोष्ट वेळेत कशी करायची हे शिकता आलं. त्या वेळेच्या नियोजनाचा फायदा मला आता व्यावसायिक क्षेत्रात काम करताना होतो आहे. एकदा लोकांकिका स्पर्धेचा प्रयोग हा गडकरी रंगायतन येथे सुरू होता आणि मी बॅकस्टेजला काम करत होतो. आम्हाला बॅकस्टेजला राहून धूर-धूप दाखवायचा होता. बॅकस्टेजला आम्हाला काही प्रॉपर्टीज मिळत नव्हत्या आणि मग आम्ही त्या शोधून आणल्या. धूप करत असताना मडक्याला आग लागली होती आणि मडक्याला लागलेल्या आगीमुळे माझा हात भाजला होता. आयुष्यात कोणतंही काम हे काळजीपूर्वक केलं पाहिजे, ही गोष्ट मला या घटनेतून शिकता आली. हा किस्सा माझ्या कायम लक्षात राहील. – चेतन पाटील, अभिनेता – कार्यकारी निर्माता.

‘अखेर प्रयोग सादर केला..’
‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेने आजवर मला भरभरून दिलं आहे. या स्पर्धेत मी पहिल्यांदा २०१६ साली ज्ञानसाधना कॉलेजमधून ‘रात्रीस खेळ चाले’ ही एकांकिका केली होती. ही स्पर्धा करण्याचं माझं हे चौथं वर्ष असून एकंदरीत अनुभव हा छानच होता. या वर्षीसुद्धा मी लोकांकिकेसाठी ज्ञानसाधना कॉलेजच्या एकांकिकेचं लेखन व दिग्दर्शन केलं आहे. मी सध्या ‘माझी माणसं’ ही मालिका करत असून, या स्पर्धेच्या माध्यमातून मला यापूर्वी ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘मोलकरीण बाई’ या मालिकांमध्ये सुद्धा काम करण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेचा माझ्यासारख्या असंख्य तरुण रंगकर्मीना फायदा झाला आहे. यामुळे अनेक उत्तम लेखक, दिग्दर्शक, कलाकार उदयास येत आहेत आणि त्यांना व्यावसायिक क्षेत्रातसुद्धा संधी मिळते आहे. ‘भोकरवाडीचा शड्डू’ या एकांकिकेच्या वेळी आम्ही एकदा तीन एकांकिका करत होतो आणि त्याचा दौरा हा कोकणात होता. कोकणातील एकांकिकेचे दोन प्रयोग संपवून आम्ही रात्री न झोपता चक्री घेतली, जागीच सराव केला आणि दुसऱ्या दिवशी लोकांकिका स्पर्धेत अखेर प्रयोगसुद्धा सादर केला. ही आठवण आमच्यासाठी कधीही न विसरणारी आहे. –अजय पाटील, लेखक- दिग्दर्शक.

‘लोकांकिकेने जाणीव करून दिली..’
माझी पहिली मुख्य भूमिका असलेल्या ‘भोग’ या एकांकिकेचं सादरीकरण मी रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर कॉलेजमधून ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेतचं केलं होतं. जेव्हा कोकण विभागात ही स्पर्धा झाली होती, तेव्हा अशोक समेळ हे परीक्षक होते आणि आम्ही त्या विभागातून पहिले आलो होतो. यानंतर मी पहिल्यांदाच मुंबईत मोठय़ा व्यासपीठावर सर्वासमोर सादरीकरण करणार होते. तोपर्यंत मी गावागावात व विद्यापीठ स्तरांवर सादरीकरण करत होते. मुंबईतील स्पर्धा झाल्यानंतर लगेचच माझं नाव व नंबर घेण्यासाठी मला बोलावले होते आणि नंतर मला त्यांचा कॉल पण आला. मी अभिनय क्षेत्र निवडण्याचा गांभीर्याने विचार करू शकते, याची मला लोकांकिकेच्या स्पर्धेदरम्यान जाणीव झाली. पण मी त्या मालिकेची ऑफर स्वीकारली नाही, कारण मला कमी अनुभव घेऊन कॅमेरासमोर जायचं नव्हतं आणि टीव्हीच्या माध्यमातून माझं कमी अनुभवाचं बालिश काम लोकांसमोर आणायचं नव्हतं. याचसोबत तेव्हा माझं शिक्षणही पूर्ण करायचं होतं. अजून थोडं शिकेन आणि वेगवेगळय़ा भूमिका रंगभूमीवर करत राहीन, मगच मला कळेल की मी काय करू शकते आणि काय नाही. माझं पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी मुंबईत आले आणि मी पदव्युत्तर शिक्षणासाठी माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. चांगलं नाटक करायचं असेल तर चांगलं थिएटर लागतं, म्हणून मी रुईया नाटय़वलयचा भाग झाले. यानंतर मी अभिनय करणे हे सुरूच ठेवले. एक आवड म्हणून मी अभिनय करायचे पण करिअर म्हणूनही आपण अभिनय क्षेत्राचा विचार करू शकतो, याची जाणीव मला ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या माध्यमातून झाली. – विदिशा म्हसकर, अभिनेत्री.

‘खंबीरपणे उभं राहण्याची ताकद मिळाली’
मी ‘लोकांकिके’च्या पहिल्याच वर्षी २०१४ला ‘अर्ध भिजलेली दोन माणसं’ ही एकांकिका बिर्ला कॉलेजकडून केली होती. मी स्वत: एका कथेचं नाटय़रूपांतर आणि लेखन-दिग्दर्शन केलं होतं. प्रमुख भूमिकेतसुद्धा होतो. आमची ही एकांकिका विभागीय अंतिम फेरीतही पोहोचली होती. १३ डिसेंबरला अंतिम फेरीचा प्रयोग होता आणि दोन दिवस आधी ११ डिसेंबरला माझ्या बाबांचं निधन झालं. पण कॉलेजच्या सहकार्याने, कुटुंबाच्या साथीने आणि ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या संपूर्ण टीमच्या खंबीर पाठिंब्याने आम्ही तो प्रयोग केला. महाराष्ट्र महाअंतिम फेरीला आम्ही पोहोचू शकलो नाही, पण तो प्रयोग मात्र छान झाला होता, याचं समाधान होतं. ही एक लोकांकिकेवेळची आठवण मी कधीही विसरू शकणार नाही. माझं पहिलं दिग्दर्शन हे लोकांकिकेतच झालं आणि येथूनच माझा लेखक, अभिनेता म्हणून प्रवास हळूहळू सुरू झाला. ‘जय मल्हार’ मालिकेत मी कार्तिकेयची भूमिका साकारली आणि सध्या मी ‘कन्यादान’ मालिकेत संकेत नावाची भूमिका करतोय. आमच्या बिर्ला कॉलेजची एकांकिका पहिले ललित प्रभाकर बसवायचा, मग त्याच्यानंतर लोकांकिकेने आम्हाला पहिल्यांदा लेखक – दिग्दर्शक म्हणून व्यासपीठ दिलं, आमची एकांकिका विभागीय अंतिम फेरीला गेल्यामुळे एक आत्मविश्वास आला. हळूहळू मनोरंजन क्षेत्रात खंबीरपणे उभं राहण्याची ताकद मिळाली. – स्वप्निल आजगावकर, अभिनेता-लेखक-दिग्दर्शक.

‘आणि.. छोटय़ा पडद्याशी संपर्क आला’
२०१९ साली मी ‘मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स’मधून ‘भाग धन्नो भाग’ या एकांकिकेच्या माध्यमातून ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या व्यासपीठावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. माटुंग्याच्या यशवंत नाटय़ मंदिरात हा प्रयोग होता आणि खूप मजा आली होती. लोकांकिका या स्पर्धेचं यापूर्वी खूप नाव ऐकलं होतं, पण प्रत्यक्षपणे तिथे सादरीकरण करण्याचा अनुभव हा माझ्यासाठी भन्नाट होता. याच ठिकाणी मला ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेच्या निर्मात्या सुवर्णा राणे भेटल्या होत्या. त्यांनी तिथे मला पाहिलं, माझ्याशी बोलल्या आणि माझा नंबरसुद्धा घेतला. त्यानंतर मला ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेसाठी २०२० साली फोन आला होता. अनेक माणसांशी माझा इथे संपर्क झाला. लोकांकिकेच्या वेळी परीक्षकांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं ठरतं. ‘भाग धन्नो भाग’मध्ये माझी भूमिका ही अवघ्या अडीच मिनिटांची होती आणि एवढय़ाशा भूमिकेतसुद्धा आपली निवड होते, यावरून कळतं की निवड करणाऱ्यांची नजर किती प्रभावी असावी. लोकांकिकेच्या माध्यमातूनच माझा संपर्क हा छोटय़ा पडद्याशी आला आणि यामुळे ही स्पर्धा माझ्यासाठी खूप खास आहे. सध्या मी आणि माझी मैत्रीण मानसी मिळून Breaking Down या यूटय़ूब वाहिनीवर Breaking Down with Arnav & Manasi हे पॉडकास्ट करीत आहोत. – अर्णव राजे, अभिनेता.

प्रायोजक
लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा सहप्रायोजक ‘झी युवा’ आणि ‘टुगेदिरग’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘केसरी टूर्स’ आणि ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’तर्फे आहे. साहाय्य ‘अस्तित्व’चे आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट, मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.

Story img Loader