रामायण आणि महाभारत ही महाकाव्यं शतकानुशतकं भारतीय संस्कृतीचं पोषण करीत आलेली आहेत. त्यांचं अन्वयन असंख्यांनी असंख्य प्रकारे आतापर्यंत केलेलं आहे… आणि ते यापुढेेही सुरूच राहील. यांतल्या व्यक्तिरेखा, त्यांची मूल्यं, त्यांचे परस्परसंबंध, त्यांचं जगणं यांचंही उत्खनन अनेकांनी नाना प्रकारे केलेलं आहे. आजच्या संदर्भात त्यांचं अर्थनिर्णयनही होत असतंच. असंच एक अर्थनिर्णयन रामायणातील ऊर्मिलाच्या बाबतीत करणारं नाटक ‘ऊर्मिलायन’ नुकतंच रंगमंचावर आलेलं आहे. लक्ष्मणाची पत्नी ऊर्मिला हिच्या मानसिकतेवर, तिच्या जीवनावर फारच थोडा प्रकाश मूळ रामायणात पडलेला दिसून येतो. कदाचित राम, सीता या प्रमुख पात्रांची जीवनकहाणी रेखाटताना त्याकडे दुर्लक्ष झालं असावं. तसं अनेक पात्रांच्या बाबतीत घडलेलं आहे. पण आज ऊर्मिलेच्या आयुष्याकडे बघताना आजच्या संदर्भात तिचं आयुष्य उत्खनित करण्यात आलं आहे. लक्ष्मणाने भावाबरोबर वनात जाण्याचा निर्णय घेतल्यावर त्याची पत्नी ऊर्मिला अयोध्येत कसं जगली असेल, हा प्रश्न संवेदनशील मनांना पडल्याशिवाय राहत नाही. तिला साधं विचारलं किंवा सांगितलंही गेलं नाही, की लक्ष्मण वनात जातोय… तुझं काय म्हणणं आहे? तू काय करशील? रामायणात दुर्लक्षिली गेलेली ही ऊर्मिला लेखक सुनील हरिश्चंद्र यांना सतावत होती आणि त्यातून आकारास आलं… ‘ऊर्मिलायन.’
सीतेची बहीण असलेली ऊर्मिला स्वतंत्र प्रज्ञेची युवती होती. शस्त्रशास्त्रात पारंगत. कलेची भोक्ती, चित्रकार. विचारशील. स्वयंप्रज्ञ. आपल्या आयुष्याचे निर्णय आपणच घ्यावेत, या मताची. म्हणूनच लक्ष्मण आवडला असला तरी त्याने स्वयंवरात पण जिंकून आपल्याला पत्नी करावं, ही तिची इच्छा. पण ती पूर्ण होत नाही. तेही ती नाइलाजानं पत्करते. पण पतीनं आपला सखा व्हावं आणि आपण त्याची सखी ही तिची इच्छा असते. त्याचबरोबर दोघांनाही स्वतंत्र अस्तित्व असावं असंही तिला मनोमन वाटत असतं. ती तसं लक्ष्मणाला सांगतेही. तोही कबूल होतो. पण कैकयीनं रामाला वनवासात धाडण्याची इच्छा प्रकट केल्यावर रामाची सावली असणारा लक्ष्मण त्याच्याबरोबर वनात जाण्यास निघतो. आणि तेही ऊर्मिलेचा साधा निरोपदेखील न घेता! इथेच ऊर्मिला कोसळून पडते. आपला जीवाचा सखा म्हणवणारा पती आपल्याला न विचारतासवरता वनात जाण्याचा निर्णय घेतो आणि काहीही न सांगता निघूनही जातो… यानं ती उन्मळून पडते. पतीवियोगाबरोबरच त्याच्या प्रतारणेचं, एक माणूस म्हणून झालेल्या आपल्या अपमानाचं दु:ख तिला अधिक विद्ध करतं. आपल्या अस्तित्वाला काहीच किंमत नाही, आपण पतीची फक्त दासी आहोत, त्याच्या लहरीनुसार आपलं भागधेय ठरणार… हा तिच्यासारख्या मानिनीचा अपमान आणि एक प्रकारे अवहेलनाच असते. त्या दु:खात होरपळून जात असतानाही ती कुटुंबाचा आधार बनते. पण ते उदासीन वृत्तीनं. भरत तिची अवस्था जाणतो. तो रामासह लक्ष्मणाला परत आणण्याचं ऊर्मिलेला वचन देऊन वनात जातो. पण दिलेल्या शब्दाला जागणारे श्रीराम परत यायला नकार देतात. भरतही राम अयोध्येस परतेपर्यंत पत्नीकडून पाणीग्रहणही न करण्याची प्रतिज्ञा करतो. त्याने ऊर्मिला आणखीनच प्रक्षुब्ध होते. पती असूनही परित्यक्तेचं आयुष्य भरताच्या पत्नीला जगावं लागणं हे ऊर्मिलेला मान्य नसतं. या घरातले पुरुष बंधुप्रेम, दिलेलं वचन याच्याशी प्रतिबद्ध आहेत. पण आपल्या पत्नींचा ते माणूस म्हणून जराही विचार करीत नाहीत, यानं ऊर्मिला शोकसंतप्त होते. जगण्यावरची तिची आस्थाच संपते. एका कलेवरासारखं जीवन ती लक्ष्मण परत येईतो जगते.
आणि तो परत आल्यावर त्याला ती खडसावून जाब विचारते. मला परित्यक्ता करताना तुम्हाला जराही काही वाटलं नाही? मी कठपुतळी बाहुली आहे का, जिला तुम्ही गृहीत धरलंत? माझ्या स्वतंत्र अस्तित्वाला काहीच अर्थ नाही का? मला भावना, मन, विचार नाहीत? त्याचा जराही विचार मला सोडून जाताना तुम्ही करू नये? तुमच्यासाठी तुमची कर्तव्यं महत्त्वाची. आपली अर्धांगिनी आपल्या पश्चात कशी जगेल, काय करील याचा यत्किंचितही विचार तुम्हाला शिवू नये? आता तुम्ही घरी परतल्यावर पतिधर्म पाळणारी स्त्री म्हणून माझा स्वीकार करणार! यात ‘मी’ कुठे आहे? माझ्या जगण्याला काही अर्थ आहे की नाही?… तिच्या या शोकसंतप्त प्रश्नांची उत्तरं लक्ष्मणापाशी नसतात. तो आपल्पा प्रेमाचे दाखले तिला देतो. पण ते तिच्यासाठी आता पुरेसे नसतात.
लेखक-दिग्दर्शक सुनील हरीश्चंद्र यांनी रामायणातील ऊर्मिलेच्या अंतरंगात शिरून तिची व्यथा-वेदना, दु:ख उत्कटतेनं जाणून घेतलं आहे आणि ते ‘ऊर्मिलायन’द्वारे मंचित केलं आहे. एक शैलीदार नाट्य त्यांनी या ठिकाणी प्रस्तुत केलं आहे. नेहमीच्या वास्तववादी नाटकाची चौकट मोडून त्यांनी नृत्य-नाट्य-संगीताच्या बाजात ते सादर केलं आहे. यातील नृत्यादी गोष्टी आशयाचाच अविभाज्य भाग बनून येतात… इतक्या त्या नाटकात एकजीव झाल्या आहेत. एका स्वाभिमानी स्त्रीची कथा आपण सादर करत आहोत याचं त्यांचं भान जराही कुठं सुटलेलं नाही. एका आदर्शवादी पुराणकथेचं हे अर्थनिर्णयन वेगळं आणि अंतर्मुख करणारं आहे. ऊर्मिलेची नाना रूपं यात बघायला मिळतात. प्रणयिनी, अभिसारिका, शल्यहारिणी, विरहिता… या सगळ्या स्थित्यंतरांत ती उत्कटपणे जाणवत राहते. ऊर्मिलेची ही गोष्ट असल्याने तीत लक्ष्मण, सीता, भरत अशी मोजकीच संबंधित पात्रं येतात. आणि तिच्या सख्या. ऊर्मिलेचे विविध भावविभ्रम, तिची वैचारिक, मानसिक आंदोलनं हाच नाटकाचा गाभा असल्याने लेखक-दिग्दर्शकानं प्रामुख्याने त्यावरच लक्ष केंद्रित केलं आहे. तिच्याभोवतीच नाटक फिरत राहतं. हे सारं मांडताना दृश्य, श्राव्य, काव्याची योजना त्यांनी चपखल केली आहे. मराठी रंगभूमीवर अभावानेच या गोष्टी आढळतात. उदयशंकर यांनी त्यांच्या ‘गांधी’ या बॅलेत हा अनुभव दिल्याचं आठवतंय. पण तो अर्थात बॅले होता. इथं नाटकात या सगळ्याचा एकमेळ साधला गेला आहे. त्यातून जी नजरबंदी होते तीतून बाहेर पडणं नाटक संपल्यावरही कठीण जातं. शैलीदार संवाद असले तरी ते नेमकेपणानं पोहोचतात. कलाकारांनीही त्यांतली लय, ताल उत्तमरीत्या पकडली आहे. त्यामुळे एक रंग-रस-गंध परिपूर्ण नाटक पाहिल्याचं समाधान प्रेक्षकांना मिळतं. या नाटकीय मांडणीत त्यातला विचार कुठंही हरवत नाही, हे विशेष. दिग्दर्शक म्हणून हे शिवधनुष्यच होतं. पण ते सुनील हरीश्चंद्र यांनी तितक्याच सामर्थ्याने पेललं आहे. नाटकाचा आशय, विषय, त्याचा वैचारिक पोत याला कुठंही ढळ जाऊ न देता गीत, नृत्य, संगीत यांच्या अवगुंठनात त्यांनी ते बांधलं आहे. त्यानं नाटकाचं सौंदर्य अधिकच वृद्धिंगत झालं आहे. ‘ऊर्मिलायन’ एक परिपूर्ण नाट्यानुभव रसिकांना देतं.
अरुण राधायन यांनी सांकेतिक, स्तरीय आणि वास्तवदर्शी नेपथ्यरचना करून नाटकाला स्थळ-काळाचा अस्सल आयाम दिला आहे. सुनील-गजानन यांच्या गीतांना रागदारी साज चढवून निनाद म्हैसाळकर यांनी उत्कट वातावरणनिर्मिती केली आहे. सुजय पवार- ऋचा पाटील यांनी नृत्यरचनेतून आशयाला अधिकची पुष्टी दिली आहे. चेतन ढवळे यांच्या प्रकाशयोजनेनं तर नजरबंदीच केली आहे. सिद्धार्थ आखाडे यांची साहसदृश्यं विश्वासार्ह. उदयराज तांगडी यांची रंगभूषा आणि सुनिहार यांची वेशभूषा नाटकाच्या दृश्यात्मकतेत आणि आशयात भर घालणारी आहे.
ऊर्मिलाची भूमिका करणाऱ्या निहारिका राजदत्त यांनी तिची भावनिक, मानसिक, वैचारिक आणि शारीर आंदोलनं समूर्त केली आहेत. तेही नाटकात योजलेल्या लय-तालाचं आवश्यक ते भान ठेवून! संवादोच्चार, देहबोली, नृत्यादी अंगं यांचं एकजिनसी रूप-रंग त्यांनी ऊर्मिलेत दाखवले आहेत. तिची वैचारिक भूमिकाही त्यांनी तितक्याच प्रत्ययकारीतेनं पोहोचवली आहे. एक परिपूर्ण अभिनेत्री म्हणून त्या आपल्याला सामोऱ्या येतात. लक्ष्मण झालेले अमोल भारती लक्षमणाची द्विधा अवस्था, कर्तव्य आणि प्रेमात त्यांना न करता आलेली फारकत, ऊर्मिलेची स्वयंभू प्रज्ञा ओळखण्यात झालेली गफलत नेमकेपणाने दाखवतात. पती आणि सखा यांच्यातलं द्वंद्व अखेरीस त्यांच्या कबुलीजबाबात जाणवतं. पण तोवर उशीर झालेला असतो. कल्पिता राणे यांनी सीतेच्या भूमिकेला गोडवा बहाल केला आहे. तिचं भगिनीप्रेम, कर्तव्यपरायणता, समंजसपणा त्यांनी यथार्थतेनं दर्शवला आहे. भरताची अपराधी अवस्था, ऊर्मिलेचं दु:ख जाणून आलेली व्याकुळता, बंधुप्रेम, निरपेक्षता अजय पाटील यांनी उत्कटतेनं व्यक्त केली आहे. पूजा साधना धनूच्या भूमिकेत चपखल बसल्यात. इतरही कलावंतांची कामं चोख झालीत. एक नितांतसुंदर दृक् -श्राव्य-काव्यानुभव देणारं ‘ऊर्मिलायन’ स्वत:ला रसिक म्हणवणारांनी पाहणं मस्टच!