माणसाचं वय वाढत जातं तसतसं त्याची गात्रं थकत जातात. मेंदूवरचं नियंत्रण हळूहळू सुटत जातं. काहींच्या बाबतीत तर स्मृतीवरही परिणाम होतो. मागच्या-पुढच्या गोष्टी आठवेनाशा होतात. कधी कधी तर त्या माणसाला काहीच आठवेनासं होतं. त्याला स्वत:चीही शुद्ध राहत नाही. अशावेळी त्या माणसाला स्वत:ला तर ते भयंकर जाचक असतंच, पण त्याच्या अवतीभोवती सतत वावरणाऱ्या माणसांनादेखील ते विलक्षण जड जातं. त्या माणसाचं अस्तित्व जिवंत असून नसल्यासारखंच होतं. आणि हे असं किती काळ चालणार हेही कुणाला माहीत नसतं. या आजारात सगळ्यांचंच जिणं कष्टप्रद होतं. बरं, यातून सुटण्याचा मार्गही नसतो. असं आयुष्य वाट्याला येणाऱ्यांच्या प्रती फक्त सहानुभूती व्यक्त करण्याशिवाय इतर लोक काहीच करूही शकत नाहीत. हे सारं भयंकर जीवघेणं असतं. म्हणूनच कदाचित या विषयावरच्या कलाकृतीही फारशा वाचायला, पाहायला मिळत नाहीत. क्वचितच कुणीतरी हा विषय हाताळतो. ते वाचणं किंवा पाहणंही अत्यंत त्रासदायक असतं. लेखक संदेश कुलकर्णी आणि अभिनेत्री-दिग्दर्शिका अमृता सुभाष यांनी मात्र हे धाडस ‘असेन मी… नसेन मी…’ या नाटकाच्या मंचनाने केलं आहे.

दीपा ही गौरी आणि रोहन या दोन मुलांची आई. रोहन अमेरिकेत स्थायिक. तर गौरी वैमानिक. दोघांचीही लग्नं झालीत. गौरी मुंबईत सहकुटुंब राहते, तर आई पुण्यात एकटीच राहतेय. गौरी इथं भारतात राहत असल्यानं स्वाभाविकपणेच आईची जबाबदारीही तिच्यावर आलेली. तीही आपल्या व्यग्र दिनक्रमातून जमेल तेव्हा पुण्यात येऊन आईची वास्तपुस्त करते, तिला हवं-नको ते पाहते. तशी तिची वर्षामावशीही असते पुण्यात. ती सतत दीपाला फोन करून तिच्या संपर्कात असतेच. मात्र तिचं सतत फोन करत राहणं दीपाला आवडत नाही. वर्षामावशी गोष्टीवेल्हाळ असते. तासन् तास फोनवर बोलत राहणं तिला आवडतं. त्यामुळे दीपा मात्र हैराण होते. पण गौरीला मावशीमुळे आईला कुणाची तरी सोबत आहे याचंच बरं वाटतं. पण अचानक वर्षामावशी हार्टअटॅकनं जाते आणि दीपा अगदीच एकटी पडते.

Manisha Kelkar Success Story
मराठी अभिनेत्रीची यशोगाथा! जागतिक पातळीवर करतेय देशाचं प्रतिनिधित्व, ‘कार रेसर’ म्हणून मिळवली ओळख, जाणून घ्या…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Marathi Movie Review M Po Bombilwadi Director Paresh Mokashi
रंगतदार प्रहसननाट्य
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Psychological Thriller Films On Hotstar
‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी
south star was first Indian to charge 1 crore per film
अमिताभ बच्चन, शाहरुख-सलमान खान नव्हे तर ‘हा’ आहे एक कोटी मानधन घेणारा पहिला भारतीय अभिनेता
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
Who is Sivasri Skandaprasad singer engaged to BJP MP Tejasvi Surya
भाजपा खासदार तेजस्वी सूर्या लोकप्रिय गायिकेशी बांधणार लग्नगाठ? कोण आहे ती? पंतप्रधान मोदींनी केलेलं कौतुक

हेही वाचा >>>Video: “लीलासाठी स्पेशल…”, एजे-लीलामधील अंतर कमी होणार; मनातल्या गोष्टी ओठांवर येणार? पाहा प्रोमो

त्यात हल्ली गौरीच्या प्रकर्षानं लक्षात येतं की, आई अनेक गोष्टी विसरू लागलीय. ती तिला तसं सांगण्याचा प्रयत्न करते. पण इतकी वर्षं नवऱ्याच्या पश्चात मुलांचं एकटीनं संगोपन करणाऱ्या दीपाला ते पटत नाही. ती तिला उडवून लावते. हळूहळू तिचं हे विस्मरण वाढतच जातं. तेव्हा गौरी आईसाठी चोवीस तास बाई ठेवण्याचं ठरवते. मात्र आपलं आई काही ऐकत नाही म्हटल्यावर ती रोहनचं नाव पुढे करते. कारण रोहनने केलेली कुठलीही गोष्ट दीपाला पटते. अगदीच पटलं नाही तरी ती ते पटवून घेते, हे गौरीला अनुभवानं माहीत असतं. त्याप्रमाणे सुनंदा नावाची बाई ती आईच्या मदतीसाठी मुक्रर करते. ही बाई आईची मनापासून काळजी घेते आहे हे पाहून तिला काहीसं हायसं वाटतं.

त्याचवेळी गौरीच्या व्यक्तिगत आयुष्यातही बरीच उलथापालथ सुरू असते. तिच्या आणि नवऱ्यात दुरावा निर्माण झालेला असतो. प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलेलं असतं. पण दीपाला या सगळ्याची काहीच जाणीव नसते. आपल्या संसारातील भीषण प्रश्न आणि आईचा स्मृतिभ्रंशाचा आजार याला एकाच वेळी तोंड देताना गौरीला नाकी नऊ येतात. ती हैराण होते. तशात तिचे नोकरीत व्यवस्थापनाशीही काही कारणांस्तव खटके उडतात. ती नोकरी सोडून आईकडे राहायला येते. आईचा स्मृतिभ्रंशाचा आजार हळूहळू वाढतच जातो. त्यात चहूबाजूंनी समस्यांच्या आवर्तात सापडलेली गौरी पार खचते… मोडून पडते… तरीही ती झुंजण्याचं सोडून देत नाही.

लेखक संदेश कुलकर्णी यांनी स्मृतिभ्रंशग्रस्त स्त्रीचा वाढता आजार आणि तिच्या सभोवतीच्या जीवलगांची होणारी ससेहोलपट, त्यांची मानसिक, शारीरिक आणि भावनिक होरपळ या नाटकात तपशिलांत चितारली आहे. अशात आणखीन त्या भोवतालच्या जीवलगांना वेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर ही जीवघेणी कसरत त्यांच्या आवाक्याबाहेरची ठरते. हळूहळू वाढणारा हा आजार घरात चहूबाजूंनी अंधार कसा दाटत आणतो हे लेखकाने प्रत्ययकारीतेनं दाखवलं आहे. यातली सगळीच पात्रं हाडामांसाची आहेत. त्यांचे त्यांचेही काही प्रश्न आहेत. त्यांच्याशीही ते झुंजताहेत. त्याचवेळी अशा रुग्णाशी कसं वागायचं, त्याला कसं हाताळायचं हे न कळून त्यांची त्रेधा उडते. एक विझत जाणारं आयुष्य सतत समोर पाहणं यासारखा वेदनादायी दुसरा अनुभव नसेल. हा सगळा प्रवास लेखकानं वास्तवदर्शीत्वानं घडवला आहे. पात्रांचे परस्परसंबंध, त्यांतले खाचखळगे, पात्रांचं पूर्वायुष्य, त्याचे दृश्यादृश्य परिणाम, या आजारपणानं त्यात निर्माण होणारे आणखीन वेगळेच तिढे याचं सम्यक चित्रण त्यांनी उभं केलं आहे. आपल्या घरातच घडणारी एखादी अनिष्ट गोष्ट आपण पाहतो, अनुभवतो आहोत असं सतत वाटत राहतं.

हेही वाचा >>>बॉलीवूड गाजवणाऱ्या माधुरी दीक्षितला एकेकाळी म्हटले जायचे पणवती; प्रसिद्ध दिग्दर्शकांचा खुलासा, म्हणाले, “वेडा झाला…”

अमृता सुभाष यांनी हे नाटक दिग्दर्शित केलं आहे. एक उत्तम अभिनेत्री म्हणून आपल्याला त्या परिचित आहेत. या नाटकाद्वारे आपली ही एक नवीनच सशक्त ओळख त्यांनी निर्माण केली आहे. पात्ररेखाटन, प्रसंगनिर्मिती, नाट्यपरिणामाचा चढता आलेख त्यांनी यात कौशल्यानं चितारला आहे. पात्रांना दिलेले व्यवहार, त्यांची बदलती रूपं, त्यांची मानसिक, भावनिक आंदोलनं, त्यातले चढउतार हे सारं त्यांनी इतक्या प्रत्ययकारीतेनं आविष्कृत करवून घेतलंय की ज्याचं नाव ते! यातलं एकही पात्र अनोळखी वाटत नाही. त्यांच्या लकबी, सवयी, त्यांचं वेळोवेळी व्यक्त होणं… या सगळ्याचा सखोल विचार त्यात जाणवतो. त्यांचा हा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न आहे हे कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही. अर्थात त्यांनी महाविद्यालयीन जीवनात एकांकिका वगैरे बसवल्या होत्या हे खरं, पण तो भूतकाळ झाला. एक संपूर्ण लांबीचं नाटक बसवणं हे येरागबाळ्याचं काम नाही. पण त्यात त्या शंभर टक्के यशस्वी झाल्या आहेत. या लेखक-दिग्दर्शक जोडीनं जीवनाचा एक विलक्षण तुकडा आपल्यासमोर पेश केला आहे. सध्या मराठी रंगभूमीवर नवरा-बायको नात्याचं जे उदंड पीक आलं आहे, त्या पार्श्वभूमीवर हे नाटक म्हणजे एक सुखद शिडकावा आहे.

प्रदीप मुळ्ये यांनी नेपथ्य-प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळली आहे. एका वृद्ध स्त्रीचं पुण्यातलं मध्यमवर्गीय घर त्यांनी त्यातल्या एकटे-एकाकीपणासह उभं केलं आहे. गौरीच्या अधूनमधून येण्यानं ते गजबजतं. स्मृतिभ्रंशाच्या आजारपणाच्या कृष्णछाया त्यावर पडलेल्या जाणवतात. नाट्यांतर्गत प्रसंग ठळक करण्याचं काम त्यांच्या प्रकाशयोजनेनं केलं आहे. साकेत कानेटकर यांचं संगीत नाट्यपरिणामात भर घालतं. श्वेता बापट यांची वेशभूषा पात्रांना बाह्यरूप प्रदान करते.

नीना कुळकर्णी यांनी मोठ्या खंडानंतर रंगभूमीवर पुन्हा पदार्पण केलं आहे. ैध्यानीमनी’नंतर तशाच ताकदीची दीपाची ही भूमिका त्या यात साकारताहेत. विसराळूपणाची मात्रा हळूहळू वाढत नेणारा त्यांचा स्मृतिभ्रंशाचा आजार, त्यातले एकेक टप्पे, त्यात त्यांचा मूळचा मानी स्वभाव, त्यातले पीळ, पूर्वायुष्याचं ओझं बाळगत जगणं… यांचं संमिश्रण त्यांनी इतक्या उत्कटतेनं केलं आहे की प्रदीर्घ काळ त्यांची ही भूमिका रसिकांच्या लक्षात राहील. त्याचं वागणं, बोलणं, व्यक्त होणं, त्यातले ठहराव आपल्याला खिळवून ठेवतात. शुभांगी गोखले यांची बडबडी वर्षामावशी- तिच्या भूतकाळाचं जू खांद्यावर न घेता जगण्याचं तिचं तत्त्वज्ञान, सदा हसतमुखतेनं जीवनाला सामोरं जाणं छान दाखवतात. नंतर सुनंदाचं याच्या अगदीच उलट, संपूर्णपणे वेगळंच रूप त्यांनी तितक्याच सशक्तपणे साकारलंय. त्यातही त्या आपली अनोखी छाप बोलण्या-वागण्या-वावरण्यातून पाडून जातात. त्यांच्या अभिनयाची जबरदस्त रेंज त्यातून आकळते. त्यांची यातली रूपं प्रेक्षकांना बराच काळ लक्षात राहतील यात शंका नाही. अमृता सुभाष यांनी गौरीच्या भूमिकेत स्मृतिभ्रंशाचा आजार वाढत जाणाऱया आईचं मनापासूनचं संगोपन, त्याला पुरे पडताना तिची होणारी दमछाक, आपल्या व्यक्तिगत आयुष्याचं यादरम्यान तिच्यावर पडलेलं भीषण सावट, अनेक आघाड्यांवर झुंजताना तिची उडणारी त्रेधातिरपीट, येणारा मानसिक, भावनिक, शारीरिक थकवा आणि त्यातून येणारं खचलेपण… हे सगळे आंदोळ त्यांनी अत्यंत प्रभावीरीत्या व्यक्त केले आहेत. त्यांचं भूमिकेत घुसणं म्हणजे काय, याचा हा वानवळा आहे. तुषार टेंगले यांनी दीपाचा मृत नवरा चोख साकारलाय.

खूप दिवसांनी एक उत्कट नाट्यानुभव देणारं नाटक पाहिल्याचं समाधान हे नाटक देतं यात बिलकूल शंकाच नाही.

Story img Loader