संगणक आणि मोबाइल क्रांतीने माणसाचं पत्रलेखन आज जवळजवळ थांबल्यातच जमा आहे. पूर्वी ख्यालीखुशाली, महत्त्वाच्या बातम्यांची देवाणघेवाण, भावनिक अभिव्यक्ती किंवा व्यावहारिक बाबींसाठीही दूरस्थ व्यक्तींशी संपर्क साधायचं महत्त्वाचं साधन होतं पत्र! पत्रलेखनातील गोडी, हुरहूर, प्रतीक्षा, विरहवेदना, उत्सुकता यांचा तो काळ आज बहुतेक भावस्मृतींतच जमा झाला आहे. आजच्या पिढीला त्यातील थ्रिलच माहीत नाही. मग त्यासाठीचं हुरहुरणं, पत्राची आतुरतेनं वाट बघणं वगैरे कळणं तर सोडाच. अशा या काळात दिलीप प्रभावळकर लिखित ‘पत्रापत्री’ हा दोन मित्रांतील पत्रात्मक संवाद रंगमंचावर येणं हेच विशेष आहे. हा आविष्कार नव्या पिढीला कसा वाटेल/ वाटतो याबद्दलची एक उत्सुकता मनात दाटून आहे. यापूर्वी मराठी साहित्यातून पत्रात्मक संवाद बऱ्याचदा व्यक्त झालेला आहे. शबाना आझमी आणि फारुख शेख यांचा ‘तुम्हारी अमृता’ हा प्रेमपत्रांचा रंगाविष्कारही यापूर्वी मंचित झालेला आहे. त्याचीच मराठी आवृत्ती ‘प्रेमपत्र’ या नावानं वामन केंद्रे यांनी नंतर रंगमंचावर आणली होती. त्यालाही आता बराच काळ लोटलाय. आणि आता प्रदीर्घ खंडानंतर दिलीप प्रभावळकर यांची ‘पत्रापत्री’ रंगमंचावर अवतरलीय. त्यांचीच डायरी फॉर्ममधील ‘अनुदिनी’ काही वर्षांमागे ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या नावाने मालिकास्वरूपात दूरचित्रवाणीवरून प्रक्षेपित झाली होती. तिला दर्शकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आणि आज पत्रात्मक संवाद कालौघात मागे पडलेला असताना हा रंगाविष्कार मंचावर येणं हे निश्चितच उत्सुकता वाढवणारं आहे. दिलीप प्रभावळकरांची एखाद्या घटनेतील विसंगती, विरोधाभास आणि व्यंग टिपण्याची तीक्ष्ण नजर, त्यास नर्मविनोदी, खुसखुशीत पद्धतीनं शब्दांकित करण्याची त्यांची विस्मयित करणारी ताकद वाचकांच्या, प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारी आहे. अनुभववैचित्र्याची त्यांची ही आवड ‘हसवाफसवी’मध्येही दिसून आलेली आहेच. शिवाय ते प्रचंड क्षमतेचे चतुरस्रा अभिनेतेही आहेतच. त्यांच्या नैसर्गिक देहयष्टीला न साजेशा भूमिकाही त्यांनी आजवर चिरस्मरणीय केलेल्या आहेत. ‘पत्रापत्री’ या पुस्तकात त्यांनी आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे तिरकसपणे पाहून त्याबद्दलची आपली निरीक्षणं अत्यंत खुसखुशीत शैलीत मांडली आहेत. वाचकाला सहजी कवेत घेण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्याचमुळे बहुधा त्यांच्या ‘पत्रापत्री’ या पुस्तकाचं रंगमंचीय रूप साकारण्याचं दिग्दर्शक विजय केंकरे यांनी मनावर घेतलं असावं. आणि म्हणूनच नीरज शिरवईकर या सिद्धहस्त लेखकाला हाताशी धरून त्यांनी ‘पत्रापत्री’ची रंगसंहिता सिद्ध केली. ‘पत्रापत्री’मधले निवडक लेख त्यांनी यासाठी निवडले आहेत. माधवराव आणि तात्या या दोन जीवश्चकंठश्च मित्रांमधला हा पत्रव्यवहार आहे. तात्यांची पहिलीच पॅरिस ट्रिप… या विमानप्रवासातच त्यांना माधवरावांना पत्र लिहावंसं वाटतं… आणि हा हवेतला पत्रव्यवहार सुरू होतो. आपल्या मायभूमीपासून दूर गेल्यावर साहजिकच तिच्याबद्दलची माणसाची ओढ वाढते. तिथे घडणाऱ्या घटना-प्रसंगांचं वेगळंच महत्त्व वाटू लागतं. माधवराव तात्यांना मुंबईत गणेशमूर्ती दूध प्यायल्याचं वर्तमान पत्रातून कळवतात. या वेडाची लागण इतक्या झपाट्याने सर्वत्र होते की तात्यांना ही बातमी कळवणं माधवरावांना आपलं विहित कर्तव्यच वाटतं. त्याचबरोबर माहीमच्या समुद्रातील पाणी गोड झाल्याचीही वार्ता आणि त्याने इथे माजलेला भाविक हलकल्लोळही ते तात्यांना कळवतात. तात्या मूळातलेच आस्तिक. ते अशी एक गणेशमूर्ती आणि माहीमच्या समुद्राचं गोडं पाणी तीर्थ म्हणून तिकडे पाठवायला त्यांना सांगतात. त्यानंतर जे काही रामायण घडतं ते प्रत्यक्ष पाहणंच… म्हणजे ‘पत्रापत्री’त- योग्य.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा