रवींद्र पाथरे
संगणक आणि मोबाइल क्रांतीने माणसाचं पत्रलेखन आज जवळजवळ थांबल्यातच जमा आहे. पूर्वी ख्यालीखुशाली, महत्त्वाच्या बातम्यांची देवाणघेवाण, भावनिक अभिव्यक्ती किंवा व्यावहारिक बाबींसाठीही दूरस्थ व्यक्तींशी संपर्क साधायचं महत्त्वाचं साधन होतं पत्र! पत्रलेखनातील गोडी, हुरहूर, प्रतीक्षा, विरहवेदना, उत्सुकता यांचा तो काळ आज बहुतेक भावस्मृतींतच जमा झाला आहे. आजच्या पिढीला त्यातील थ्रिलच माहीत नाही. मग त्यासाठीचं हुरहुरणं, पत्राची आतुरतेनं वाट बघणं वगैरे कळणं तर सोडाच. अशा या काळात दिलीप प्रभावळकर लिखित ‘पत्रापत्री’ हा दोन मित्रांतील पत्रात्मक संवाद रंगमंचावर येणं हेच विशेष आहे. हा आविष्कार नव्या पिढीला कसा वाटेल/ वाटतो याबद्दलची एक उत्सुकता मनात दाटून आहे. यापूर्वी मराठी साहित्यातून पत्रात्मक संवाद बऱ्याचदा व्यक्त झालेला आहे. शबाना आझमी आणि फारुख शेख यांचा ‘तुम्हारी अमृता’ हा प्रेमपत्रांचा रंगाविष्कारही यापूर्वी मंचित झालेला आहे. त्याचीच मराठी आवृत्ती ‘प्रेमपत्र’ या नावानं वामन केंद्रे यांनी नंतर रंगमंचावर आणली होती. त्यालाही आता बराच काळ लोटलाय. आणि आता प्रदीर्घ खंडानंतर दिलीप प्रभावळकर यांची ‘पत्रापत्री’ रंगमंचावर अवतरलीय. त्यांचीच डायरी फॉर्ममधील ‘अनुदिनी’ काही वर्षांमागे ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या नावाने मालिकास्वरूपात दूरचित्रवाणीवरून प्रक्षेपित झाली होती. तिला दर्शकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आणि आज पत्रात्मक संवाद कालौघात मागे पडलेला असताना हा रंगाविष्कार मंचावर येणं हे निश्चितच उत्सुकता वाढवणारं आहे. दिलीप प्रभावळकरांची एखाद्याा घटनेतील विसंगती, विरोधाभास आणि व्यंग टिपण्याची तीक्ष्ण नजर, त्यास नर्मविनोदी, खुसखुशीत पद्धतीनं शब्दांकित करण्याची त्यांची विस्मयित करणारी ताकद वाचकांच्या, प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारी आहे. अनुभववैचित्र्याची त्यांची ही आवड ‘हसवाफसवी’मध्येही दिसून आलेली आहेच. शिवाय ते प्रचंड क्षमतेचे चतुरस्रा अभिनेतेही आहेतच. त्यांच्या नैसर्गिक देहयष्टीला न साजेशा भूमिकाही त्यांनी आजवर चिरस्मरणीय केलेल्या आहेत.
‘पत्रापत्री’ या पुस्तकात त्यांनी आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे तिरकसपणे पाहून त्याबद्दलची आपली निरीक्षणं अत्यंत खुसखुशीत शैलीत मांडली आहेत. वाचकाला सहजी कवेत घेण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्याचमुळे बहुधा त्यांच्या ‘पत्रापत्री’ या पुस्तकाचं रंगमंचीय रूप साकारण्याचं दिग्दर्शक विजय केंकरे यांनी मनावर घेतलं असावं. आणि म्हणूनच नीरज शिरवईकर या सिद्धहस्त लेखकाला हाताशी धरून त्यांनी ‘पत्रापत्री’ची रंगसंहिता सिद्ध केली. ‘पत्रापत्री’मधले निवडक लेख त्यांनी यासाठी निवडले आहेत. माधवराव आणि तात्या या दोन जीवश्चकंठश्च मित्रांमधला हा पत्रव्यवहार आहे. तात्यांची पहिलीच पॅरिस ट्रिप.. या विमानप्रवासातच त्यांना माधवरावांना पत्र लिहावंसं वाटतं.. आणि हा हवेतला पत्रव्यवहार सुरू होतो. आपल्या मायभूमीपासून दूर गेल्यावर साहजिकच तिच्याबद्दलची माणसाची ओढ वाढते. तिथे घडणाऱ्या घटना-प्रसंगांचं वेगळंच महत्त्व वाटू लागतं. माधवराव तात्यांना मुंबईत गणेशमूर्ती दूध प्यायल्याचं वर्तमान पत्रातून कळवतात. या वेडाची लागण इतक्या झपाटय़ाने सर्वत्र होते की तात्यांना ही बातमी कळवणं माधवरावांना आपलं विहित कर्तव्यच वाटतं. त्याचबरोबर माहीमच्या समुद्रातील पाणी गोड झाल्याचीही वार्ता आणि त्याने इथे माजलेला भाविक हलकल्लोळही ते तात्यांना कळवतात. तात्या मूळातलेच आस्तिक. ते अशी एक गणेशमूर्ती आणि माहीमच्या समुद्राचं गोडं पाणी तीर्थ म्हणून तिकडे पाठवायला त्यांना सांगतात. त्यानंतर जे काही रामायण घडतं ते प्रत्यक्ष पाहणंच.. म्हणजे ‘पत्रापत्री’त- योग्य.
अशीच एकदा माधवरावांच्या घरातील किचनमधील झाडून सर्व सामान चोरीला गेल्याची वार्ता माधवराव त्यांना कळवतात. या घटनेचे विविध पदर, त्यातून उठलेले वादळ, त्याचा चिपळूण साहित्य संमेलनाशी असलेला बादरायण संबंध वगैरेचा घेतलेला खुमासदार समाचार त्यांच्या पत्रापत्रीतून स्पष्ट होतो. तात्यांचे शंभरी ओलांडलेले वडील माधवरावांच्या ओळखीतल्या एका गृहस्थांच्या शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी त्या गृहस्थांच्या वडलांच्या अनुपस्थितीत हजर राहण्याचा प्रसंगही असाच.. त्यातून घडलेलं पुढचं महाभारत..
तात्यांना एका टीव्ही मालिकेत ब्रेक मिळाल्यानंतर त्यांना आलेले अनुभव, त्याबद्दलचे भन्नाट किस्से, त्या अनुषंगाने घडलेल्या घटना-घडामोडी मालिकाविश्वावर एक वेगळाच प्रकाशझोत टाकतात. त्याचा माधवरावांनाही अनाठायी फटका बसतो. त्यातून तात्या आणि माधवरावांमधील मैत्रीचे संबंध तुटतात की काय अशी परिस्थिती ओढवते.
अशी ही ‘पत्रापत्री’ रंगमंचावर साकारण्याचा घाट दिग्दर्शक विजय केंकरे यांनी घातला आणि नीरज शिरवईकरांकडून त्याची रंगावृत्ती लिहवून घेऊन त्यांनी ते प्रत्यक्ष सादरही केलं. पत्रांचं वाचन आणि अभिवाचन असा संमिश्र फॉर्म त्यांनी याकरता निवडलाय. दिलीप प्रभावळकर आणि ते स्वत: (विजय केंकरे) हा रंगाविष्कार सादर करतात. दिलीप प्रभावळकरांच्या ‘पत्रापत्री’मधील काही घटना आता जरी जुन्या झाल्या असल्या तरी त्यातला विनोद, त्यांतून टिपलेली विसंगती आजही ताजीतवानी वाटते. त्याकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा तिरकस, व्यंगात्मक दृष्टिकोन हशा पिकवतो. यातल्या बऱ्याच घटना कधीतरी आपल्या आजूबाजूलाही घडताना/ घडलेल्या दिसतात. त्यामुळे त्यांच्याशी जोडून घेणं प्रेक्षकांना अवघड जात नाही. पत्रात्मक संवाद हा तसा ‘फ्री फॉर्म’ असल्याने प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा अंदाज घेऊन यातल्या घटना-प्रसंग कधी बदललेही जाऊ शकतात. अर्थात प्रेक्षकपसंतीचा लसावि काढूनच रंगाविष्कारासाठी बहुतेक पत्रांची निवड केलेली असल्याने त्यांना दाद ही मिळतेच. नीरज शिरवईकर यांनी ‘पत्रापत्री’ची प्रकृती लक्षात घेऊन व्यंगचित्रात्मक वा अर्कचित्रात्मक शैलीतील नेपथ्ययोजना केली आहे. रंगावृत्तीतही हाच बाज केन्द्रस्थानी राहील याची खबरदारी त्यांनी घेतली आहे. शीतल तळपदे यांनी ‘पत्रापत्री’त प्रसंगानुरूप मूडनिर्मिती करणारी प्रकाशयोजना केली आहे. तर अजित परब यांनी प्रसंगानुसारी भावानुकूल संगीत दिलं आहे. मंगल केंकरे (वेशभूषा) आणि राजेश परब (रंगभूषा) यांनी या ‘प्रयोगा’ला अंगडंटोपडं बहाल केलं आहे.
दिग्दर्शक विजय केंकरे यांनी पत्रात्मक संवादाची ही रचना अभिवाचन आणि वाचन यांच्या संमिश्रणातून साकारली आहे. दोन खुच्र्यावर दोघं बसून काही पत्रांचं वाचन करतात, तर कधी कधी ते मोजक्या हालचालींतून या संवादास अभिनयाचं अस्तरही प्रदान करतात. परस्परांशी क्रिया-प्रतिक्रिया-प्रतिक्षिप्त क्रिया यांची देवघेवही अधूनमधून त्यांच्यात होते. त्यातून या पत्र‘संवादा’तील बोलकेपण दृगोचर होतं. पत्रवाचनाचा हा एकतर्फी अनुभव यामुळे सार्वत्रिक होतो. माधवराव आणि तात्या समोरासमोर एकमेकांना दाद देत हा संवाद साधताहेत, हा ‘फील’ त्यामुळे येतो. या प्रवासात पत्रांच्या शेवटाचा मायना प्रसंगपरत्वे बदलत जातो.. त्यामुळे त्याची परिणामकारकताही वेगवेगळी ठसते. प्रसंग-रेखाटनातील प्रभावळकरांची ताकद, त्यातला नर्मविनोद, खटय़ाळपणा, विसंगती, व्यंगात्मक टिप्पण्णी यामुळे या पत्रलेखनाला एक प्रकारचं चित्रदर्शित्व प्राप्त झालं आहे. पत्रलेखनातील सामथ्र्य यातून आजच्या पिढीला कळून येईल.
तात्यांच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकरांच्या चतुरस्रतेचा रोकडा प्रत्यय येतो. प्रसंगानुरूप त्यांचं खटय़ाळ, अवखळ, तसंच सरळमार्गी व्यक्तिमत्त्व यात आकारलं आहे. त्यांची बहुश्रुतता लेखणीतून तर जाणवतेच, पण अभिनयातूनही ती प्रतीत होते. आपलं सामान्यपण मान्य करूनही आपल्या बाबतीत घडणाऱ्या घटनांमध्ये त्यांनी आससून घेतलेला सहभाग, त्यांचा अदम्य उत्साह, काही बाबतींतला साहसी पुढाकार आणि त्यातून त्यांची होणारी त्या- त्या वेळची फरपट विलक्षणच. अशा प्रसंगांत घडणाऱ्या गमतीजमती, झालेली आपली फजिती ते खेळकर पद्धतीनं कथन करतात. विजय केंकरे यांचा माधवराव खमक्या, ठाम आणि मैत्रभावाची बूज राखणारा. तात्यांच्या आगाऊ स्वभावाचा लाभ घेत असताना त्यातून मधेच उपटणाऱ्या आपदांनी ते वैतागतातही. पण लवकरच त्यातलं वैय्यथ्र्यही त्यांना कळून येतं. समपातळीवरची मैत्री निभावताना एकमेकांना गृहीत धरणं, प्रसंगी चार खडे बोल सुनावणं वगैरेही आलंच. तेही जोरकसपणे त्यांनी केलंय. एकुणात, हा ‘बोलका’ पत्रसंवाद प्रेक्षकांना भुरळ घालेल यात काहीच शंका नाही.