अलीकडे लग्न या विषयावर बरीच नाटकं रंगभूमीवर आलीयत. त्यातली काही चालली. काही नाही चालली. लग्न हा सनातन आणि चिरंतन विषय आहे माणसाच्या आयुष्यातील. त्याबद्दल बोलायला, व्यक्त व्हायला कुणालाही आवडतं. गेल्या कित्येक शतकांत यावर चर्चा, वादविवाद झडत आहेत. त्यातून लग्नसंस्थेत काही सुधारणाही घडल्या आहेत…घडताहेत. लग्न हा दोन व्यक्तींमधील मामला नसून तो दोन भिन्न कुटुंबांतील संस्कार, संस्कृतीचा संगम असतो… इथपासून ते तो संभाव्य स्त्री-पुरुषांतील (समलिंगी असेल तरीही तेच!) एक व्यक्तिगत व्यवहार असतो, त्यात इतरांचा काहीच संबंध नसतो… इथवर गोष्टी येऊन ठेपल्या आहेत. लग्नातील वर्चस्ववाद नको म्हणून आता ‘लिव्ह इन’चीही कास अनेक जण धरताना दिसतात. पण त्यातल्या स्वातंत्र्याचे स्वैराचारात कधी रूपांतर होईल याची जोडीदारांतील प्रत्येकालाच धास्ती असल्याने आणि यात कुणीच कुणाला बांधील नसल्याने गाडी परत लग्नाच्या स्टेशनवरच येऊन थांबते. मग सहसा नवरा-बायकोत जे होतं ते या जोडप्यांतही होतं. त्यात हल्ली व्यक्तिवादानं टोक गाठलेलं असल्याने कुणीच कुणाला समजून घेऊ इच्छित नाही. परिणामी घटस्फोट अटळ ठरतो. हे सगळं टाळायचं तर परस्पर अनुरूपता पारखायचा फंडा आता सुरू झाला आहे. ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या नाटकात प्रथम याला वाचा फुटली. याच अनुषंगाने अलीकडच्या काळातली नाटकं या विषयाला हात घालताना दिसतात. नुकतंच रंगमंचावर आलेलं विराजस कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित ‘वरवरचे वधू-वर’ हेही नाटक याच पठडीतलं आहे.

विशाखा मोहित माने ही लग्नाळू तरुणी आपल्या ऑफिसच्या कामानिमित्त वाईला एका हॉटेलात उतरते. नेमक्या त्याच वेळी तिच्याच मुंबई ब्रॅन्चचा एक तरुण- मोहित माने त्याच कामासाठी वाईला त्याच हॉटेलात येऊन थडकतो. नामसाधर्म्यामुळे हॉटेलचा मॅनेजर त्याला विशाखाचा नवरा समजून तिच्याच रूमची चावी देतो. आणि गोंधळ होतो. हा कोण पुरुष आपल्या रूममध्ये घुसलाय या त्रस्त प्रश्नाने विशाखा भडकते. बरं, दोघांच्या नावातील गोंधळाने हे घडलंय असं बऱ्याच वादावादीनंतर त्यांच्या लक्षात येतं. मग ते रूम बदलून घेतात. पण एकाच कामासाठी दोघंही आलेले असल्याने त्यांचा दररोज संबंध येतोच. एकमेकांची वृत्ती-प्रवृत्ती, स्वभाव, आवड-नावड दोघांनाही कळते. दोघंही लग्नाळू असल्याने त्यादृष्टीने आपण विचार करावा का, असाही विचार उभयतांच्या मनात डोकावतो. काय हरकत आहे आपण परस्परांना अनुरूप आहोत की नाहीत, हे पाहायला? मग चार-पाच दिवस एकत्र राहून बघू या तर खरं… असं ते ठरवतात. यात परस्परांशी तीनदा भांडण झालं तर आपण एकमेकांना अनुकूल नाही हेही कळेल, हा त्यामागचा हेतू असतो.

हेही वाचा >>>Bigg Boss Marathi: तुझं अरबाजवर प्रेम आहे का? सूरज चव्हाणने थेट प्रश्न विचारल्यावर निक्की म्हणाली, “तो मला…”

साहजिकच पहिल्याच दिवशी जेवण कुणी बनवायचं, यावरून त्यांचा वाद होतो. मोहितने, विशाखा स्त्री असल्याने तीच स्वैपाक करेल असं गृहीत धरलेलं असतं. पण ती त्यास ठाम नकार देते. आपण दोघं समसमान आहोत, तर एक दिवस तू, एक दिवस मी स्वैपाक करेन, असं ती त्याला सांगते. पण त्याला काहीच येत नसल्याने त्याला प्रत्येक गोष्ट तिला सांगावी लागते. त्यापेक्षा आपणच स्वैपाक केलेला परवडला असं तिला वाटतं.

अशा प्रत्येक गोष्टीत त्यांच्यात मतभेद होतात. त्याचदरम्यान विशाखा इतरही मुलं पाहत असतेच. त्यातल्या एका स्थळावरून तिला होकार येतो. तो मुलगा तिच्या मनासारखा असतो. त्यामुळे ती हरखते. मोहितला आपला पत्ता कट झालाय हे समजतं. तोही समजुतीने माघार घेतो.

पण……लेखक-दिग्दर्शक विराजस कुलकर्णी यांनी दोन व्यक्तिवादी तरुण-तरुणींतला संघर्ष या नाटकात मांडला आहे. त्यात योगायोग आहेत, तू तू- मी मी आहे, आणि प्रेमही आहे. दोघांच्या भिन्न सवयी, आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन, त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तींतील झगडा, स्वभाव हे तर संघर्षाचे मुद्दे आहेतच; पण त्यापलीकडेही एखादी गोष्ट अशी असू शकते, की जी त्या व्यक्तींना बांधून ठेवू शकते. ती काय आहे आणि ती कशी ‘वर्क’ होते याचंच हे नाटक आहे. हे तीन पात्रांचं नाटक आहे. त्यातला हॉटेलचा मॅनेजर पांडा हा नसता तरी चाललं असतं. खरं तर हे विशाखा आणि मोहितमधलंच नाटक आहे. थोडंफार जोडकाम करण्यासाठी पांडाची नेमणूक झाली असावी. लिखाणात पहिल्या अंकात प्रस्तावना खूपच लांबल्यासारखी वाटते. दुसऱ्या अंकात खरंखुरं नाटक घडतं… आकारास येतं. या अंकाची बांधणी लेखकानं घट्ट केली आहे. आजच्या तरुण-तरुणींचा लग्न, संसार, आपलं आयुष्य याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी ताज्या मांडणीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. अर्थात त्यात फारसं नावीन्य नाहीए, हेही खरंय. कारण याआधीच्या अनेक नाटकांतून ते आलेलं आहे. तरीही आजच्या पिढीची मानसिकता समजून घ्यायला नाटक मदत करतं, हे निश्चित. लेखकच दिग्दर्शक असल्याने आपल्याला काय प्रेक्षकांसमोर मांडायचं आहे आणि कशा प्रकारे ते पोहोचवायचं आहे याची पूर्ण जाणीव विराजस कुलकर्णी यांना असल्याचं जाणवतं. उभयतांतील प्रसंग खुलवण्याचं कौशल्य, त्यातले बारकावे, भावभावनांचे ताण त्यांनी नेमकेपणाने टिपलेत. दोघांना लग्न तर करायचं आहे, पण त्यासंबंधीच्या त्यांच्या कल्पनांतील तफावत ‘नाटक’ घडवते. अनेक छोटे छोटे खटकेदार घटना-प्रसंग नाटकाची रंगत वाढवतात. कलाकारांची योग्य निवड आणि त्यांच्याकडून हवं ते काढून घेण्यात लेखक-दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.

विशाखाच्या भूमिकेत सखी गोखले यांनी स्त्रीवादी विचारांची, त्यावर ठाम असलेली आणि त्याबाबतीत कुठलीही तडजोड करू न इच्छिणारी लग्नाळू तरुणी तडफदारपणे साकारली आहे. मोहितबरोबरचे तिचे संबंध लव्ह-हेट प्रकारचे आहेत. त्यातलं टोकाला जाणं आणि कधीतरी माघार घेणं त्यांनी पुरेशा समजुतीने दाखवलं आहे. सुव्रत जोशी यांचा मोहित बिच्चारा वाटतो. त्याची जडणघडण ज्या वातावरणात झालीय त्याचे परिणाम भोगतानाचे त्याचं बिच्चारेपण त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करतं. त्याचं मम्मावेडही त्यांनी लोभसरीत्या दाखवलंय. विशाखाशी जुळवून घेताना त्याची उडणारी फे-फे बघण्यासारखीच. त्याच्या विशाखासमोरच्या संयततेनं ते उठून दिसतात. हॉटेल रूमचा मॅनेजर म्हणून पांडा हे पात्र यात येतं. ती भूमिका सुरज पारसनीस यांनी यथातथ्य निभावली आहे. नाटकात अधूनमधून विरंगुळ्यासाठी त्यांची योजना केलेली आहे. वाईतील हॉटेल रूमचं नेपथ्य प्रदीप पाटील यांनी उभं केलं आहे. त्यांनी नेपथ्यातून नाट्यव्यवहारास पुरेसा अवकाश उपलब्ध करून दिला आहे. तेजस देवधर प्रकाशयोजनेतून काळ-वेळेचे संदर्भ पुरवतात. निषाद गोलांबरे संगीतातून आवश्यक ती पार्श्वभूमी तयार करतात. विराजस यांच्या गीतांना फुलवा खामकर यांच्या नृत्यरचनेची उत्तम साथ मिळाली आहे. कल्याणी कुलकर्णी-गुगळे यांनी वेशभूषेची, तर सौरभ कापडे-राजेश परब यांनी रंगभूषेची जबाबदारी पेलली आहे.