माणसांचं आयुष्य त्यांच्या हातात असतं असा एक गैरसमज आहे. कित्येकदा माणूस ठरवतो एक… घडतं भलतंच. ज्याच्या त्याच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनानुसार जो तो आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो. त्यात कधी त्याला यश येतं, तर कधी अपयश. त्याच्या आजूबाजूच्या माणसांचाही त्याच्या आयुष्यावर परिणाम होत असतो. लग्न ही तर मनुष्याच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाची घटना. मग ते ठरवून केलेलं असो वा प्रेमविवाह… त्याचं यशापयश उभय जोडीदारांच्या वागण्या-बोलण्यावर, कर्तृत्वावर, समजून घेण्याच्या कुवतीवर आणि अशाच अनेक बाबींवर अवलंबून असतं. एकदंत क्रिएशन्स निर्मित, ऋषिकांत राऊत लिखित आणि प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’ हे नव्यानं रंगभूमीवर आलेलं नाटक याबद्दलच काहीएक भाष्य करतं. यात तीन जोडप्यांच्या आणि एका सतत नवनव्या रिलेशनशिपमध्ये आनंद शोधणाऱ्याच्या समांतर कथा गुंफलेल्या पाहायला मिळतात. विवेक हा तरुण ‘बोगनव्हिला रिसॉर्ट’चा मालक. आपला आजचा दिवस खरा – या वृत्तीचा. त्याने अनेक तरुणींशी फ्लर्ट करून नंतर त्यांच्याशी त्याचं ब्रेकअप् झालंय. तरीही तो सतत नवनव्या तरुणींशी फ्लर्ट करत असतो. त्याच्या रिसॉर्टचं काम पाहणारा मित्र अमित हाही एक लग्नाळू तरुण. तो प्रिया नावाच्या करिअरिस्ट मुलीच्या प्रेमात आहे. पण तिचा फोकस क्लीअर आहे… तिला तिच्या नोकरीत सर्वोच्च बॉस व्हायचं! लग्नबिग्न तिच्या अजेंड्यावरच नाहीए. पण अमितला मात्र वाटतं- ती एक ना एक दिवस आपल्याला ‘हो’ म्हणेल. मात्र, ती कधीच तुझ्याशी लग्न करणार नाही असं विवेक त्याला पावलोपावली सांगतो. मात्र, अमित ते मनावर घेत नाही. त्यांच्या रिसॉर्टवर एक हनिमून कपल येतं. आरती आणि प्रकाश. तो शेतकरी. ती रील बनवणारी शहरी तरुणी. उठसूट ‘रील’मय झालेली आरती प्रकाशच्या डोक्यात जाते. हनिमूनलाही तिचं ‘रील’वेड कमी होत नाही. आपलं खासगी आयुष्य असं चव्हाट्यावर मांडणं प्रकाशला बिलकूल खपत नाही. त्यावरून त्यांची सतत भांडणं होतात. त्यामुळे त्यांच्या हनिमूनचा पार विचका होतो. त्याच रिसॉर्टमध्ये शलाका नावाची विवेकची कॉलेजमधील एक मैत्रीण मुक्कामाला येते. तिची डिव्होर्सची केस सुरू आहे. नवऱ्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून तिने हे पाऊल उचललंय. तिने मुलाला- कौशिकला हॉस्टेलमध्ये ठेवलंय. संसारातील कटकटींपासून दोन-चार दिवस दूर जावं म्हणून ती रिसॉर्टवर आलीय. पण आल्या दिवसापासून विवेक आपल्याशी फ्लर्ट करू पाहतोय हे पाहून ती त्याला चांगलंच झापते. तिला त्याचा इतिहास माहीत आहे. अशी निरनिराळ्या ध्रुवांवरची माणसं रिसॉर्टमध्ये एकत्र येतात आणि त्यांची स्वतंत्र आयुष्यं एकमेकांच्या आयुष्यात मिसळू पाहतात. त्यातून काय काय घडतं, हे दाखवणारं हे नाटक आहे. मानवी नातेसंबंधांचे अनेकानेक पदर त्यातून उलगडत जातात. समकालीन वास्तवाचे काही रंगही त्यात मिसळतात. रीलच्या आहारी गेलेली एक पिढी यानिमित्ताने कुठल्या आभासी जगात जगतेय, हे तर त्यातून कळतंच, पण करीअरिस्ट अॅप्रोच असलेल्या तरुणाईची ंससेहोलपटही यातून पुढे येते. त्याचवेळी घरातील वातावरणाने बहकलेला तरुण विवेकच्या रूपात आपल्यासमोर उभा ठाकतो. त्याचबरोबर आजच्या ग्रामीण तरुणाची गोचीही प्रकाशच्या रूपात यात मांडली गेली आहे. रिसॉर्टमुळे ही मंडळी एकत्र येतात आणि त्यांच्या आयुष्याचे चित्रविचित्र तुकडे कॅलिडोस्कोपमधून आपल्याला अनुभवता येतात. मानवी जगण्यातील गुंतागुंत याद्वारे या नाटकातून मांडली गेली आहे. म्हटलं तर वेगवेगळ्या प्रेमकहाण्यांचा हा कोलाज आहे, आणि त्याचवेळी माणसाचं जगणं समजून घेण्याचाही हा प्रयत्न आहे.
नाट्यरंग: ज्याची त्याची लव्हस्टोरी: मानवी संबंधांची चित्रविचित्र रांगोळी
माणसांचं आयुष्य त्यांच्या हातात असतं असा एक गैरसमज आहे. कित्येकदा माणूस ठरवतो एक... घडतं भलतंच. ज्याच्या त्याच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनानुसार जो तो आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो.
Written by रवींद्र पाथरे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-12-2024 at 02:13 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta natyrangjyachi tyachi love story is marathi drama human relationships entertainment news amy