तरुणाईच्या समस्यांचं सशक्त चित्रण

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
nashik hindu organization protest march
नाशिक : युवक मारहाणीच्या निषेधार्थ पिंपळगावात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा
Loksatta chaturang Life Power Center Pleasure school Fear of Pain
सांधा बदलताना : जग हे आनंदशाळा
Loksatta chaturang  Temperament Obsessive Compulsive Personality Disorder
स्वभाव-विभाव :परिपूर्णतेचा अट्टाहास

मराठी रंगभूमीवर तरुणांचे प्रश्न, त्यांच्या जगण्यातले गुंते, त्यांच्यापुढचे वर्तमान पेच या गोष्टी येतच नाहीत असं नाही. ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’सारखं आजच्या तरुणाईची गोची चित्रित करणारं नाटक असो, ‘लिव्ह इन् रिलेशनशिप’ला हात घालणारी नाटकं असोत, किंवा रिअ‍ॅलिटी शोने त्यांच्या आयुष्यात घातलेला धुडगूस दाखवणारं ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस’सारखं नाटक असो; तरुणांचे प्रश्न, त्यांच्या समस्या मांडणारी नाटकं अनेक येऊन गेली आहेत. परंतु यातली बरीच नाटकं लिहिणारे ऐन तारुण्याचा टप्पा ओलांडलेले तरी असतात, किंवा त्यापुढच्या टप्प्यातले तरी असतात. तरुणाईचे प्रश्न मांडणाऱ्या तरुण लेखकांची संख्या तुलनेनं कमी आढळते. त्यामुळे स्वाभाविकपणेच त्यांच्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा तरुणाईचा न राहता तो प्रौढांचा असतो. आणि आजच्या तरुणांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आलेला चाळीशीपुढचा प्रेक्षकच बहुधा ही नाटकं पाहतो. प्रायोगिक रंगभूमीवर तरुणाईचे प्रश्न मांडणारी नाटकं होत असतात. परंतु त्यांचा प्रेक्षकवर्ग सीमित असल्याने ती मोठय़ा जनसमुदायापर्यंत पोहोचत नाहीत. ‘डोण्ट वरी, बी हॅपी’ हे मिहिर राजदा या तरुण लेखकाने लिहिलेलं आणि अद्वैत दादरकर या तरुण दिग्दर्शकाने बसवलेलं तरुणाईच्या घुसमटीचं चित्र समोर ठेवणारं नाटक नुकतंच रंगमंचावर आलं आहे. यातल्या तरुण पिढीची समस्या, त्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी शोधलेला मार्ग हे सारं त्यांचं आपलं आहे. त्यांचा परिपक्व होण्याकडचा प्रवासही यात पाहायला मिळतो.

अक्षय आणि प्रणोती हे तरुण जोडपं. प्रेमविवाह केलेलं. लग्नाला तीन-चार वर्षे झालेली. त्यामुळे त्याची नवलाई ओसरलेली. दोघा नवरा-बायकोचा संसार सुरू झालाय. करिअर, नवं घर, त्याचे हप्ते,कामाचा ताण, त्यातून परस्परांना न देता येणारा वेळ, प्रत्येकाचे करिअरचे आपापले ताणतणाव या सगळ्यातून ते चाललेत. साहजिकच त्यांचं लग्नानंतर हनिमूनला जायचं लांबणीवर पडलेलं. तशात एकमेकांना वेळ देऊ न शकण्यानं होणाऱ्या परिणामांची भर पडलेली. परस्परांना गृहीत धरणं, अन्यत्र विरंगुळा शोधणं, त्यातून होणारे समज-गैरसमज, बेबनाव.. हे सारं साचत साचत एक दिवस त्याचा स्फोट होतो तेव्हा आपण एकमेकांना खरंच ओळखतो का, असा प्रश्न दोघांनाही पडतो.

दुसरीकडे वय वाढत जाण्यानं निर्माण होणारे वेगळेच प्रश्न! घरच्या-बाहेरच्या ताणतणावांमुळे विस्कटलेलं प्रणोतीचं मासिक पाळीचं चक्र.. अपत्यजन्माचा निर्णय आताच न घेतल्यास पुढे गुंतागुंत वाढण्याची डॉक्टरांनी व्यक्त केलेली भीती.. त्यातून तिच्यावर आलेला आणखीन ताण.. एकीकडे या अत्यंत खासगी समस्येशी झुंजत असताना दुसरीकडे घर आणि करिअर यांत होत असलेली प्रणोतीची कुतरओढ.. अक्षयबरोबर क्षुल्लक कारणांनी वाढलेली भांडणं.. या ओझ्याचा उभयतांवर आलेला न पेलणारा ताण एक दिवस त्यांना परस्परांपासून वेगळं करतो. अक्षयला तिच्यापासून वेगळं व्हायचं नसतं, परंतु तिच्या हट्टापुढे त्याचा नाइलाज होतो.

पुढे काय?

त्यांच्या वेगळं होण्यानं तरी प्रश्न मिटतात का?

तर- नाही.

प्रणोतीला हवं असलेलं स्वातंत्र्य मिळतं. आतापर्यंत घरचे-दारचे मनावर वागवलेले असंख्य ताण एका झटक्यात नाहीसे होतात. तिचा अवकाश (स्पेस) तिला मिळतो. परंतु त्यानं ती सुखी होते का? तिच्या अत्यंत व्यक्तिगत समस्येतून तिची सुटका होते का? की त्यात आणखीनच गुंतागुंती निर्माण होतात?

वेगळे झाल्यानं अक्षयला रोजच्या प्रणोतीबरोबरच्या भांडणांतून मुक्ती मिळते. त्यालाही स्वातंत्र्य लाभतं. त्याचा असा अवकाश (स्पेस) तो आता एन्जॉय करू शकतो. पण मग ज्याच्यासाठी आपण संसाराचा मांड मांडला होता त्याचं काय? तो तर उधळला गेला! आता उरलंय फक्त रीतेपण.. सदा खायला उठणारं! ते भरून काढायचं कसं, हा त्याच्यापुढचा प्रश्न आहे.

लेखक मिहिर राजदा यांनी आजच्या करिअरिस्ट तरुणाईला भेडसावणाऱ्या अनेकानेक समस्यांना या नाटकात हात घातला आहे. करिअर की संसारसुख, हा प्रश्न मागच्या पिढय़ांना फारसा जाणवला नाही. कारण त्यांच्या नोकऱ्या या घराला मदत करण्यापुरत्याच होत्या. प्राधान्य घर-संसारालाच होतं. आज करिअर ही प्रत्येकाच्या प्राधान्यक्रमावर असलेली बाब आहे. त्यासाठी अनेक तडजोडी करणं तरुणाईला भाग पडत आहे. याचे दुष्परिणामही हळूहळू समोर येत आहेत. माणसं व्यक्तिकेंद्री होण्याचं तेही एक कारण आहेच. आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र असण्याबरोबरच आपल्या जगण्यासंबंधातील काहीएक परिपक्वता नसेल तर काय होऊ शकतं, हे ‘डोण्ट वरी, बी हॅपी’मध्ये पाह्य़ला मिळतं. घर व करिअर हा तोल सांभाळणं बऱ्याच जणांना आज जमत नाही, याचं कारण त्यांच्या करिअरच्या मागण्या! कामाच्या वेळेचं बिघडलेलं गणित, तिथले ताणतणाव, सतत परफॉर्मन्स सिद्ध करण्याची निकड आणि या सगळ्याशी जुळवून घेताना त्यांची होणारी भयंकर फरफट! तर दुसरीकडे तरुणांच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकी कल्पना, त्यातून दुरावलेले निकटवर्तीय.. मग स्व-हिमतीवर उभारलेलं घर चालवताना होणारी प्रचंड दमछाक, पुरुषप्रधान मानसिकतेतून अद्यापि बाहेर न पडलेले तरुण आणि तरुण स्त्रियांना आलेलं स्वत्वाचं भान- यातून झडणारा नवा संघर्ष.. आणि या दोहोच्या मेळातून शारीर, मानसिक आणि भावनिक ताणतणावांचा चढत जाणारा आलेख.. त्यातून उद्भवणारे नानाविध आजार, आरोग्याच्या समस्या.. अशी एकाच वेळी अनेक आघाडय़ांवर झुंजणारी आजची तरुणाई या नाटकात आढळते. लेखक मिहिर राजदा यांनी हे सारं सूक्ष्म तपशिलांनिशी नाटकात मांडलं आहे. हे करीत असतानाच त्यांनी चिंतनच्या रूपाने अक्षय-प्रणोतीच्या समंजस, परिपक्व मित्राचं एक पात्रही नाटकात रंगवलं आहे. जे पूर्वीच्या नाटकांतून जुन्या पिढीतली अनुभवी माणसं करत असत, ते या दोघांना समजावण्याचं, योग्य तो सल्ला देण्याचं आणि संघर्षांच्या प्रसंगी त्यांच्यात कटुता येऊ न देण्याचं काम इथे चिंतनच्या वाटय़ाला आलं आहे. एका अर्थानं या पिढीलाही अशा एखाद्या मार्गदर्शकाची गरज आहे, हे अधोरेखित करणारं हे पात्र. या पात्रामुळे नाटक काहीसं ‘प्रेडिक्टेबल’ झालं आहे. त्याचा नाटय़ात्म परिणामही काही अंशी उणावला आहे. चिंतन हे पात्र नसतं तर..? तर या दोघांनी आपल्या समस्येतून कसा मार्ग काढला असता, हा कळीचा प्रश्न नाटक पाहताना सतत मनात येत राहतो. तसं झालं असतं तर आजच्या तरुणाईची मार्गक्रमणा कुठल्या दिशेला चालली आहे, हे खऱ्या अर्थानं कळलं असतं. असो. या ‘जर-तर’ला अर्थात काही अर्थ नाही. त्याकरता या मंडळींच्या पुढच्या एखाद्या नाटकाची वाट पाहावी लागणार. मिहिर राजदा यांनी अक्षय आणि प्रणोती ही पात्रं वास्तवदर्शीत्वाचा उत्तम नमुना असावा अशी रेखाटली आहेत. हे नाटक असंच्या असंच बऱ्याच तरुण जोडप्यांच्या आयुष्यात आज घडत असावं, इतकं ते अस्सल आहे. थोडेफार तपशील इकडे-तिकडे. बस्स.

दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांनी आजपर्यंत तरुणाईच्या समस्या हाताळणारी काही नाटकं केली आहेत. स्वानुभवाच्या जवळ जाणारी ही नाटकं बसवण्यात त्यांना नवनिर्मितीच्या आनंदाबरोबरच समकालीन असण्याचाही अर्थ गवसत असणार. या नाटकात दिग्दर्शक दिसत नाही, यात त्यांचं दिग्दर्शकीय कौशल्य सामावलं आहे. एके ठिकाणी त्यांनी ढोबळता टाळायला हवी होती असं वाटतं. स्नबच्या फोटोला उत्तरार्धात अक्षयनं हार घालणं- हे जरी कृतज्ञतेचं सूचन करणारं असलं, तरी ते ढोबळ वाटतं. या नाटकातला सर्वात उत्कर्षबिंदूप्रत जाणारा प्रसंग म्हणजे अक्षयला ‘परफॉर्म’ करण्याच्या आलेल्या विलक्षण दडपणाचा प्रसंग! प्रणोतीची या प्रसंगातली केविलवाणी अगतिकताही अंगावर काटा आणते. आजच्या तरुणाईची काय भीषण अवस्था झाली आहे, हे दर्शवणारा हा प्रसंग. दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांनी या प्रसंगातलं कारुण्य, उभयतांची हतबलता अत्यंत क्रूरतेनं बाहेर काढली आहे.. ज्यामुळे नाटक एका उंचीवर गेलं आहे. (हा प्रसंग बीभत्सही होऊ शकला असता.) अद्वैतच्या संस्मरणीय नाटकांत याची गणना होऊ शकेल.

प्रदीप मुळ्ये यांनी आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र असलेल्या आजच्या तरुण जोडप्याचा फ्लॅट त्यातल्या बारकाव्यांनिशी साकारला आहे. या फ्लॅटमधली अस्ताव्यस्तता आजच्या तरुणाईच्या जगण्याशी मेळ खाणारी आहे. साई पियुष यांच्या संगीतानं नाटकातला संघर्ष अधिक धारदार केला आहे. अमोघ फडके यांच्या प्रकाशयोजनेनं नाटय़ांतर्गत मूड्स गहिरे केले आहेत.

स्पृहा जोशींची प्रणोती आजच्या तरुण स्त्रीची गोची विशद करते. या स्त्रीला निखळ स्वातंत्र्य हवंय. स्वत:चा अवकाश हवाय. आपल्याभोवती पिंगा घालणारा नवरा हवाय. करिअर हे तर तिचं सर्वस्व आहे. त्याचवेळी या सगळ्यातून निर्माण होणारे ताणतणावही तिला असह्य़ होताहेत. या सगळ्याची किंमतही ती चुकवते आहे. दिवसेंदिवस प्रगल्भ अभिनयाकडे वाटचाल करणाऱ्या स्पृहाने प्रणोतीचं अंतरंग सर्वार्थानं आत्मसात केलंय. प्रणोतीची घुसमट, तिची कोंडी, संघर्ष, त्यातून बाहेर पडण्याची धडपड, त्यात आलेलं अपयश हे सगळं ती ज्या उत्कटतेनं व्यक्त करते त्याला तोड नाही. अक्षयचा कोंडमारा, घरच्या-बाहेरच्या ताणांचा असह्य़ कडेलोट होऊन झालेला स्फोट, त्याची विलक्षण हतबलता, त्याच्यातला सरळमार्गी संसारी माणूस, त्याची साधीशी स्वप्नं, त्यांना सुरुंग लागताना त्याला होणाऱ्या भयंकर वेदना आणि  प्रणोतीपासून वेगळं झाल्यावर त्याची झालेली सैरभैर अवस्था उमेश कामत अक्षरश: जगले आहेत. अभिनयाचा कस लावणारी ही भूमिका होती आणि तिला त्यांनी पुरेपूर न्याय दिला आहे. मिहिर राजदा यांनी समजूतदार मध्यस्थाचं काम करणाऱ्या चिंतनची भूमिका केली आहे.

Story img Loader