पन्नाशीनंतर जोडीदाराच्या पश्चात आयुष्य निभावणं अनेकांना जड जाऊ लागतं. आयुष्याच्या मावळतीकडचा झुकाव, मुलांचं स्वतंत्र विश्व निर्माण झालेलं असणं, निवृत्तीपश्चात काय करायचं याचं आधी न केलेलं नियोजन, तशात जोडीदाराचा वियोग अशा चहुकडून कोसळलेल्या परिस्थितीत अनेक जण एकाकीपण आणि रिकामपणाचा खायला उठणारा वेळ अंगावर येऊन खचत जातात. आयुष्याच्या या जीवघेण्या पोकळीत जगणं असह्य झाल्यानं ते नव्या जोडीदाराची (कम्पॅनिअन) अपेक्षा धरतात. किमान त्यामुळे तरी आपल्या आयुष्याला काहीएक अर्थ येईल असं त्यांना वाटतं. हे गैर, अनैतिक आहे अशातलाही भाग नाही. पण तशी संधी वा हिंमत सगळ्यांनाच लाभते असंही नाही. मग आयुष्य रडतखडत ढकलणं नशिबी येतं. काही जण नव्यानं डाव मांडतात. त्यात ते यशस्वी होतात- न होतात, हा भाग वेगळा. लेखक-दिग्दर्शक हेमंत एदलाबादकरांनी म्हातारपणाकडे झुकलेल्यांची ही समस्या आपल्या नव्या नाटकात- ‘स्थळ आले धावून!’मध्ये हसतखेळत मांडली आहे. खरं तर ही समस्या नवीन मुळीच नाही, किंवा याआधी ती कधी मांडली गेलेली नाही अशातलाही भाग नाही. परंतु तरीही एका वेगळ्या कोनातून त्याकडे पाहावं असं लेखक-दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांना वाटल्याने त्यांनी या नाटकाचा घाट घातला आहे.

सुभाष फडतरे हे पन्नाशी पार केलेले निवृत्त शिक्षक. त्यांची पत्नी निवर्तली आहे. पंधरा हजाराच्या पेन्शनवर गुजराण करत असताना आपल्याला खायला उठणारं एकाकीपण दूर व्हावं यासाठी एखाद्या प्रौढ स्त्रीशी लग्न करावं असं त्यांच्या मनात येतं. पण कुणाला त्यासंबंधी सांगण्याचं धाडस नसल्याने ते एका विवाह मंडळात नाव नोंदवतात. हे विवाह मंडळ चालवणारे शरदचंद्र चंद्रात्रे हेही विधुर असतात. पण ते मोठे खटपटे गृहस्थ असतात. त्यांच्या वडलांनी स्थापन केलेलं हे विवाह मंडळ ते मोठ्या हिकमतीनं चालवत असतात. देवळात कीर्तन करणाऱ्या श्रावणी मेहेंदळे या पन्नाशीतल्या कीर्तनकार सुभाषरावांना आवडलेल्या असतात. त्या अविवाहित असल्याची माहितीही त्यांनी काढलेली असते. त्यांच्या नुसत्या दर्शनासाठी सुभाषराव या देवळात अधूनमधून चकराही मारत असतात. पण त्यांच्याशी थेटपणे बोलण्याची हिंमत मात्र त्यांना होत नाही. त्यांचा भिडस्त स्वभाव त्याआड येतो. ते शरदरावांना आपल्या मनीचं हे गुज सांगतात. आणि काहीही करून श्रावणीला आपल्याशी विवाह करण्यासाठी त्यांनी राजी करावं अशी त्यांना विनंती करतात.

murderwale kulkarni drama review by ravindra pathare recently hit theatres
नाटयरंग : ‘मर्डरवाले कुलकर्णी’ – मॅडच्यॅप फार्सिकल कॉमेडी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Masaba gupta After pregnancy, this fashion designer and actress showed her baby bump photos
गुडन्यूज दिल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध फॅशन डिझायनरने पहिल्यांदाच शेअर केले बेबी बंपचे फोटो; म्हणाली, “अजूनही थोडं…”
Sanjeeda Shaikh
”हीरामंडी’ फेम अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीने घटस्फोटाबद्दल सोडलं मौन; म्हणाला, “आमच्या दोघांमधील गोष्टी…”
shivani rangoli birthday mother in law mrinal Kulkarni writes special post
लाडक्या सुनेचा वाढदिवस! मृणाल कुलकर्णींची शिवानी रांगोळेसाठी खास पोस्ट; म्हणाल्या, “काहीतरी गंमत…”
Stampede at Mumbai s Bandra
अग्रलेख: पंचतारांकितांचे पायाभूत
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?

हेही वाचा >>>गुडन्यूज दिल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध फॅशन डिझायनरने पहिल्यांदाच शेअर केले बेबी बंपचे फोटो; म्हणाली, “अजूनही थोडं…”

शरदराव त्याप्रमाणे श्रावणीला लग्नासाठी राजी करतात आणि त्यांची सुभाषरावांशी भेट घडवून आणतात. पण त्या भेटीतच आपल्याला शिक्षक असलेला नवरा नको असं त्या शरदरावांना स्पष्टपणे सांगून टाकतात. आता आली का पंचाईत! सुभाषरावांचं स्थळ पहिल्याच फटक्यात बाद!! पण ते लपवून शरदराव ‘सुभाषराव हे अतिक्रमणविरोधी खात्यात असल्याचं’ श्रावणींना दडपून सांगतात. सुभाषराव त्यावर काही खुलासा करण्याचा व्यर्थ प्रयत्न करतात, पण शरदराव त्यांना अडवतात. त्यांच्याबद्दल श्रावणी यांना खूश करणारी भलभलती माहिती शरदराव देतात. सुभाषराव त्यांना दरवेळी अडवून वस्तुस्थिती सांगू पाहतात. पण तशी संधीच शरदराव त्यांना मिळू देत नाहीत.

अखेर एका क्षणी श्रावणी आपण शरदरावांच्याच प्रेमात पडल्याचं सांगून त्यांच्याशी(च) लग्न करण्याचा आपला मानस व्यक्त करतात. आणि सरळ-साध्या, नाकासमोर चालणाऱ्या सुभाषरावांना आपली चांगलीच फसवणूक झाल्यासारखं वाटतं. ते भयंकर अपसेट होतात.

…अशा ऊन-पावसाच्या खेळात सुभाषरावांचं श्रावणीशी अखेरीस लग्न जमतं का? या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्ष नाटकातच मिळवणं योग्य ठरेल.

लेखक-दिग्दर्शक हेमंत एदलाबादकरांनी पन्नाशीपार विधुरांच्या एकाकीपणाची समस्या घेऊन हे नाटक बेतलं आहे. यातली पात्रं आणि त्यांना दिलेली ट्रीटमेंट हे या नाटकाचं वैशिष्ट्य आहे. सरळमार्गी सुभाषराव, हिकमती शरदराव आणि लग्नाविना राहिलेल्या श्रावणी यांचे स्वभावविशेष हे ‘नाटक’ घडवून आणतात. या सगळ्यांच्या स्वभावविभावाने नाटक उत्तरोत्तर रंगत जातं. त्यासाठी ‘स्ट्रीटस्मार्ट’ शरदरावांची चपखल योजना नाटकात केली गेली आहे. ते नाना क्लृप्त्या लढवून सुभाषरावांचं लग्न जुळवून देण्यासाठी सर्व ते प्रयास करतात. या सगळ्या लगीनघाईत त्यांचं आणि श्रावणीच्या प्रेमप्रकरणाचं एक उपकथानकही योजलेलं आहे. त्या अर्थानं हे नाटक बेतीव आहे. परंतु दिग्दर्शकानं ज्या तऱ्हेनं त्याची हाताळणी केली आहे त्यामुळे प्रेक्षक त्यात नकळत गुंतत जातात. मोरपीस आणि दिवा यांसारख्या काही चित्रविचित्र कल्पनांची फोडणीही एदलाबादकरांनी त्यास दिलेली आहे. एका सर्वसामान्य विधुराचं लग्न जुळवण्यातली कसरत या नाटकात दाखवलेली आहे. ती मात्र वास्तवदर्शी आहे.

सुभाषरावांच्या भूमिकेत संजय मोने यांनी आपल्या जन्मजात वृत्तीच्या अगदी विरुद्ध धाटणीची भूमिका यात साकारली आहे. सरळमार्गी, नाकासमोर चालणारा, मनापासून प्रेम असलेली श्रावणीच आपल्याला जोडीदार म्हणून हवी आहे असा हट्ट धरणारा विधुर त्यांनी या नाटकात त्याच्या सगळ्या बारीकसारीक छटांसह उत्तमपणे वठवला आहे. तो वास्तववादी आहे. त्यामुळेच यातलं नाट्य खरं तर खुलत जातं. त्यांचा सरळ-साधेपणा त्यांच्या उक्ती आणि कृतींतूनही पदोपदी जाणवतो. याउलट, शरदराव हे हिकमती गृहस्थ आहेत. लग्नं कशी जुळवायची यात ते माहीर आहेत. प्राप्त परिस्थितीला ते कधीही हार जात नाहीत. त्यातूनही ते नाना खटपटी करून मार्ग काढतातच. डॉ. गिरीश ओक यांनी या शरदरावांना न्याय दिला आहे. त्यांच्या प्रेमात श्रावणी पडल्याचं दाखवणं ही ‘लेखकीय युगत’ असली तरीही ती शक्यता नाकारता येत नाही, इतकं त्यांचं व्यक्तिमत्त्व चटपटीत दाखवलेलं आहे. श्रावणी झालेल्या पूर्णिमा तळवलकर या कीर्तनकार, लग्नाचं वय उलटूनही जोडीदाराबद्दल काहीएक अपेक्षा बाळगलेल्या लग्नेच्छू स्त्री म्हणून फिट्ट वाटतात. त्यांच्या अपेक्षा आणि वस्तुस्थिती यातील फरकांतून यातलं नाट्य आकारास येतं. आधी सुभाषरावांबद्दल फारशा सीरियस नसलेल्या श्रावणी यथावकाश कशा त्यांच्या प्रेमात पडतात हा प्रवास नाटकात गमतीदारपणे दाखवलाय.

नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी विवाह मंडळाचं कार्यालय, श्रीकृष्णाचं मंदिर आणि त्यातलं सभागृह यथातथ्य उभं केलं आहे. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून यातील नाट्यपूर्ण प्रसंग उठावदार केले आहेत. विजय गवंडे यांचं संगीत प्रसंगानुकूल. मंगल केंकरे यांच्या वेशभूषेनं कलाकारांना नाट्यपोषक बाह्यरूप प्रदान केलं आहे. किरण शिंदे यांची रंगभूषा पात्रांना ‘व्यक्तिमत्त्व’ बहाल करते.

विधुरांची समस्या मांडता मांडता प्रेक्षकांचं मनोरंजन करणारं हे नाटक आहे यात शंका नाही.

Story img Loader