जगावरती संकट आले की, सुपरहिरो आपापल्या शक्तींच्या मदतीने, कधी बुद्धीने, कधी बळाने लढून ते संकट परतवून लावतात. आपण केलेल्या कामाच्या समाधानाने, शांतीने ते पुन्हा सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करतात; पण ज्या सामान्य माणसांसाठी, नागरिकांसाठी ते दर वेळी संकटांशी लढतात तो सामान्य माणूस त्यांच्या या सुपरहिरोसाठी खूश आहेत? दर वेळी कधी परग्रहातून, तर कधी आपल्याच लोकांकडून आलेल्या छुप्या शत्रूंचा हल्ला परतावून लावताना अनेक निरागस जीव बळी जातात आणि त्या निरागस जीवांच्या जाण्याने सुपरहिरोंच्या कामगिरीवर त्यांच्या चाहत्यांकडून पहिल्यांदाच प्रश्नचिन्ह लावण्याचा प्रयत्न या नव्या माव्‍‌र्हलपटातून करण्यात आला आहे.

आत्तापर्यंत माव्‍‌र्हलपटांतून आपण ‘अ‍ॅव्हेंजर्स’ची सुपर कामगिरी पाहत आलो आहोत. त्यांच्या भूत, वर्तमान आणि भविष्यातील गोष्टींच्या अजब गमतीही आपण अनुभवल्या आहेत. मात्र ज्या लोकांसाठी हे सुपरहिरो काम करत आहेत त्यांचं काय? असा आत्तापर्यंत कधीही न आलेला विचार दिग्दर्शक द्वयी अँथनी आणि जो रुसो यांनी या ‘कॅप्टन अमेरिका’च्या नव्या सीक्वेलपटात मांडला आहे. ‘कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर’मध्ये अ‍ॅव्हेंजर्सचे सरळ दोन गट पडले आहेत. दर वेळी एका संकटाबरोबर काही निरागस लोकांचा बळी घेणाऱ्या सुपरहिरोंच्या शक्तीवर आता संयुक्त राष्ट्रसंघाला नियंत्रण हवे आहे. मात्र आपण जे काम करतो, ते करत असताना काही लोकांचा बळी जाणार. प्रत्येकाचा विचार करत बसलो, तर आपण कधीच काम करू शकणार नाही, या मताच्या कॅप्टन अमेरिकाला (क्रिस इव्हान) संयुक्त राष्ट्रसंघाचा करार मान्य नाही. तिथे टोनी स्टार्कला (रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर) अ‍ॅव्हेंजर्सनी या करारांतर्गत एकत्रित राहून काम करावं हाच विचार योग्य वाटतो आहे.

या विचारामुळे पडलेले दोन गट एकीकडे आणि दुसरीकडे चोरपावलाने एक संकट आधीच आत शिरलं आहे. त्याने संयुक्त राष्ट्रसंघाच्या बठकीत स्फोट घडवला आहे. मात्र या संकटात ज्या िवटर सोल्जरला दोषी ठरवण्यात आलं आहे, तो दोषी नाही. हे लक्षात आल्यानंतर अ‍ॅव्हेंजर्सचे दोन्ही गट आपापल्या पद्धतीने काम करायला सज्ज होतात. त्यांना आपापसात लढवणारे या वेळी कोणते मोठे शत्रू नाहीत.. तरीही त्यांच्यात मतभेदांची मोठी दरी कशी उभी राहते हे या नव्या माव्‍‌र्हल चित्रकथेत पाहणं महत्त्वाचं ठरेल. या कथेत आयर्न मॅनच्या भूतकाळातील घटनांचा संदर्भ देण्यात आला आहे. शिवाय, दोन गट पडल्यामुळे मग आपापल्या गटाची ताकद वाढवताना स्पायडरमॅन आणि अँटमॅनचा झालेला प्रवेशही मस्त आहे. शिवाय, ब्लॅक पँथर हा नवा सुपरहिरोही यात आहे. या सगळ्याची माव्‍‌र्हल स्टाइलने भट्टी जमली असली तरी आत्तापर्यंतच्या सुपरहिरो पर्वातील हा एक वेगळा अध्याय ठरला आहे.

कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर

दिग्दर्शक – अँथोनी आणि जो रुसो

कलाकार – क्रिस इव्हान, रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर, स्काल्रेट जॉन्सन, जेरेमी रेनर, विल्यम हर्ट, पॉल रुड.