थरारपटांचाही एक ठरीव फॉम्र्यूला असतो. ज्यात एखादी घटना आणि हत्येची घटना अथवा दरोडेखोरीची घटना किंवा तत्सम घटना घडलेल्या दाखवतात आणि नंतर त्या घटनेतील सत्य, गुन्हेगारांचा घटना घडविण्यामागचा मूळ उद्देश, पोलीस तपास यातून एखाद्या घटनेची उकल करून रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला जातो. अशा असंख्य थरारपटांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. ‘चार्ली के चक्कर में’ या गूढ शीर्षकानुसार असलेल्या या चित्रपटाची गोष्टच हरवून गेली आहे. कथनशैली आणि संवादातून गोष्ट उलगडताना गोंधळ झाला आहे. परिणामी गुन्ह्य़ाचा तपास करताना चित्रपटातील चौकशी अधिकाऱ्याप्रमाणेच प्रेक्षकांनाही हा चकवा गोंधळात टाकतो. गूढ रहस्याची उकल नीट न झाल्यामुळे प्रेक्षक कंटाळतो.

वास्तविक नासिरुद्धीन शहासारख्या कलावंतांच्या बरोबर सर्व कलावंतांचा उत्तम अभिनय आणि वास्तववादी पद्धतीने कॅमेऱ्यातून एकेक घटना उलगडून दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केल्यामुळे सुरुवातीला चित्रपटात प्रेक्षक गुंततो. एका अंधाऱ्या गॅरेजसारख्या जागेत एकावेळी चौघांची हत्या होते आणि ती छुप्या कॅमेऱ्यात बंदिस्त होते. याच कॅमेऱ्यामध्ये भरपूर काही यापूर्वीच बंदिस्त झालेले आहे. या कॅमेऱ्याच्या चित्रीकरणाच्या आधारे पोलीस अधिकारी संकेत पुजारी गुन्ह्य़ाची आणि गुन्हेगाराची उकल करण्याचा प्रयत्न करून सत्य उघडकीस आणण्याचा प्रयत्न करतात. परंतु सत्य हे अनेकदा सापेक्ष असते असे चित्रपट सांगतो. खरे तर एवढेच या चित्रपटाचे कथानक सांगता येते.
पाच तरुण मित्र-मैत्रिणी, त्यांचे श्रीमंती चाळे, अमली पदार्थाचे सेवन करण्याची त्यांची हौस, त्यासाठी प्रसंगी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी, अमली पदार्थ तस्करी करून त्याची विक्री करणारी टोळी, त्या टोळीचा म्होरक्या आणि अन्य हस्तक, टोळीच्या म्होरक्याचा अनौरस तरुण मुलगा आणि त्याने रचलेला कट, त्या कटातील कळसूत्री बाहुल्याप्रमाणे वागणाऱ्या व्यक्तिरेखा असा गुंतागुंतीच्या गोष्टी पाहताना हत्यांमागचा सूत्रधार कोण आणि प्रत्यक्ष हत्या करणारा कोण हे दाखविताना दिग्दर्शकाचा आणि त्यामुळेच प्रेक्षकांचा गोंधळ उडतो.
सॅम, डीप्स म्हणजे दीपक कुमार, जीवन, पॅट्टी, नीना हे पाच मित्र-मैत्रिणी असतात. सर्वाना मद्य, सिगारेट आणि अमली पदार्थ सेवनाचे व्यसन जडलेले आहे. अमली पदार्थ सेवनाच्या पाटर्य़ा आणि त्याच्या अमलानंतर सर्वाना येणारा कैफ, त्यातून घडलेल्या गोष्टी हाही या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे. एका पबमध्ये नाचताना सॅम आणि राहील नावाचा एक तरुण यांच्यात हाणामारी होते आणि अगोदरच अमली पदार्थाच्या अमलाखाली बेभान झालेले पाचही मित्र-मैत्रिणी वादावादीमुळे पबमधून बाहेर पडतात आणि गाडीतून घरी जायला निघतात. रस्त्यावर उभे असताना पुन्हा राहिल येतो आणि पुन्हा वादावादी होते आणि त्या झटापटीत राहिलला दुसरी एक भरधाव गाडी वेगाने येते आणि त्याला उडवते, त्यात त्याचा मृत्यू होतो. या घटनेनंतर बहकलेले पाचही मित्र-मैत्रिणी भानावर येतात आणि काय करायचे याचा विचार करतात. त्यानंतर एकामागून एक घटना, पोलिसांचा ससेमिरा, अमली पदार्थ साठय़ाची ने-आण वगैरे वगैरे प्रसंग घडतात. या सगळ्याचे चित्रीकरण करणारा कॅमेरा पाचही प्रमुख व्यक्तिरेखांच्या हत्येनंतर पुरावा म्हणून हाती लागतो आणि त्या चित्रीकरणाद्वारे गुन्ह्य़ाचा तपास आणि रहस्याची उकल पोलीस अधिकारी संकेत पुजारी करतात.
संकेत पुजारी ही प्रमुख भूमिका नासिरुद्दीन शहा यांनी साकारली आहे. सॅमच्या भूमिकेत अमित सियाल, डीप्स ऊर्फ दीपक कुमारच्या भूमिकेत आनंद तिवारी व त्यांच्या मैत्रिणींच्या भूमिकेत दिशा अरोरा, अंचल नंदराजोग, मानसी राछ, राहिलच्या भूमिकेतील सनम सिंग तलवार अशा अनेक नवोदित कलावंतांनी अभिनय केला आहे.
सत्याचे आकलन करण्याची प्रत्येकाची कुवत आणि त्यानुसार त्याचा अर्थ लावण्याची क्षमता प्रत्येकाची निरनिराळी असते. त्यामुळे सत्य हेच आहे असा तर्क फक्त माणूस लढवू शकतो. प्रत्येकाच्या दृष्टीने सत्य निरनिराळे असू शकते, किंबहुना बऱ्याच अंशी ते सापेक्ष असते, असे विधान चित्रपट करतो. संकेत पुजारीच्या तोंडी असलेल्या ‘पूरी की पूरी फिल्म छोड गये है लेकिन फिर भी कहानी क्या है यह समझ में नही आ रहा’ अशा शब्दांतील एक संवाद चित्रपटात आहे. प्रेक्षकांचीही हा चित्रपट पाहताना अशीच अवस्था होते, गूढाचा गोंधळ वाढत जातो आणि त्या गुंत्यात गोष्टही हरवून जाते. त्यामुळे रहस्याची उकल झाल्याचे समाधान तर मिळत नाहीच उलट चित्रपट कंटाळवाणा ठरतो.

चार्ली के चक्कर में
निर्माता – करण अरोरा
दिग्दर्शक – मनीष श्रीवास्तव
लेखक – अमित सियाल, मनीष श्रीवास्तव
छायालेखक – एस. व्ही. विश्वेश्वर
संकलक – अश्मित कुंदेर, अर्चित रस्तोगी
संगीत – रोहित कुलकर्णी, हॅरी आनंद, विशाल मिश्रा
कलावंत – नासिरुद्दीन शहा, दिशा अरोरा, औरोशिका डे, सुब्रत दत्ता, निशांत लाल, सिराज मुस्तफा, अंचल नंदराजोग, मानसी राछ, अमित सियाल, सनम सिंग तलवार, आनंद तिवारी, संदीप वासुदेवन.

– सुनील नांदगावकर
sunil.nandgaokar@expressindia.com