दिग्दर्शक म्हणून निशिकांत कामत म्हटल्यावर अभिनेता म्हणून जॉन अब्राहम, चित्रीकरणासाठी गोवा आणि त्या अनुषंगाने येणारे मराठी कलाकारांचे ओळखीचे चेहरे या सगळ्या गोष्टी ‘रॉकी हँडसम’ चित्रपटात येतात. कोरियन चित्रपटाच्या धर्तीवरचा हा देमारपट केवळ हाणामारीतच उजवा ठरतो.

गोव्यातील गर्दमाफियांचे जाळे, त्यात रशियन माफियांचा असलेला जोर, ड्रग्ज पोहोचवण्यासाठी लहान मुलांचा होणारा वापर, त्याच मुलांची किडनी, डोळे आदी शरीरातील भाग काढून त्याची विक्री करणारी टोळी असं माफियांचं एक विश्व निशिकांत कामतने उभं केलं आहे. मात्र अ‍ॅक्शनपटासाठी योग्य अशा या प्लॉटमध्ये केवळ हाणामारीच असू शकते आणि ती हाणामारी कशी योग्य आहे हे पटवण्यासाठी थोडीशी भावनांची हलकी फोडणी असा काहीसा उथळ फॉम्र्युला दिग्दर्शकाने वापरला आहे.

गोव्यात चेहऱ्यावरची माशीही न हलता वावरणारा एक तरुण ज्याला त्याच्या शेजारची लहान मुलगी ‘हँडसम’ (जॉन अब्राहम) या नावाने हाक मारते. तर या हँडसमला तितकाच दु:खी भूतकाळ आहे. त्यामुळे तो केवळ सुतकी चेहऱ्याने वावरतो. त्याचा हा भूतकाळ काय, हे चित्रपटाच्या शेवटच्या अध्र्या तासात कळते. मात्र त्याचा भूतकाळ चांगला नाही एवढं कारण त्याला गुंडांना पिटण्यासाठी पुरेसं आहे असं गृहीत धरून पुढची कथा घडत राहते. गोव्यातील या ड्रगमाफियांची टोळी नष्ट करण्यासाठी गोवा पोलीस धडपडत आहेत. त्यांच्या हातात या टोळीची माहिती आहे. पोलिसांची अख्खी टीम (शरद केळकर, संजय खापरे, अभिजीत चव्हाण ही मंडळी यात आहेत) आपल्या कामाला सुरुवात करते. मात्र, हँडसमच्या शेजारी राहणारी ती चिमुरडी आणि तिची बार डान्सर आई यांच्यामुळे आपल्या हिरोला टोळीचा पाठलाग करणे भाग पडते. मग माफियांच्या मागे हँडसम आणि त्याच्या मागे गोवा पोलीस असा पाठशिवणीचा खेळ शेवटपर्यंत सुरू राहतो.

चित्रपटात खलनायकही डझनावारी आहेत. मट्ट (उदय टिकेकर)पासून खुद्द निशिकांत कामतने यात एका गुंडाची भूमिका केली आहे. इथे एक थाई मार्शल आर्ट्स फेम बॉडीगार्ड आहे. या बॉडीगार्डबरोबर हँडसमची फायटिंग कित्येक वेळा पाहायला मिळते. अगदी चित्रपटाच्या शेवटीही कारण नसताना काही मिनिटे चाकूंनी चाललेली त्यांची फाईट प्रेक्षकांना पाहावी लागते. जणू काही चांगली अ‍ॅक्शनदृश्ये अशी असू शकतात आणि आमचा नायक तो किती छान पद्धतीने करतो आहे हे दाखवण्यासाठी या चित्रपटाचा घाट घातला असावा, अशी आपली ठाम धारणा होत जाते. हातापायांपासून बंदूक- सुरी- चाकूंपर्यंत विविध गोष्टींचा वापर करून फाईट कशी करावी, याची तोंडओळखच प्रेक्षकांना हा चित्रपट करून देतो.

मध्यंतरापर्यंत ‘हँडसम’चं आणखीन एक व्यक्तिमत्त्व ‘रॉकी’ आपल्यासमोर येते. ‘रॉकी हँडसम’ची व्यवस्थित फोड दिग्दर्शकाने करून दिली असली तरी सरतेशेवटी हा चित्रपट म्हणजे ‘रॉकी’ आणि ‘सम’ गुंडांचा िहसक कल्लोळच उरतो. आता असा कल्लोळ किती ‘हँडसम’ आहे हे आपले आपण ठरवायचे.

रॉकी हँडसम

दिग्दर्शक – निशिकांत कामत

कलाकार – जॉन अब्राहम, श्रुती हसन, शरद केळकर, उदय टिकेकर, अभिजीत चव्हाण, संजय खापरे.

Story img Loader