‘मला माझ्या आईसारखं गृहिणी म्हणून घर सांभाळायचं आहे’, असं म्हणणारा आणि त्या दृष्टीनेच वाटचाल करणारा नायक आणि त्याचं तसं असणं हसत हसत स्वीकारणारी नायिका हे आत्तापर्यंतच्या बॉलीवूडच्या चाकोरीत नसलेलं जोडपं ‘की अँड का’ चित्रपटाच्या निमित्ताने समोर आलं आहे हे खास.. चित्रपटाची सुरुवात इथून होते ती ‘स्त्रीलिंग पुल्लिंग सेमथिंग’ या विचारापर्यंत जाण्याचा म्हणजे ‘की’ आणि ‘का’ असं वेगवेगळं काही नसतंच हे सिद्ध करण्यापर्यंत या चित्रपटाचा प्रवास होतो. मात्र या प्रवासात ‘की अँड का’बरोबर जाताना हा नवा विचार मनाला भिडण्याइतपत पोहोचवण्यात दिग्दर्शक आर. बाल्की कमी पडले आहेत. त्यामुळे नव्या विचारांच्या या की आणि काची ही गोष्ट काहीशी अर्धवटच वाटते.
‘की अँड का’ हा चित्रपट प्रामुख्याने किया (करीना कपूर) आणि अर्जुन कपूर (कबीर) या दोन व्यक्तिरेखांमध्येच घडतो. त्यात थोडी जोड कियाच्या आईची (स्वरूप संपत) यांची आहे. तर तोंडी लावण्यापुरते कबीरचे वडील (रजित कपूर) यांचे अस्तित्व आहे. किया जाहिरात कंपनीत चांगल्या पदावर आहे. लहान वयात जबाबदारी पडल्याने तिने सगळे लक्ष करिअरवर केंद्रित केलं आहे. त्यामुळे सीईओ पदापर्यंत पोहोचण्याच्या या शर्यतीत तिला लग्न-मुलं या संकल्पनाच डोळ्यासमोर नको आहेत. त्याच्या विरुद्ध गडगंज श्रीमंत असलेल्या बापाचा एकुलता एक मुलगा आणि एमबीए टॉपर असूनही सतत पुढे जाण्याची स्पर्धा नको. त्यापेक्षा एक घर, त्यातली नाती जपण्याचा प्रयत्न करू, या विचारांचा कबीर एकमेकांना अपघाताने भेटतात. सध्याचे युग फास्ट असल्याने की यासाठी कबीरचा विचार फारच क्रांतिकारक असला तरी तिला पटवण्याएवढा पुरेसा शहाणपणा कबीरकडे आहे. त्यामुळे हे इतरांच्या दृष्टीने जगावेगळं दाम्पत्य विवाहबद्ध होतं. आणि हातात मंगळसूत्र बांधून ‘का’ आपल्या घरात रमतो, तर ‘की’ आपल्या जाहिरातविश्वात पुढे पुढे धावत राहते. या दोघांमध्ये नेमकं काय होतं, त्यांनी घेतलेल्या भूमिका नव्या नाहीत, पण या प्रक्रियेतून पुढे जाताना त्या दोघांची आणि पर्यायाने त्यांना स्वीकारणाऱ्या आजच्या समाजाची भावना या चित्रपटात अधोरेखित होते. मात्र इथेच दिग्दर्शकाचा थोडा गोंधळ उडालेला दिसतो.
बाईच्या पैशावर जगणारा माणूस किंवा नवऱ्याने घरी काम करणे, बायकोने कमावणे ही संकल्पना आजच्या काळात अंगावर येण्याएवढी भयानक उरलेली नाही, हे वास्तव खुद्द दिग्दर्शकानेच कबूल केलेलं आहे. कुठलाही विचार, तत्त्व धरून पुढे जाताना त्या तत्त्वाला तडे जातील असे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. आणि मग अशा प्रसंगांना सामोरे जाताना आपल्याच तत्त्वांना मूठमाती द्यायची की त्याला ठाम धरून जे होईल त्याला तोंड द्यायचं, असं द्वंद्व आपल्या मनात उमटत राहतं. ‘की अँड का’ चित्रपटात हे मानसिक द्वंद्व दोघांच्याही वैयक्तिक पातळीवर ठळकपणे येईल, अशी आपली अपेक्षा असते. मात्र प्रत्यक्षात स्त्री-पुरुष वेगळे उरलेले नाहीत, हे समजावण्यातच नायकाचा अर्धा वेळ खर्ची पडतो. त्यामानाने ‘की’चा राग, मत्सराने प्रेमावर केलेली मात आपल्याला परिचयाची वाटते. त्यामुळे काही एका ठोकताळ्यांतून त्यांची कथा पुढे जाते. या दोघांमध्ये फार भावनिक नाटय़ रंगणार नाही, याची पुरेपूर काळजी दिग्दर्शक आर. बाल्की यांनी घेतली आहे. किंबहुना, ही पिढी असे ताण फार काळ धरून ठेवत नाही. ती एक तर सोडून देते किंवा स्वीकारून पुढे जाते या सहजभावनेने कथा उतरवली असल्याने चित्रपटाची मांडणीही तितकीच साधेपणाने झाली आहे. करीना आणि अर्जुन कपूर या दोघांनाही एका वेगळ्या भूमिकेत पाहणं हा सुखद अनुभव आहे. अमिताभ आणि जया बच्चन यांचा छोटासा वावरही सुखद असला तरी त्याचा ठोस उपयोग चित्रपटासाठी करून घेतलेला नाही. संगीताच्या बाबतीतही बाल्कीचा हा चित्रपट आपली निराशा करतो. त्यातल्या त्यात ‘जी हुजूरी’ हे गाणे वेगळे ठरले आहे. बाल्कीच्या सगळ्याच चित्रपटांप्रमाणे पैसा वसूल मनोरंजन मिळवण्याची अपेक्षा सुज्ञांनी ‘की अँड का’कडून क रू नये.
की अँड का
दिग्दर्शक – आर. बाल्की
कथा – आर. बाल्की
कलाकार – करीना कपूर, अर्जुन कपूर, स्वरूप संपत, रजित कपूर
सिनेमॅटोग्राफी – पी. सी. श्रीराम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा