‘लोकसत्ता-लोकांकिका’च्या मंचावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकांकिका हा दुय्यम आणि उथळ नाटय़प्रकार असल्याची काहींची समजूत आहे. परंतु ती सर्वथा गैर आहे. मराठी रंगभूमीवर आजवर वैविध्यपूर्ण विषयांवरील अत्यंत दर्जेदार, आशयघन आणि गोळीबंद नाटय़ानुभव देणाऱ्या असंख्य एकांकिका लिहिल्या आणि सादर केल्या गेल्या आहेत. रामायण-महाभारतासारख्या अभिजात महाकाव्यांचे वर्तमान संदर्भात नवे अन्वयार्थ, लोककथांच्या माध्यमातून समकालीन समस्यांचा वेध, मानवी संबंधांतील गुंतागुंत, माणसाचे गूढ मनोव्यापार, अनिष्ट सामाजिक रूढी-परंपरांवरील टीकानाटय़े, त्याचप्रमाणे प्रचलित राजकीय घडामोडींवर केलेले थेट भाष्य.. ते अगदी नुकत्याच घडलेल्या घटना-प्रसंगांवरील तात्काळ प्रतिक्रियात्मक संपृक्त नाटय़ाविष्कार हे केवळ आणि केवळ एकांकिकांमधूनच पाहायला मिळतात. मराठी रंगभूमीवर एकांकिकांचा अत्यंत जोमदार प्रवाह अखंडितपणे वाहतो आहे. रंगभूमी समृद्ध करणारे, तिला आधुनिक आशय-विषय-मांडणी-सादरीकरणाचे नवनवे आयाम देणारे, त्यांत काळानुरूप ‘प्रयोग’ करणारे आपल्याकडचे बहुसंख्य नाटककार घडले ते ‘एकांकिका’ या नाटय़प्रकाराच्या मुशीतूनच. मग ते विजय तेंडुलकर असोत, महेश एलकुंचवार असोत, सतीश आळेकर असोत की अलीकडचे नवे लेखक असोत.  महाराष्ट्रातील खेडय़ापाडय़ांपासून सर्वत्र या  नाटय़प्रकारात अगणित नाटय़कर्मी आपली अभिव्यक्ती सादर करीत असतात. किंबहुना, प्रायोगिक वा समांतर धारेत तसेच व्यावसायिक रंगभूमीवर तिच्या काही अंगभूत मर्यादांमुळे जे विषय मांडणे शक्य होत नाहीत ते एकांकिकेच्या व्यासपीठावर सहजी मांडता येतात, हे वास्तव आहे. आणि एकांकिका या प्रकाराच्या या क्षमतेचा पुरेपूर वापर आपले नाटककर्ते घेताना दिसतात. त्यामुळेच आधुनिक मराठी रंगभूमीचा विचार करताना एकांकिका या नाटय़प्रकारास वगळता येणेच शक्य नाही.

‘लोकसत्ता’ आयोजित ‘लोकांकिका स्पर्धा’मधून गेल्या चार वर्षांत या गोष्टीचा पुन:पुन्हा प्रत्यय येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘लोकसत्ता-लोकांकिका स्पर्धे’तही वर्तमान ताज्या विषयांना, तसेच सद्य: घटना-घडामोडींना भिडणाऱ्या बऱ्याच एकांकिका पाहायला मिळाल्या. मग ती मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वेस्थानकावरील चेंगराचेंगरीत अनेकांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना असो, किंवा ‘आयसिस’सारख्या दहशतवादी भस्मासुराच्या पोलादी पंजात सापडणारे निरपराध, कोवळे तरुण असोत; किंवा मग पुण्यात नाटककार राम गणेश गडकऱ्यांचा पुतळा चबुतऱ्यावरून हटविण्याची काळीमा फासणारी घटना असो; अशा धगधगत्या वर्तमान विषयांना हात घालण्याचे धाडस यंदाही लोकसत्ता-लोकांकिका स्पर्धेतील एकांकिकाकर्त्यांनी दाखविल्याचे सुखद चित्र संपूर्ण स्पर्धेत दिसले. विषयांचे वैविध्य आणि त्यांतली परिणामकारकता हे ‘लोकांकिका स्पर्धे’चे व्यवच्छेदक लक्षण त्यातून पुनश्च अधोरेखित झाले. यंदाच्या स्पर्धेतील अशा काही एकांकिकांनी हाताळलेल्या विषयांचा यानिमित्ताने मागोवा घेणे अप्रस्तुत ठरणार नाही.

यंदा महाअंतिम फेरीत सवरेत्कृष्ट ठरलेली ‘सॉरी परांजपे’ ही एकांकिका पुण्यातील नाटककार राम गणेश गडकऱ्यांचा पुतळा हटविण्याच्या घटनेवरील थेट प्रतिक्रिया व्यक्त करणारी होती. खरे तर समस्त नाटय़कर्मीनी एकजुटीने आणि एकमुखाने या घटनेचा तीव्र निषेध करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तसे घडले नाही. एक सुजाण, सुसंस्कृत समाज म्हणून आपल्याकरता ही शरमेचीच बाब होय. त्यावर कलात्मक प्रतिक्रिया देण्याचे स्वातंत्र्य तरी कलाकारांना निश्चितच होते. परंतु तेही धाडस बहुतांश नाटय़कर्मीनी दाखवले नव्हते. मात्र, ‘सॉरी परांजपे’ या एकांकिकेतील तरुण रंगकर्मीनी हे साहस केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. समाजातील वाढती दडपशाही आणि दहशतवादास कडाडून विरोध करणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य असताना फक्त ‘मी.. माझा’ एवढाच आपमतलबी विचार करणाऱ्या आजच्या आत्मकेंद्री समाजाला झगझगीत आरसा दाखविण्याचा प्रयत्न या एकांकिकेने केला. हे करत असताना आपलीची मांडणी समतोल राहील, त्यात उभय बाजूंच्या मत-मतांतरांची साधकबाधक चर्चा लोकशाही पद्धतीने होईल, याची दक्षताही ‘सॉरी परांजपे’च्या कर्त्यांनी घेतली होती. मुख्य म्हणजे विवेकवादाची कास धरूनच कुठलाही विषय हाताळायला हवा, हा संदेश या एकांकिकेतून जाईल हेही त्यांनी पाहिले. केवळ विरोधासाठी विरोध न करता विहित विषयाच्या सगळ्या कोनांचा साकल्याने विचार होणे किती आवश्यक आहे, हे या एकांकिकेत ठोसपणे सांगितले गेले. स्वाभाविकपणेच सवरेत्कृष्ट एकांकिकेचा बहुमान ‘सॉरी परांजपे’ला परीक्षक आणि जाणकार प्रेक्षकांनीही एकमताने दिला नसता तरच आश्चर्य.

मुंबई किंवा कुठल्याही शहरांत येणारे माणसांचे वाढते लोंढे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेकानेक समस्या हा संवेदनशील माणसांसाठी चिंतेचा आणि चिंतनाचाच विषय. मध्यंतरी एलफिन्स्टन रेल्वेपुलावर प्रवाशांच्या चेंगराचेंगरीत अनेक लोक मृत्युमुखी पडल्याची घडलेली घटना ही मृत्युपंथास लागलेल्या मुंबई शहराच्या अराजकी स्थितीचीच निदर्शक होय. त्यावर सणसणीत प्रतिक्रिया देणारी ‘शुभयात्रा’ ही एकांकिका या दाहक वर्तमानाचे चित्रण करणारी तर होतीच; पण भीषण भविष्याचीही भाकितकर्ती होती.

अंतिम फेरीत न पोहोचलेल्या, परंतु सद्य:विषयांवर भाष्य करणाऱ्या अनेक एकांकिका याही वर्षी ‘लोकांकिका स्पर्धे’त सादर झाल्या. पैकी मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन’च्या पोकळ नाऱ्यातील कथनी आणि करणीमधील विरोधाभासाची खिल्ली उडवणारी एक एकांकिका प्राथमिक फेरीत सादर झाली. एका रूपककथेद्वारे विद्यमान सरकारच्या दांभिकतेचे तीत वाभाडे काढले होते. अशाच तऱ्हेच्या अन्य एका एकांकिकेत सरकारच्या ‘गोहत्याबंदी’च्या निर्णयाचे उपहासात्मक शैलीत चित्रण केले गेले होते. गायीच्या पोटातील ३३ कोटी देवदेवतांचे मूषकाच्या पोटात स्थलांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने काय हाहाकार उडतो, याचे अत्यंत मर्मभेदक चित्र या एकांकिकेत रंगवले होते. मात्र, या एकांकिका सादरीकरणातील काही त्रुटींमुळे अंतिम फेरीत पोहोचू शकल्या नाही. अन्यथा, आजची तरुण पिढी राजकीयदृष्टय़ा किती सजग आहे, वादग्रस्त विषयांवरसुद्धा ती स्वत:ची अशी मते बाळगून आहे, हे त्यांतून समाजासमोर आले असते.

अल् कायदा, लष्कर-ए-तोयबा, ‘आयसिस’सारख्या धर्माधिष्ठित दहशतवादाचा भीषण वडवानल आज जगाला भेडसावतो आहे. कोवळे तरुण कळत-नकळत त्यात ओढले जात आहेत. मात्र, त्यांना आपल्या या अविचारी कृतीतील वैय्यथ्र्य कळेस्तोवर उशीर झालेला असतो. परतीचे दोर कापले गेलेले असतात. त्यांची आयुष्ये त्यात कोळपून जातातच; पण त्यांचे कुटुंबीयही त्यात भरडले जातात, सर्वस्वाने उद्ध्वस्त होतात. हे वास्तव मांडणारी ‘गुमराह’सारखी एकांकिकाही या स्पर्धेत सादर केली गेली. तंत्रज्ञानाने माणसाचे जगणे सुकर केले आहे तसेच ते ध्वस्त करण्यातही हेच तंत्रज्ञान वापरले जात असल्याचे धक्कादायक वास्तव अलीकडेच ‘ब्लू व्हेल गेम’मध्ये बळी पडलेल्या तरुणांमुळे दृष्टीस आले आहे. एकीकडे माणसाचे जीवन आधुनिक सुखसुविधांनी सुखासीन केलेले असले तरी त्या मिळवण्यासाठी जी आर्थिक वखवख त्याच्यात निर्माण केली गेली आहे त्यामुळे अस्थैर्य, अनिश्चितता, ‘रॅट रेस’चा प्रचंड दबाव, वैफल्य आणि नैराश्याच्या गर्तेत कोसळतो आहे. त्याची ‘भूक’ कशानेही पुरी होत नाहीए. याचीच परिणीती म्हणजे ‘ब्लू व्हेल गेम’सारख्या जीवघेण्या आकर्षणांकडे त्याचे वेगाने ओढले जाणे! ‘समथिंग फिशी’ या एकांकिकेत हा विषय अत्यंत संवेदनशीलतेने हाताळण्यात आला होता. कुठेही प्रबोधनाचा आव न आणता आजचे वास्तव या एकांकिकेत मांडले होते. अशा विखारी विळख्यांत सापडणाऱ्या तरुणाईला सावध करू बघणारी ही एकांकिका.. ‘समथिंग फिशी’!

पोटापाण्यासाठीचे स्थलांतर माणूस अगदी आदिमकाळापासून करत आलेला आहे. जन्मभूमीत रुजलेली आपली मूळे उखडून ती नव्या भूमीत पुन्हा रुजवताना त्याला खूपच अवघड जाते. नाइलाजाने तो स्थलांतर करत असला तरीही मायभूमीची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. ती त्याला सतत साद घालतच राहते. मात्र, त्याची पुढची पिढी नव्या भूमीत जन्मलेली असल्याने तिला बापाच्या मूळ भूमीशी आतडय़ाचे नाते नसते. साहजिकच या पिढीला बापाची जन्मभूमीची ओढ, तगमग कळूच शकत नाही. या ओढाताणीत परस्परांच्या हितसंबंधांचा संघर्ष अटळच असतो. विशेषत: ही माणसे तळागाळातील, निम्न आर्थिक स्तरातील आणि शोषित वर्गातील असतील तर अधिकच. हा संघर्ष चितारणारी ‘निर्वासित’ ही एकांकिका वास्तववादी एकांकिकेचा जणू वस्तुपाठच होता. बाप जन्मभूमीपासून निर्वासित, तर मुलगा आर्थिक समस्येपायी शहरात स्वत:चे घर घेऊ शकत नसल्याने वेगळ्या अर्थाने निर्वासित(च)! लोकसंख्येच्या विस्फोटामुळे भविष्यात मुंबईचा विस्फोट कसा अपरिहार्य आहे, हे वास्तव ‘निर्वासित’मधून सूचित करण्यात आले आहे.

देशातील एका प्रांतात एका अति मागास जमातीत लग्नानंतर नववधूची कौमार्य चाचणी घेण्याची प्रथा प्रचलित आहे. या चाचणीत ती खरी उतरली तरच तो विवाह वैध ठरवला जातो. समाजाची त्याला मान्यता मिळते. अन्यथा नाही. ‘संगीत घागरे के पीछे’ या एकांकिकेत या अनिष्ट प्रथेचे अत्यंत उपहासगर्भ अन् करुण चित्र उभे केले गेले होते. यानिमित्ताने योनीशुचितेचा प्रश्नही या एकांकिकेत चर्चिला गेला. नैतिक-अनैतिक या गोष्टी कशा सापेक्ष असतात, याबद्दलची चर्चाही छेडली गेली. अशा ‘टॅबू’ असलेल्या विषयावर खुलेआम चर्चा करणारी ही एकांकिका.. ‘सं. घागरे के पीछ’!

गेल्या वर्षीच्या ‘दप्तर’ या गाजलेल्या एकांकिकेची आठवण करून देणारी ‘मॅट्रिक’ ही एकांकिका यंदा स्पर्धेत पाहायला मिळाली. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचे वास्तव मांडणारी ही एकांकिका. हुशार मुलीच्या शिक्षणासाठी प्रसंगी आपल्या भावभावनांची होळी करणाऱ्या एका आगळ्यावेगळ्या बापाचे दर्शन त्यातून घडलेच; शिवाय ग्रामीण भागातील मनुष्यजीवनाचे ताणेबाणेही त्यानिमित्ताने समोर आले. वास्तवदर्शी एकांकिकेचा एक सुंदर नमुना यानिमित्ताने अनुभवायला मिळाला.

माणूस आपल्या स्वार्थाधतेपायी निसर्गाचा कसा नाश घडवतो आहे, त्याच्या आपमतलबी वृत्तीपुढे अन्य जीवांच्या जगण्या-मरण्याचीही त्याला कशी तमा उरलेली नाही, हे दर्शविणारी ‘माणसं’ ही एकांकिका. तीत माकडांच्या दृष्टिकोनातून मानवाच्या वर्तनाची चिकित्सा करण्यात आली होती. अशा विविध समकालीन विषयांची मांडणी आणि त्यांची तितकीच सशक्त हाताळणी असलेल्या एकांकिका ‘लोकांकिका’ स्पर्धेत रसिकांना बघायला मिळाल्या. तडक कलात्मक प्रतिक्रिया देणारे असे नाटय़ाविष्कार रसिकांना न भावते तरच नवल!

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta orgnaised loksatta lokankika spardha 2017 marathi play comoition
Show comments