तीन मित्र. एक थापाडय़ा (गोटय़ा). एक बाताडय़ा (बाबा). आणि एक बावळट (माधव). तिघेही सडेफटिंग. आगापिछा नसलेले. परवडत नाही म्हणून गावाबाहेरचा एक जळमटलेला जुना वाडा केवळ कमी भाडय़ात मिळतोय म्हणून ते वास्तव्यासाठी घेतात. तिघांचं तसं बरं चाललंय. त्यांच्यातले गोटय़ा आणि बाबा हे दोघं परस्परविरोधी प्रवृत्तीचे. गोटय़ा बोलबच्चन. सतत इतरांच्या नकला करण्यात धन्यता मानणारा. अभिनेता होण्याची स्वप्नं पाहणारा. त्याच्या आगरी बोलीमुळे त्याचं बोलणं बऱ्याचदा माधव आणि बाबाच्या डोक्यावरून जातं. त्यातून कधी कधी अर्थाचे अनर्थही होतात. परंतु त्यानं गोटय़ाला काही फरक पडत नाही. त्याच्या नस्त्या उचापतींनी ते हैराण होत असले तरी घरातली कामं तोच करत असल्यानं त्यांना घरातली कामं करावी लागत नाहीत. बाबा तिघांमध्ये त्यातल्या त्यात बुद्धिमान. तो विचार खूप करतो; पण कृती शून्य. गोटय़ा बाबाच्या इंटलेक्चुअलगिरीला काहीसा टरकून असतो. मात्र, वेळ पडली की त्याला मात द्यायलाही तो कमी करत नाही, ही गोष्ट अलाहिदा. पण आपली ही उसनी टर्रेबाजी अंगाशी आल्यावर मात्र गोटय़ा सपशेल लोटांगण घालतो. हे दोघंही माधवच्या जीवावर पोट भरणारे. माधव मात्र सरळमार्गी. छक्केपंजे त्याला ठाऊक नाहीत. एका परीनं बावळट्टच म्हणा ना! त्याच्या टकलामुळे  लग्नाचं वय उलटून चाललं असूनही त्याचं अद्याप लग्न जमलेलं नाही. टकलापायी तो अधिकच वयस्क वाटतो. गोटय़ा आणि बाबा त्यावरून त्याची सतत खेचत असतात. त्याच्या बावळटपणाची खिल्ली उडवत असतात.

अशात एके दिवशी माधवचं नशीब प्रसन्न होतं आणि सायली नावाची त्याच्यासारखीच एक बावळट तरुणी त्याच्या प्रेमात पडते. तीही त्याच्यासारखीच रडूबाई असते. पण काहीच नाही, त्यापेक्षा कुणीतरी आपल्या प्रेमात पडलंय यानंच माधव खूश होतो. मात्र तिला घरी घेऊन येण्याची त्याला हिंमत नसते. कारण त्या तिघांच्यात आधीच ठरलेलं असतं, की आपल्यापैकी कुणीही कुठल्याही स्त्रीला या घरात घेऊन यायचं नाही.

सायली एके दिवशी भोचकपणे माधव घरी नसताना त्याच्या घरी येऊन टपकते. गोटय़ाला माधवच्या या प्रेमपात्राची कल्पना नसल्याने तो तिच्यावर जाळं टाकू बघतो. तेवढय़ात माधव घरी येतो आणि त्याला सायलीबद्दल खरं काय ते सांगण्यावाचून गत्यंतर उरत नाही.

दरम्यान, अचानक वाडय़ात चित्रविचित्र गोष्टी घडायला लागतात. माधवने हॉटेलमधून आणलेल्या पदार्थाच्या जागी भलताच पदार्थ निघणे.. किंवा माधव सायलीला घडय़ाळ प्रेझेंट देतो त्या बॉक्समधून मोगऱ्याचा गजरा निघणे.. असले अतक्र्य प्रकार त्यांच्या अनुभवास यायला लागतात. ही काय भानामती आहे असा प्रश्न त्यांना पडतो. अशात एके दिवशी घरात स्त्रीचे कपडे असलेली बॅग सापडते. घरात एकही स्त्री नसताना ती आली कुठून, असा प्रश्न त्यांना पडतो. मधेच त्यांच्यापैकी कुणा एकाला कुणीतरी अज्ञात शक्ती गरागरा फिरवून सोडते. या सगळ्या भुताटकीच्या प्रकारांनी तिघंही हडबडतात. एके दिवशी चक्क नऊवारी लुगडय़ातली एक घरंदाज स्त्री (सावित्री) अकस्मात घरात प्रकटते आणि माधवला आपला नवरा मानून त्याच्याशी नवऱ्यासारखं वागू-बोलू लागते. माधव तिच्या हातापाया पडून आपण तिचा नवरा नसल्याचं सांगू बघतो; परंतु तिचं आपलं एकच पालुपद : तुम्हीच माझे ‘हे’ आहात. या नस्त्या लफडय़ात माधव अडकलेला असतानाच सायली त्याच्या घरी येते आणि माधवच्या या ‘प्रकरणा’नं  तिला धक्काच बसतो. माधव परोपरीनं तिला समजावू पाहतो, की मी या बाईला ओळखतदेखील नाही. ती कोण, कुठली- मला काहीएक माहीत नाही. त्याचवेळी एक आंग्लवेशी परकीय स्त्रीही (जेनिफर) तिथं प्रकटते आणि तीही माधव तिचा नवरा असल्याचा दावा करते. माधव आणि सायलीला हे सगळं काय चाललंय, हे कळत नाही. परंतु माधवला नाइलाजानं त्यांच्या ‘नवरा-बायको’च्या नाटकात सामील होण्याशिवाय पर्याय उरत नाही..

काय घडतं पुढे? कोण असतात या स्त्रिया? माधवची त्यांच्या तावडीतून कशी सुटका होते? की होतच नाही? खरंच, त्या वाडय़ात भुताटकी असते की..?  या साऱ्या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटकात शोधणंच इष्ट.

प्रसाद दाणी लिखित आणि प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘ओ मेरा पिया घर आया’ हे नाटक ‘हॉरर कॉमेडी’ आहे असे उद्घोषणेतच स्पष्ट केलं गेलं होतं. ‘हॉरर कॉमेडी’ हा प्रकार हाताळायला अवघडच. एकाच वेळी या दोन्ही गोष्टी साध्य होणं कधीही दुरापास्तच. बऱ्याचदा ती कलाकृती एकतर ‘कॉमेडी’ तरी होते किंवा मग ‘हॉरर’कडे तरी झुकते. कारण भीती आणि हास्य या परस्परविरोधी गोष्टी आहेत. त्या एकत्रित पाहायला मिळणं जवळजवळ अशक्यच. त्यामुळे ‘ओ मेरा पिया घर आया’ ही ‘हॉरर कॉमेडी’ असल्याची उद्घोषणा झाल्यावर आता आपल्याला काय पाहायला मिळणार, असा प्रश्न प्रेक्षकाला स्वाभाविकपणेच पडतो. नाटकाच्या प्रारंभीच्या प्रवेशांत विनोदाचीच आतषबाजी होत राहते. अधेमधे काही अतक्र्य गोष्टी घडताना दिसतातही; नाही असं नाही. परंतु विनोदी प्रसंगांच्या कल्लोळात त्या गांभीर्यानं ठसल्या/ ठसवल्या जात नाहीत. (प्रेक्षकांकडून आणि नाटकातील पात्रांकडूनही!) आणि अकस्मात विजेचा झटका बसावा तशी सावित्रीची एन्ट्री होते. आणि गोटय़ाच्या चेहऱ्याशी साधम्र्य असलेल्या या स्त्रीकरवी नाटक एक वेगळीच कलाटणी घेतं.. आणि रहस्याच्या दिशेनं वाटचाल करू लागतं. अर्थात सावित्रीच्या या आकस्मिक एन्ट्रीमागचं रहस्य एका डायरीतून माधवला लवकरच उकलतं. (अर्थात प्रेक्षकांनाही!) तरीसुद्धा आता पुढं काय होणार, या उत्सुकतेपोटी प्रेक्षक नाटकात गुंतत जातो. याचं श्रेय जितकं संहितेचं;  तितकंच, किंबहुना त्याहून अधिक दिग्दर्शक तसंच कलावंतांच्या अभिनयाला द्यायला हवं. नाटकाच्या उद्घोषणेत ही ‘हॉरर कॉमेडी’ असल्याचं म्हटलं असलं तरी त्यातलं रहस्य एकदा उघड झाल्यावर त्यात ‘हॉरर’ असं काही उरत नाही. त्या अर्थानं नाटक प्रेक्षकाला बिलकूल घाबरवत नाही. दिग्दर्शकानं ते ज्या प्रकारे (हेतुत:) हाताळलं आहे, त्यानं ते अधिकाधिक कॉमेडीकडे  झुकलं आहे. प्रेक्षकांचं रंजन हाच नाटकाचा प्रधान हेतू असल्यानं ते स्वाभाविकही आहे. मात्र, रहस्यावरचा पडदा झटकन् उघडूनही नाटक प्रेक्षकाला खुर्चीला जखडून ठेवतं, हे विशेष. नाटकात गाणी आणि नृत्यांचा केलेला वापरही अनाठायी वाटत नाही. (जरी तो असला, तरीही!)

‘ओ मेरा पिया घर आया’मध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम सर्वाधिक कुणी केलं असेल, तर ते कलावंतांनी! नाटकात रहस्य असं फारसं नाहीच. कॉमेडीच्या बळावरच ते तगतं. त्यातही माधव आणि गोटय़ाने सबंध नाटक हसत-खिदळत ठेवलं आहे. बाबानेही त्यांना चांगली साथ केली आहे. गोटय़ाच्या भूमिकेत अंशुमन विचारे यांनी हास्याचे एकाहून एक सरस बार धुमधडाक्यात फोडले आहेत. आगरी बोली ही जणू त्यांची मातृभाषा असावी इतक्या सफाईनं ते त्यातली गंमत ‘एन्जॉय’ करतात आणि प्रेक्षकांनाही तीत सामील करून घेतात. विनोदाची त्यांची सूक्ष्म जाण आणि टायमिंगचं अचूक भान यापूर्वीच सिद्ध झालेलं आहे. विनोदातील आगाऊपणाची सीमारेषा किती ताणायची याचं भान त्यांनी इथं पुरेपूर राखलं आहे. स्त्रीभूमिकेत तर ते कमालीचे शोभले आहेत. स्त्रीचे यच्चयावत विभ्रम त्यांना अवगत आहेत. संपूर्ण नाटकभर त्यांचा धमाल वावर आगळी प्रसन्नता देतो. आशुतोष वाडेकरांचा माधव ‘मि. बिन’ या विनोदवीराची आठवण करून देणारा आहे. ‘वेश बावळा, परी अंगी नाना कळा’ या उक्तीचा ठोक प्रत्यय त्यांनी दिला. खरं तर व्यक्तीचा बावळटपणा हा कंटाळवाणा, एकसुरी होऊ शकतो, परंतु वाडेकरांनी आपल्या अवघ्या देहबोलीची त्याला दिलेली हास्यस्फोटक जोड अफलातून ठरली आहे. दोन बायकांच्या दादल्याचं दु:ख हकनाक वाटय़ाला आलेला माधव ज्या परिस्थितीतून जातो, ती ‘बिच्चारी’ अवस्था त्यांनी अक्षरश: जिवंत केली आहे. प्रसाद दाणी यांनी बाबा समजून उमजून साकारला आहे. स्त्रीभूमिकेत मात्र ते तितकेसे कम्फर्टेबल वाटत नाहीत. स्नेहा मंगल (सायली) आपलं काम चोख करतात.

नेपथ्यकार जय चौबे यांनी जळमटांनी भरलेला जुनाट, रहस्यमय वाडा वास्तवदर्शी उभा केला आहे. भूषण देसाई यांनी प्रकाशयोजनेतून गूढ वातावरणनिर्मिती केली आहे. किशोर पिंगळे यांच्या रंगभूषेला आणि पल्लवी विचारे यांच्या वेशभूषेला शंभरपैकी एकशे एक मार्क्‍स. धनश्री दळवी यांनी केलेलं नृत्यआरेखन उत्फुल्ल व ठेकेदार आहे. चिन्मय सत्यजीत यांचं संगीत नाटय़ांतर्गत वातावरणनिर्मिती तर करतंच; शिवाय त्यांनी दिलेल्या गाण्यांच्या चालीही ठसकेबाज आहेत.

एकुणात- ‘ओ मेरा पिया घर आया’ हे एक छान, चार घटका निखळ मनोरंजन करणारं नाटक आहे.

Story img Loader