माणसांचं आयुष्य त्यांच्या हातात असतं असा एक गैरसमज आहे. कित्येकदा माणूस ठरवतो एक… घडतं भलतंच. ज्याच्या त्याच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनानुसार जो तो आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो. त्यात कधी त्याला यश येतं, तर कधी अपयश. त्याच्या आजूबाजूच्या माणसांचाही त्याच्या आयुष्यावर परिणाम होत असतो. लग्न ही तर मनुष्याच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाची घटना. मग ते ठरवून केलेलं असो वा प्रेमविवाह… त्याचं यशापयश उभय जोडीदारांच्या वागण्या-बोलण्यावर, कर्तृत्वावर, समजून घेण्याच्या कुवतीवर आणि अशाच अनेक बाबींवर अवलंबून असतं. एकदंत क्रिएशन्स निर्मित, ऋषिकांत राऊत लिखित आणि प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’ हे नव्यानं रंगभूमीवर आलेलं नाटक याबद्दलच काहीएक भाष्य करतं. यात तीन जोडप्यांच्या आणि एका सतत नवनव्या रिलेशनशिपमध्ये आनंद शोधणाऱ्याच्या समांतर कथा गुंफलेल्या पाहायला मिळतात. विवेक हा तरुण ‘बोगनव्हिला रिसॉर्ट’चा मालक. आपला आजचा दिवस खरा – या वृत्तीचा. त्याने अनेक तरुणींशी फ्लर्ट करून नंतर त्यांच्याशी त्याचं ब्रेकअप् झालंय. तरीही तो सतत नवनव्या तरुणींशी फ्लर्ट करत असतो. त्याच्या रिसॉर्टचं काम पाहणारा मित्र अमित हाही एक लग्नाळू तरुण. तो प्रिया नावाच्या करिअरिस्ट मुलीच्या प्रेमात आहे. पण तिचा फोकस क्लीअर आहे… तिला तिच्या नोकरीत सर्वोच्च बॉस व्हायचं! लग्नबिग्न तिच्या अजेंड्यावरच नाहीए. पण अमितला मात्र वाटतं- ती एक ना एक दिवस आपल्याला ‘हो’ म्हणेल. मात्र, ती कधीच तुझ्याशी लग्न करणार नाही असं विवेक त्याला पावलोपावली सांगतो. मात्र, अमित ते मनावर घेत नाही. त्यांच्या रिसॉर्टवर एक हनिमून कपल येतं. आरती आणि प्रकाश. तो शेतकरी. ती रील बनवणारी शहरी तरुणी. उठसूट ‘रील’मय झालेली आरती प्रकाशच्या डोक्यात जाते. हनिमूनलाही तिचं ‘रील’वेड कमी होत नाही. आपलं खासगी आयुष्य असं चव्हाट्यावर मांडणं प्रकाशला बिलकूल खपत नाही. त्यावरून त्यांची सतत भांडणं होतात. त्यामुळे त्यांच्या हनिमूनचा पार विचका होतो. त्याच रिसॉर्टमध्ये शलाका नावाची विवेकची कॉलेजमधील एक मैत्रीण मुक्कामाला येते. तिची डिव्होर्सची केस सुरू आहे. नवऱ्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून तिने हे पाऊल उचललंय. तिने मुलाला- कौशिकला हॉस्टेलमध्ये ठेवलंय. संसारातील कटकटींपासून दोन-चार दिवस दूर जावं म्हणून ती रिसॉर्टवर आलीय. पण आल्या दिवसापासून विवेक आपल्याशी फ्लर्ट करू पाहतोय हे पाहून ती त्याला चांगलंच झापते. तिला त्याचा इतिहास माहीत आहे. अशी निरनिराळ्या ध्रुवांवरची माणसं रिसॉर्टमध्ये एकत्र येतात आणि त्यांची स्वतंत्र आयुष्यं एकमेकांच्या आयुष्यात मिसळू पाहतात. त्यातून काय काय घडतं, हे दाखवणारं हे नाटक आहे. मानवी नातेसंबंधांचे अनेकानेक पदर त्यातून उलगडत जातात. समकालीन वास्तवाचे काही रंगही त्यात मिसळतात. रीलच्या आहारी गेलेली एक पिढी यानिमित्ताने कुठल्या आभासी जगात जगतेय, हे तर त्यातून कळतंच, पण करीअरिस्ट अॅप्रोच असलेल्या तरुणाईची ंससेहोलपटही यातून पुढे येते. त्याचवेळी घरातील वातावरणाने बहकलेला तरुण विवेकच्या रूपात आपल्यासमोर उभा ठाकतो. त्याचबरोबर आजच्या ग्रामीण तरुणाची गोचीही प्रकाशच्या रूपात यात मांडली गेली आहे. रिसॉर्टमुळे ही मंडळी एकत्र येतात आणि त्यांच्या आयुष्याचे चित्रविचित्र तुकडे कॅलिडोस्कोपमधून आपल्याला अनुभवता येतात. मानवी जगण्यातील गुंतागुंत याद्वारे या नाटकातून मांडली गेली आहे. म्हटलं तर वेगवेगळ्या प्रेमकहाण्यांचा हा कोलाज आहे, आणि त्याचवेळी माणसाचं जगणं समजून घेण्याचाही हा प्रयत्न आहे.

– लेखक ऋषिकांत राऊत यांनी आजचं समाजातील वास्तव या नाटकातून मांडायचा प्रयत्न केला आहे. आणि तो बऱ्याच अंशी यशस्वी झाला आहे. यातलं प्रत्येक पात्र एकेका समस्येचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या आयुष्याचे हे तुकडे त्यांच्याबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल काहीएक भाष्य करू पाहतात. त्यांचे त्यांचे दृष्टिकोन तर यात येतातच, पण त्यांची परिस्थितीनं केलेली कोंडी, त्यांनी स्वत:हूनच करून घेतलेली ससेहोलपट असं सगळं एकाच वेळी सामोरं येतं. त्यातून ही मंडळी नकळत एकमेकांजवळ येतात, एकमेकांना मार्ग दाखवतात आणि मार्गस्थ होतात. हे सारं लेखकानं छान जुळवून आणलंय. प्रत्येक व्यक्तिरेखा आणि तिचा स्वतंत्र विचार त्यांनी केल्याचं जाणवतं. फक्त करीअरिस्ट प्रियाचं आत्महत्येपर्यंत येणं अधिक ठोस पार्श्वभूमीमुळे येतं तर ते अधिक पटलं असतं. तिचे परितोषबरोबरचे संबंध आणि त्यांचा एचआरने जोडलेला संबंध यांतलं समीकरण नेमकेपणानं कळत नाही. त्यात स्पष्टता यायला हवी. बाकी सगळी पात्रं चोख. त्यांचं व्यक्तिरेखाटनही पटण्यासारखं. त्यांचे परस्परसंबंध, त्यातली गुंतणूक लेखकानं उत्तम चितारलीय.

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
Bhandara, Selfie , tiger , Suhani tiger ,
VIDEO : झुडपात बसलेल्या वाघासोबत चक्क ‘सेल्फी’, सुहानीच्या बछाड्याला पुन्हा लोकांनी…..
homosexual, Akola , Marriage for money,
अकोला : पैशांसाठी लग्न, पोलीस पत्नीचा छळ अन् पती निघाला समलैंगिक….

हेही वाचा >>>नव्या मालिकांची नांदी! ‘झी मराठी’वर सुरू होणार ‘ही’ थ्रिलर मालिका; जबरदस्त VFX ने वेधलं लक्ष, पाहा पहिली झलक

दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांनी मानवी संबंधांतली ही गुंतागुंत, त्यातले खाचखळगे नेमकेपणाने आकारीत केले आहेत. प्रत्येक पात्राला ज्याचा त्याचा ‘स्व-भाव’ देण्यात ते यशस्वी झाले आहेत. मुख्य म्हणजे नाटकभर एक प्रसन्न खेळकरता त्यांनी पेरली आहे. त्यामुळे प्रचलित नाटकांत या नाटकाचं एक आगळेपण जाणवतं. नाटकात जे म्हणायचं आहे ते योग्यरीत्या पोहचेल याची खबरदारी दिग्दर्शकानं घेतली आहे. विशेषत: शलाका आणि विवेकमधील मैत्रभाव त्यांनी चपखलपणे अधोरेखित केला आहे. आरती आणि प्रकाशमधील झकाझकी नाटकाची रंगत वाढवते. पण तेही अतिशयोक्त वाटण्याइतपत त्यांनी ताणलेलं नाही. वातावरणनिर्मिती, रंगमंचीय व्यवहार, नेपथ्य, पात्रांचं स्वभावरेखाटन, सादरीकरणाचा ओघ, रिसॉर्टमधील आलेल्यांसाठी योजलेला गेम आणि त्यातून वेगवेगळ्या व्यक्तींच्या समोर आलेल्या समस्या यांचा मनोहारी धागा दिग्दर्शकानं विणला आहे. आजची पिढी कशी या नाटकाशी कनेक्ट होईल यासाठीच्या सगळ्या क्लृप्त्या त्यांनी लीलया वापरल्या आहेत… त्याही त्याची जागमाग लागू न देता.

‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’तील ‘बोगनव्हिला रिसॉर्ट’चं नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी इतकं अप्रतिम केलंय, की आपण प्रत्यक्ष रिसॉर्टच पाहतो आहोत असा भास होतो. त्यातही नाट्यव्यवहाराला त्यांनी पुरेशी जागा उपलब्ध करून दिली आहे. शीतल तळपदे यांच्या प्रकाशयोजनेनं नाट्यप्रसंग खुलून येतात. दिवसाचे निरनिराळे प्रहर त्यातून प्रत्ययकारी झाले आहेत. अजित परब यांचं संगीत नाट्यात्म क्षण ठळक करतात. मृणाल देशपांडे यांची वेशभूषा आणि शरद सावंत यांची रंगभूषा पात्रांचं बाह्यरूप प्रसंगानुकूल करतात.

हेही वाचा >>>“त्या दिग्दर्शकाने मला ऑफिसमध्ये बोलावलं आणि…”, राजकुमार रावच्या पत्नीने सांगितला ‘तो’ अनुभव

यातल्या सगळ्याच कलाकारांची कामं चोख झाली आहेत. सुयश टिळक-विवेकच्या बाह्यत: बेफिकीर, बिनधास्त वर्तनाचा आव आणत असले तरी आतून कुठेतरी ते असुरक्षित आहेत हे सतत जाणवत राहतं. त्यांच्या हालचाली आणि वर्तनात त्याचं प्रतिबिंब पडतं. संयमी, समजूतदार शलाका-सुरुची आडारकर यांनी उत्कटतेनं साकारली आहे. प्रियाचं वर्कहोलिक आणि महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्त्व शर्वरी कुळकर्णी-बोरकर यांनी तडफदारपणे आणि आपल्या अवघ्या देहबोलीतून साकारलं आहे. तिचं मनोरुग्णावस्थेपर्यंत येणंही त्यामुळेच पटतं. पण त्यामागची पार्श्वभूमी तितकीशी स्वीकारार्ह वाटत नाही. लग्नासाठी आसुसलेला अमित – रोहित हळदीकर यांनी नेमकेपणी व्यक्त केला आहे. शर्मिला शिंदे यांची ‘रील’मास्टर आरती तिचं रीलच्या आहारी जाणं, त्यातला पझेसिव्हनेस आणि मूर्खतापूर्ण व्यवहारांतून यथार्थपणे वठवली आहे. पूर्णानंद वांढेकर यांनी शहरी आणि ग्रामीण तरुणाईच्या खेचाखेचीत सापडलेला तरुण शेतकरी झक्कास रंगवला आहे. या दोघांची जोडी नाटकातील विरंगुळा कोशंट पुरेपूर देते.

मानवी नातेसंबंधांचे विविध पदर उलगडून दाखवणारं हे नाटक एकदा नक्कीच पाहायला हवं.

Story img Loader