सासू-सुना यांच्यातला संघर्ष हा आदिम, सनातन काळापासूून चालत आलेला आहे. या संघर्षात त्यांच्या नवऱ्यांची मात्र हकनाक फरफट होते. म्हणजे सुनांच्या नवऱ्यांची आणि सासरेबुवांचीही! अर्थात हेही रीतीला धरूनच आहे. या समस्येला हात घालणारी नाटकं, चित्रपट याआधी भरपूर येऊन गेले आहेत. पण तरीही हा विषय चिरंतनच राहिला आहे. त्यातले तिढे, पेच नेमकी कोणकोणती वळणं घेतात यावर त्या कलाकृतींचं यश अवलंबून असतं. नुकतंच ‘द दमयंती दामले’ हे याच पठडीतलं, पण आगळ्या हाताळणीचं नाटक रंगभूमीवर आलं आहे. इम्तियाज पटेल यांच्या मूूळ कथेवर लेखक-दिग्दर्शक संतोष पवार यांनी ते बेतलं आहे. संतोष पवारांच्या नेहमीच्या सर्वसाधारण चाकोरीबाहेरचं असं हे नाटक आहे. चमत्कृतीपूर्ण पात्रं आणि उपरोधिक घटना-प्रसंग ही त्यांची खासीयत यात आहेच; पण बहुुश: वास्तवदर्शी पात्रंही इथे आहेत. सुधांशू- मृण्मयी आणि अंशुमान-तन्मयी ही मुलं-सुना असलेली दमयंती दामले ही सासू त्यांच्यासह एकत्र राहते आहे. पण त्यांचं आपापसात जराही पटत नाहीए. दोन्ही सुना एकमेकींचा भयंकर दु:स्वास करतात. त्या दोघींचा सासूशीही उभा दावा आहे. तरी बरं सासू नोकरी करतेय आणि घराला हातभारही लावतेय. मात्र सासूदेखील सुनांसारखीच खमकी आहे. ती जिथल्या तिथे त्यांना तोडीस तोड उत्तरं देेऊन निरुत्तर करत असते. त्यांना नेहमी शब्दश: धारेवर धरत असते. त्यांच्या कृत्यांचा तत्काळ आरसा दाखवत असते. मात्र बोर्डिंगमध्ये ठेवलेल्या नातवंडांसाठी तिचा जीव तीळ तीळ तुटतो. या तिघींच्या सततच्या भांडणांमुळे घरात नेहमीच रणकंदन चाललेलं असतं.
एकदा दमयंती नातवंडांना बोर्डिंगमध्ये भेटायला म्हणून घरून निघते आणि तिच्या टॅक्सीला अपघात होतो. तिला फारसं लागत नाही, पण चालकाचा मात्र जीव जातो. दमयंतीची मोठी सून मृण्मयी याबद्दल एक रील तयार करते आणि या अपघाताबद्दल जबाबदार धरून रीलद्वारे मंत्र्यांना जाब विचारते. स्वाभाविकपणेच मंत्रालयात खळबळ माजते आणि या घटनेची त्वरित दखल घेतली जाते. मंत्री जातीने दमयंतीच्या घरी येऊन तिची विचारपूस करतात आणि तिला एक लाख रुपये नुकसानभरपाई देऊ करतात. पण दमयंती मंत्र्यांना चालकाचा जीव गेल्याबद्दल चांगलीच फैलावर घेते आणि त्यांच्या कोडग्या उत्तरांची चीड येऊन ती त्यांच्या कानाखालीदेखील वाजवते. साहजिकपणेच सर्वत्र खळबळ माजते. दमयंतीविरुद्ध पोलीस केस होते. या सगळ्यामुळे घरातलं वातावरण पार ढवळून निघतं. आधीच सासू-सुनांचा छत्तीसचा आकडा; त्यात ही अकस्मात उद्भवलेली नको ती भानगड. त्यामुळे त्यांच्यातली भांडणं आणखीनच विकोपाला जातात.
पुढे या घटनेला अनेक फाटे फुटत जातात. सुनांच्या कारवायांमुळे दमयंतीचं जिणं हराम होतं. पण ती जशास तशी, ठोशाला ठोसा देणारी असल्याने त्या सर्वांना पुरून उरते.
हे सगळं नाट्य धुंवाधार विनोदाच्या दे धमाल आतषबाजीत संतोष पवार यांनी नाटकात सादर केलं आहे. सासू-सुनांची भांडणं आणि त्यातले अहंगंड आणि तिढे, कटकारस्थानं, त्याचे भयंकर परिणाम या गोष्टी टोकाला जाताना नाटकात दाखवल्या आहेत. सुना आपल्या विरोधात जी जी कारस्थानं रचतात ती सर्व दमयंती जशास तशी वागून हाणून पाडते. उलट अनेकदा त्यांच्यावरच डाव उलटवते. या तिघीही जणी एकापेक्षा एक कजाग, भांडखोर दाखवल्या आहेत. साहजिकपणेच त्यांच्यातला संघर्षही तितकाच ताणलेला आहे. मात्र त्यातून होणारी हास्यस्फोटक निष्पत्ती प्रेक्षकाला खुर्चीला बांधून ठेवते. हसून हसून गडाबडा लोळायला भाग पाडते.
संतोष पवार यांनी सासू-सुनांतील हा संघर्ष तीव्रतेनं यात सादर केला आहे. मागून कटकारस्थानं हा प्रकार न करता त्यांना समोरासमोरच त्यांनी भिडवलं आहे. त्यातून जी झकाझकी होते ती पाहण्याजोगी आहे. नाटक सुरू कुठून होतं आणि जातं कुठे, हा काहीसा अनाकलनीय प्रकार असला तरी त्यात प्रेक्षक वाहवत जातो, हेच खरं. सासूने ठरवून केलेलं बंड मुलं आणि सुनांना भारी पडतं. तेही आपल्या परीनं तिचा प्रतिवाद करतात, पण त्यात कायम तोंडघशी पडतात. हे भांडणनाट्य संतोष पवार यांनी धमाल रचलंय. पात्रं, त्यांचे स्वभावविभाव, वृत्ती, त्यातून निर्माण होणारे पेच… एकातून एक निर्माण होणारी घटनांची मालिका संतोष पवार यांनी उत्तमरीत्या आकारली आहे. तरीही सगळी पात्रं खरीखुरी, हाडामांसाची वाटतात यातच त्यांचं यश आहे. त्यांच्यातील चोरावर मोर होण्यासाठी लागलेली चढाओढ नाटकात धम्माल आणते. लेखक-दिग्दर्शक म्हणून हा सगळा खेळ संतोष पवार यांनी थेट प्रेक्षकांच्या समोरच घडवून आणला आहे. जुन्या नाटकांतल्यासारखं ‘पीठ पीछे’ काही होत नाही हे या नाटकाचं वैशिष्ट्य. दोन देऊन, दोन घेऊन सासू-सुनांतला हा संघर्ष सतत पेटता राहतो. आणि हीच या नाटकातली गंमत आहे. बायकोचा बैल असलेली फेंदाड मुलं त्यात भर घालतात. सुना आपसात कितीही एकमेकींचा दु:स्वास करत असल्या तरी सासूविरुद्ध मात्र एक होतात. यात सासू नेहमीचीच तंत्र वापरून त्यांना नेस्तनाबूत करते. अगदी त्यांना घराबाहेर काढण्याची धमकी देण्यापासून स्वत:ला कम्पॅनियन शोधण्यापर्यंत ती एकेक डाव टाकून मुलं आणि सुनांची तंतरवून ठेवते. हे सगळे घटना-प्रसंग संतोष पवार यांनी छान खुलवलेत. आणि हे सगळं क्षणाचीही त्यांना फुरसद न देता हम करेसो कायदा पद्धतीनं दमयंती उत्स्फूर्तपणे करते. अशानं विरोधी पक्षांची दाणदाण उडते हे वेगळं सांगायला नकोच. म्हटलं तर हे सारं वास्तवदर्शीच आहे! तरीही त्यातून नाट्य फुलत जातं.
संदेश बेंद्रे यांनी सासू-सुनांसह एकत्र कुटुंबाचं प्रशस्त घर छान उभारलंय. अमोघ फडके यांनी प्रकाशयोजनेतून यातले नाट्यपूर्ण क्षण नेमकेपणानं उठावदार केले आहेत. नचिकेत जोग आणि संतोष पवार यांच्या ‘ऑड’ गीतांना जितेंद्र कुलकर्णी यांनी सुसह्य संगीत दिलं आहे. सोनिया परचुरेंची नृत्यरचना नाटकाची मागणी पुरवते. विशाखा सुभेदार या चतुरस्रा कलावतीने दमयंती दामलेंच्या भूमिकेत आवश्यक तो तिखटपणा, उपहास-उपरोधाची फोडणी आणि त्याबरोबरीनेच लाडिक खट्याळपणाची उत्तम जोड दिली आहे. जवळजवळ एकखांबी तंबूसारख्या अख्खं नाटक त्या आपल्या खांद्यांवर घेऊन जातात. संवादफेकीतील नजाकत, त्यांतले आरोह-अवरोह त्यांनी अप्रतिम पेलले आहेत. खडुस सासू आणि तितकीच प्रेमळ, भावपूर्ण आज्जी त्यांनी छान साकारली आहे. पल्लवी वाघ-केळकर यांनी मृण्मयीच्या रूपात उपद्व्यापी, हेकेखोर सून फणकाऱ्याने उभी केली आहे. तितकीच जहांबाज दुसरी सून सुकन्या काळण (तन्मयी) यांनी वठवली आहे. सागर खेडेकर (अंशुमन) आणि संजीव तांडेल (सुधांशू) यांनी बायकोच्या हुकुमात असलेले नंदीबैल नवरे वास्तवदर्शी उभे केले आहेत. संजय देशपांडे यांनी मंत्री आणि वकिलाची दुहेरी भूमिका यथार्थपणे साकारली आहे. एलआयसी एजंट, स्वानंद आणि अॅण्डी- क्षितीज भंडारी यांनी पुरेशा समजेनं आकारले आहेत. वैदेही करमरकर यांनी टीव्ही रिपोर्टर आणि स्वानंदी या दोन भूमिका केल्या आहेत.
‘द दमयंती दामले’ ही दोन घटका उत्तम विरंगुळ्याची मागणी पुरवणारी कॉमेडी आहे.